International Yoga Day 2023: जागतिक योग दिनासाठी पंतप्रधान मोदी यांनी २१ जून या तारखेचा प्रस्ताव का मांडला? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 01:55 PM2023-06-20T13:55:45+5:302023-06-20T13:56:34+5:30
International Yoga Day 2023: २०१४ पासून जगभर योग दिवस साजरा होऊ लागला आहे, पण याच दिवसाचे प्रयोजन काय? सविस्तर वाचा...
आरोग्य ही खरी संपत्ती आहे. ही संपत्ती कमावली तर इतर गोष्टीही सहज साध्य करता येतात. योगाभ्यासाचे महत्त्व जनमानसात रुजावे म्हणून पंतप्रधान मोदींनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीमध्ये एक भाषण केले व त्यात ते म्हणाले, '' "योग ही भारताच्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे; ते मन आणि शरीराच्या ऐक्याचे प्रतीक आहे; मनुष्य आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद; विचार, संयम, पूर्तता; आणि आरोग्य कल्याणासाठी पूरक आहे. योग आपल्याला स्वतःचा शोध घेण्यास आणि निसर्गाशी जोडण्यास मदत करते. आपल्या बदलत्या जीवनशैलीत योगाभ्यास समाविष्ट करण्याच्या दृष्टीने जागतिक योग दिवस साजरा करावा आणि योग साधनेसंबंधी जनजागृती करावी."
मोदींनी मांडलेल्या प्रस्तावाला संमती देत ''जागतिक योग दिन'' साजरा करावा असे ठरले, परंतु नेमका कोणता दिवस यावर चर्चा केली असता मोदींनी २१ जून ही तारीख सुचवली. कारण २१ जून हा वर्षातील मोठा दिवस असतो आणि योगाभ्यास दीर्घायुष्य देतो. १ डिसेंबर २०१४ रोजी, संयुक्त राष्ट्रसंघाच्या १७७ सदस्यांनी २१ जून हा दिवस "आंतरराष्ट्रीय योग दिवस" म्हणून साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. पंतप्रधान मोदींचा हा ठराव ९० दिवसांच्या आत पूर्ण बहुमताने मंजूर करण्यात आला. सर्वात कमी कालावधीत पूर्ण बहुमताने मंजूर होणारा तो पहिला प्रस्ताव ठरला. या उपक्रमाला अनेक जागतिक नेत्यांचा पाठिंबा मिळाला. (Internation Yoga Day 2023)
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मान्यवरांसह सुमारे ३६,००० लोकांनी २१ जून २०१५ रोजी नवी दिल्ली येथे पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ३५ मिनिटांसाठी २१ योगासने केली. या समारंभाने गिनीज बुकमध्ये विश्वविक्रम नोंदवला गेला. पंतप्रधानांच्या सक्रिय उपस्थितीमुळे योग दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आणि जगभरात लाखो लोकांनी योग दिवस साजरा केला आणि आनंदाची बाब म्हणजे आजही हा दिवस तितक्याच उत्साहाने सर्वत्र साजरा होत आहे!