स्वप्नात साप दिसणे चांगले की वाईट? ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितले आहे की....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 01:58 PM2022-01-21T13:58:11+5:302022-01-21T14:01:19+5:30
जेव्हा स्वप्नात सापासारखे विषारी प्राणी वारंवार दिसू लागतात, तेव्हा आपण त्या स्वप्नांचा अर्थ शोधू लागतो. परंतु साप स्वप्नात का येतो, या अतिविचारानेही सर्पदर्शन वारंवार होत राहते.
साप पाहून आनंद झाला, असा कोणीही मनुष्य या भूतलावर नाही. अर्थात सर्पदर्शनासाठी निघालेले पशूमित्र, अभ्यासक, सर्पमित्र हे अपवाद आहेच. परंतु सर्वसामान्य माणसाला सापाच्या नुसत्या नावाने घाम फुटेल. तर तो प्रत्यक्ष पाहिला तर घाबरगुंडी उडणारच! मग स्वप्नात साप दिसत असेल, तोही वारंवार, तर अस्वस्थता वाढणे स्वाभाविक आहे. चला जाणून घेऊया सर्पदर्शनामागील शास्त्रीय संकेत.
स्वप्न पडण्याच्या काही ठराविक अवस्था आहेत. ज्या गोष्टी आपण दिवसभरात पाहतो, ज्या घटना दिवसभरात घडतात, त्याच्याशी संलग्न असलेली स्वप्नं झोपेत दिसतात. अशी कितीतरी स्वप्नं पाहून आपण विसरूनही जाता़े
एकदा पाहिलेले स्वप्न काही कालावधीत पुन्हा दिसणे. याचा अर्थ पाहिलेल्या स्वप्नावर आपण सतत विचार करत राहिलो, तर तेच विषय डोक्यात, मनात आणि स्वप्नात घोळत राहतात. त्याकडेही आपण गांभीर्याने पाहत नाही.
पहाटे सूर्योदयापूर्वी पडलेली स्वप्न खरी ठरतात असे म्हणतात. परंतु कधी? जर आपण ती कोणाला सांगितली नाहीत, तर! वाईट स्वप्न असेल, तर या विषयातील तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन घेणे इष्ट ठरते. अथवा आपल्या स्वप्नांचा बोलबाला करू नये, त्याचे विपरित परिणाम भोगावे लागतात. पहाटेची स्वप्न फार गंभीर स्वरूपाची नसतील, तर त्याकडे सहज दुर्लक्ष करता येते.
परंतु, जेव्हा स्वप्नात सापासारखे विषारी प्राणी वारंवार दिसू लागतात, तेव्हा आपण त्या स्वप्नांचा अर्थ शोधू लागतो. परंतु साप स्वप्नात का येतो, या अतिविचारानेही सर्पदर्शन वारंवार होत राहते.
सर्पदर्शनाचे संकेत शास्त्रात दिलेले नाहीत. परंतु स्वप्नविचार या ग्रंथात, तसेच ब्रह्मवैवर्तपुराणातील ७७ व्या अध्यायात म्हटले आहे, नुसते सर्पदर्शन होत असेल, तर ठीक; परंतु सर्पदंश होत असेल, तर तुमची आर्थिक स्थिती ढासण्याची शक्यता आहे. त्यातही पांढरा साप दिसणे शुभ मानले जाते. मात्र काळ्या सापाचे दर्शन आणि त्याने केलेला दंश, या दोन्ही गोष्टी वारंवार दिसत असतील, तर तज्ज्ञांकडून यावर उकल जाणून घ्यावी. आपली आर्थिक स्थिती सांभाळावी. खर्चावर नियंत्रण ठेवावे. आणि स्वप्नात फार काळ न जगता, वास्तवाचा विचार करण्यावर भर द्यावा.