International Yoga Day 2021 : योगसाधना केवळ व्यायाम प्रकार नाही, तर आतंरिक शक्तीशी जोडणारे माध्यम आहे!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 03:17 PM2021-06-21T15:17:58+5:302021-06-21T15:19:01+5:30
International Yoga Day 2021: शरीर उत्तम असेल, तर मन एकाग्र होईल आणि मन एकाग्र असेल तरच आंतरिक शक्तीची ओळख पटेल.
आपल्याकडे महागडा फोन असो नाहीतर कामचलाऊ, पण त्यात नेटवर्क नसेल, तर तो केवळ डब्बा आहे, बिनकामाचा! तसाच आपला देह निश्चल असेल, निष्प्राण असेल, अचेतन असेल, तर त्याचा काही उपयोग नाही. त्या देहाला गरज आहे चैतन्याची. ते चैतन्य मिळते योगसाधनेतून! जोवर आपला स्वतःशी परिचय होत नाही, तोवर आपण जगाशी सख्य जोडूनही एकटेच राहतो. म्हणून स्वतःशी मैत्री करायची असेल, तर योगसाधनेला पर्याय नाही. म्हणून केवळ आजच्या दिवसापुरती योग साधना न करता आजपासून योग साधनेला प्रारंभ करा आणि ती दैनंदिन आयुष्यातील एक सवय बनवून घ्या. जेवण, झोप यांच्याइतकेच योगाभ्यासाचा महत्त्व द्या. शरीर उत्तम असेल, तर मन एकाग्र होईल आणि मन एकाग्र असेल तरच आंतरिक शक्तीची ओळख पटेल.
लहान मुलांना आपण ओरडतो. एका जागेवर शांत बस. वास्तविक पाहता, मुले देहाने फिरत असतात, पण त्यांचे मन आत्मानंदाची, सहजानंदाची अनुभूती घेत असते. त्यामुळे ते मनाने स्थिर व देहाने अस्थिर असतात. याउलट मोठी माणसं देहाने जेवढी शांत दिसतात, त्याउलट ती मनाने सैरभैर फिरत असतात. अशा मनाला नियंत्रित करण्याचे सामर्थ्य योग साधनेत आहे. म्हणून रोज योगाभ्यास केलाच पाहिजे.
योगाभ्यासाने अनेक परिणाम साध्य होतात. वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन आणि उत्तम आरोग्य यातली जी गोष्ट तुम्हाला हवी असते ती द्यायला योग समर्थ आहे. योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित आहे असा बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात. परंतु प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. तुमचे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो.
१) सर्व स्तरांवर तंदुरुस्ती
२) वजनात घट
३) ताण-तणावापासून मुक्ती
४) आंतरिक शांतता
५) रोगप्रतिकारक शक्तीत वाढ
६) सजगतेत वाढ
७) नाते संबंधात सुधारणा.
८) उर्जा शक्तीत वाढ.
९) शरीराचा लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधारते.
१०) संयम वाढतो.
यासाठी आजपासून योगाभ्यासाची आवड आणि सवय लावून घ्या, स्वस्थ राहा आणि मस्त राहा!