International Yoga Day 2022: 'योगा से होगा' म्हणत रामदेव बाबांनी योगसाधनेला दिलं 'ग्लॅमर'; मोदींनी नेलं जागतिक स्तरावर!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 11:59 AM2022-06-20T11:59:49+5:302022-06-20T12:00:11+5:30
International Yoga Day 2022: भारतीय योगसाधनेचा योग पुनश्च भारतात रुजवण्याचे श्रेय या द्वयींना दिले पाहिजे!
वर्ष होते २००३. आस्था चॅनेल नुकतेच सुरू झाले होते. त्यावर योगगुरु रामदेव बाबा यांनी योगाभ्यास टीव्हीवर आणला. त्यांच्यासमोर पटांगणात बसलेले हजारो आणि घरोघरी त्यांना पाहणारे लाखो प्रेक्षक रामदेव बाबांचे अनुकरण करू लागले. तेव्हापासून देशभरातच नाही तर जगभरात योग चळवळ नव्याने सुरू झाली. ही पार्श्वभूमी तयार असताना २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून घोषित केला योगसाधनेची प्रतिष्ठा अधिकच वाढली व पारंपरिक योगसाधनेला ग्लॅमरही मिळाले! (International Yog Day 2022)
योगसाधना ही भारतीय ऋषीमुनींनी जगाला आरोग्य संजीवनी आहे. रामदेव बाबांच्या आधी योगसाधनेचा जगभरात प्रसार झाला नव्हता असे नाही. परंतु आस्था चॅनेलने आणि रामदेव बाबांनी ज्या पद्धतीने योगसाधनेचे महत्त्व लोकांच्या मनात बिंबवले ते परदेशातील लोक योगाभ्यासाचे प्रशिक्षण घेऊ लागले आणि त्यांच्यामुळे आपल्या देशातही योगसाधनेचे महत्त्व सर्वसामान्य लोकांना पटू लागले.
रामदेव बाबांच्या आधी योग शिक्षक धीरेंद्र ब्रह्मचारी यांनी दूरदर्शन वाहिनीवरून योगाभ्यासाचा प्रसार केला होता. शाळा महाविद्यालयातून योगाभ्यासाचे धडे, हिंदी-इंग्रजीतून पुस्तकांचे लिखाण करत त्यांनी योग विषयात आपले योगदान दिले. बीकेएस अयंगर यांनी 'अयंगर योग' नावे गुरुकुल सुरु केले. २००४ मध्ये टाईम मासिकाने त्यांना जगातील पहिल्या १०० प्रभावी लोकांपैकी एक म्हणून घोषित केले होते. कृष्णा पट्टाभी जोइस यांनी अष्टांग विन्यास योग शैली विकसित केली. तिरुमलाई कृष्णामचार्य यांना 'आधुनिक योगाचे जनक' म्हटले जाते. हठयोग आणि विन्यासला पुनरुज्जीवित करण्याचे सर्व श्रेय त्यांना जाते. परमहंस योगानंद यांनी पाश्चिमात्य लोकांना योग आणि ध्यानधारणा शिकवली. ''शिवानंद योग वेदांत स्वामी शिवानंद सरस्वती यांनी आपले संपूर्ण जीवन योग साधनेला समर्पित केले. महर्षि महेश योगी यांच्या हाताखाली अनेक सेलिब्रेटींनी योगसाधनेचे प्रशिक्षण घेतले. या सर्वांमध्ये रामदेव बाबांनीही (Ramdev Baba Yoga) आपले योगदान दिले.
या योगचळवळीचा परिणाम असा झाला की गल्लोगल्ली योगवर्गाचे पेव फुटू लागले. अनेकांच्या नशिबात या जोरावर श्रीमंत होण्याचाही योग जुळून आला. विश्व विद्यालयातून योग विषयात पदवी, पदव्युत्तर प्रशिक्षण घ्यावे, सर्टिफिकेट कोर्स करावा असे अनेकांना वाटू लागले. जिमकडे जाणारी पावले योगा मॅटकडे वळली. रामदेव बाबांसारखे आपलेही पोट सपाट व्हावे असे अनेकांना वाटू लागले. मुख्य म्हणजे यात सातत्य राहिले, याचे श्रेय रामदेव बाबा आणि पंतप्रधान मोदींना द्यायला हवे, नाही का?