International Friendship Day 2023:जागतिक मैत्री दिनाच्या निमित्ताने जाणून घ्या शनी देव आणि मारुती रायाची अनोखी मैत्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 08:20 AM2023-08-05T08:20:19+5:302023-08-05T08:21:30+5:30
International Friendship Day 2023: शनी आणि मारुती दोघांच्या आवडीनिवडी सारख्या, एकाची भक्ती केली तरी दुसऱ्याची कृपा होते अशी यांची ख्याती!
ऑगस्टचा पहिला रविवार आपण जागतिक मैत्री दिन म्हणून साजरा करतो. यंदा ६ ऑगस्ट रोजी मैत्री दिन आहे, त्यानिमित्ताने दोन शक्तिशाली देवतांची परस्परांशी मैत्री कशी झाली ते जाणून घेऊ.
शनि आणि मारुतीची मंदिरे नेहमी जवळजवळ असतात. किंबहुना, काही ठिकाणी एकाच मंदिरात या दोन्ही देवांच्या मूर्ती शेजारी असतात. शनि व मारुती दोघांचेही स्वरूप उग्र आहे. वात हे त्यांचे तत्त्व आहे. दोघांचेही जन्म उष्ण वायूपासून झाले आहेत.
शनि आणि मारुतीच्या ठिकाणी रुद्रांश आहे. शनि हा वैष्णवी शक्तीचे कार्य करीत असलेला रुद्रांश आहे, तर मारुती हा फक्त रुद्रांशच आहे. या दोघांचे जन्मवार, तर एक आहेतच पण इतकेच नव्हे, तर आवडीनिवडीही सारख्या आाहेत. त्या दोघांनाही गोडेतेल, रुई, उडीद इ. वस्तू प्रिय आहेत.
शनि हा मारुतीप्रमाणेच ऋजू स्वभावाचा भक्तांना वैभव प्राप्त करून देणारा आहे, पण ज्याचे त्याच्याशी वैर होते त्याला तो मारुतीप्रमाणे पीडा देतो. शनि आणि मारुती दोघेही वैराग्यमूर्ती आहेत. शनि व मारुतीचे उपासक शनिवार पाळतात. आणि एकाच प्रकारचा पूजोपचार दोघांना समर्पित करतात.
शनि हा सूर्याचा पूत्र आहे, तर मारुती हा सूर्याचा शिष्य आहे. म्हणून शनीची पीडा दूर करण्यासाठी मारुतीची उपासना करतात. शनि आणि मारुती या दोघांमध्ये इतके साम्य आढळण्याची कारणे पुढील कथांमध्ये दिसतात.
एक कथा अशी सांगितली जाते, की प्रत्यक्ष देवाधिदेवही ज्याला भिऊन होते, अशा शनिची दृष्टी एकादा मारुतीकडे वळली व त्याने वज्रदेही मारुतीच्या मस्तकावर आरोहण केले. शनिच्या अहंकाराचा नाश करण्याच्या हेतूने मारुतीने वानरचेष्टा सुरू केल्या. त्याने पर्वत, झाडे उपटून शनिच्या डोक्यावर आपटण्यास सुरुवात केली. त्यामुळे शनि जेरीस आला व त्याने मारुतची क्षमा मागितली. मारुतीने त्याला काही अटींवर मुक्त केले. तेव्हा शनिने तेल, शनिवार, उडीद, रुई या आपल्या गोष्टी मारुतीला दिल्या. त्याच्या उपासकांना पीडा न देण्याचे मान्य केले आणि शनि व मारुतीची मैत्री झाली.
शनि व मारुती यांच्याबद्दल दुसरीही एक कथा सांगितली जाते. एकदा मारुती सागरतटावर रामचिंतनात मग्न असलेला पाहून तेथून जाणाऱ्या शनिने त्याच्या राशीला जायचे ठरवले. मारुतीने त्याची खूप समजूत घातली, परंतु शनीने ऐकले नाही. त्याने मारुतीला त्याचे हात धरून ओढले, तेव्हा क्रोधित झालेल्या मारुतीने आपले पुच्छ खूप वाढवून शनिला पायापासून गळ्यापर्यंत गुंडाळले व तो रामसेतूकडे जोरात पळत गेला. तेव्हा शनिही त्याच्याबरोबर आपटत आपटत गेला. त्याचे सर्वांग ठेचकाळले. शेवटी मारुतीने त्याला द्वंद्वयुद्धासाठी आव्हान देताच त्याने क्षमा मागितली. मारुतीच्या भक्तांच्या वाटेस जायचे नाही, या अटीवर त्याने शनिला क्षमा केली.
म्हणून शनिची अवकृपा टाळण्यासाठी मारुतीची उपासना करतात. शनि अरिष्ट असेल, तर शनिच्या अनुकूलतेसाठी दर शनिवारी मारुतीची उपासना, पूजा करतात. उपवास करून मारुतीला तेल, रुईची माळ, उडीद वाहतात. मारुतीला अकरा प्रदक्षिणा घालतात.
शनिचे वलय मारुतीच्या पृच्छाप्रमाणे दिसते. आकाशातील शनिची उडी ही मारुतीप्रमाणेच फार मोठी आहे. अशा अनेक कारणांमुळे मारुतीची शनिच्या ठिकाणी धारणा केली जाते.
शक्ती, मुक्ती, वैराग्य आणि मोक्ष यांचा दाता शनि आणि मारुती आहे. पिंडदृष्टीने विचार करता दोघांचे जे वाततत्त्व तेच शरीरास कारक आणि घातक मानले जाते. शनि आणि मारुती ही बरीचशी समान दैवते आहेत. जे लोक मारुतीची उपासना करतील, मारुतीला प्रदक्षिणा घालतील, त्यांना शनिपीडेचा त्रास होणार नाही, अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे.