International music day 2021 : जागतिक संगीत दिनानिमित्त जाणून घ्या संगीत आणि हिंदू देव देवतांचा परस्परसंबंध!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 11:39 AM2021-06-21T11:39:36+5:302021-06-21T11:39:54+5:30

International Music Day 2021: संगीत ही संजीवनी आहे. ती राग आणि रोग दोन्हीवर प्रभावी ठरते. म्हणून देवीदेवतांप्रमाणे आपणही आपल्या आयुष्यात संगीताचा समावेश केला पाहिजे.

International music day 2021: Learn about the interrelationship between music and Hindu deities on the occasion of World Music Day! | International music day 2021 : जागतिक संगीत दिनानिमित्त जाणून घ्या संगीत आणि हिंदू देव देवतांचा परस्परसंबंध!

International music day 2021 : जागतिक संगीत दिनानिमित्त जाणून घ्या संगीत आणि हिंदू देव देवतांचा परस्परसंबंध!

googlenewsNext

आपल्या हिंदू धर्मात एक दोन नाही, तर ३३ कोटी अर्थात ३३ प्रकारचे देवदेवता आहेत. अधोरेखित करण्यासारखी बाब अशी, की ते सगळेच संगीतप्रिय आहेत. म्हणूनच त्यांच्या हातांमध्ये युद्धाच्या आयुधांबरोबरच संगीतात वापरली जाणारी विविध वाद्य असतात. जागतिक संगीत दिनानिमित्त देवीदेवतांना प्रिय असलेली वाद्ये कोणती ते पाहू. 

सरस्वती : सरस्वतीचा आठव झाला की डोळ्यासमोर येते श्वेत वस्त्र धारण करत कमलासनावर विराजमान होऊन वीणा वादन करणारी शांत मूर्ती. देवी सरस्वती ज्ञानाची देवता आहे, त्याचबरोबर ती संगीताचीही देवता आहे. संगीत मनाला शांतता देते, उभारी देते, नैराश्य घालवते, म्हणून तिने वीणावदन पसंत केले आहे. 

गणपती : चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती गणपती बाप्पा संगीत विद्येत तरी मागे कसा असेल? त्याला गायन, वादन, नर्तन प्रिय आहे. त्यात तो रमतो. स्वतः गातो आणि संगीत मैफिलीचा आस्वाद घेतो. बाप्पाच्या येण्याने दहा दिवस उत्सवाचे वातावरण असते आणि त्या दिवसांत सगळीकडे केवळ मंगलमय सूर ऐकू येतात. 

शंकर : देवाधिदेव महादेव हे सुद्धा गायन वादन आणि नर्तनात प्रवीण आहेत. त्यांच्या हाती असलेला डमरू असुरांच्या काळजात धडकी भरवतो. तसेच त्यांचे तांडव नृत्य बघणाऱ्याचा थरकाप होतो. महादेवांनी बनवलेली वीणा ही रुद्रवीणा म्हणून ओळखली जाते. ती वाजवायला अतिशय कठीण परंतु सुमधुर असते. 

कृष्ण : श्रीकृष्णाने बासरी अधरी धरली आणि तिला अतिशय महत्त्व प्राप्त झाले. बासरीचे मंजुळ सूर गोप गोपिकांना भुरळ घालत, तीच मोहिनी आजही रसिक प्रेक्षकांवर कायम आहे. वाद्य वादनामध्ये बासरी वादन मोठ्या प्रमाणावर पसंत केले जाते. हरिप्रसाद चौरसिया या जगविख्यात वादकाने बासरीला जागतिक दर्जा  मिळवून दिला आहे. 

नंदी : महादेवांचा सारथी नंदी हा देखील महादेवाच्या संगीतप्रेमी कुटुंबात राहून संगीतप्रेमी बनला. त्याने वाद्य वादनात प्राविण्य मिळवून मृदंग हे वाद्य निवडले. कर्नाटक संगीतात मृदंगाचा वापर जास्त होतो, तर त्याचाच जोडीदार पखवाज हिंदुस्थानी संगीतात तसेच भजन, कीर्तनात वापरला जातो. 

नारद : महर्षी नारद यांच्या हातात वीणा आणि करतात किंवा चिपळ्या आढळतात. त्यांचा वापर भजन, कीर्तनात आजही केला जातो. देवाचे नावही सुरात घ्यावे याचा आदर्श महर्षी नारदांनी घालून दिला आहे. 

संगीत ही संजीवनी आहे. ती राग आणि रोग दोन्हीवर प्रभावी ठरते. म्हणून देवीदेवतांप्रमाणे आपणही आपल्या आयुष्यात संगीताचा समावेश केला पाहिजे. 

Web Title: International music day 2021: Learn about the interrelationship between music and Hindu deities on the occasion of World Music Day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.