पाळीदरम्यान शरीर संबंध येणे योग्य की अयोग्य? त्यामुळे संततीवर काय परिणाम होतात? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 02:16 PM2023-04-08T14:16:18+5:302023-04-08T14:18:01+5:30
पूर्वीच्या काळी विटाळ संबोधून बायकांना बाजूला बसवले जायचे, त्यामागे धर्मशास्त्राचे प्रयोजन काय असावे? सविस्तर वाचा!
>> उन्नती गाडगीळ
पृथ्वीवरील प्रत्येक सजीव निसर्ग निर्मित आहे. त्याच्या अंतरात विज्ञान आहेच. अभ्यासाने,संशोधनाने ,प्रयोगाने गती देऊन प्रगती साधणे हे विज्ञान आहे.निसर्गाभिमुख राहून विज्ञान पारंगत होणे ही गरज आहे. याच विज्ञानाच्या अभ्यासाचा एक भाग म्हणजे पाळी! अलीकडे त्यावर मुक्त चर्चा होताना दिसते. परंतु इथे केवळ स्वातंत्र्याला महत्त्व देऊन चालणार नाही, तर वैज्ञानिक आणि त्याबरोबरच धर्मशास्त्राच्या दृष्टीने विचार व्हायला हवा!
मुलींना बाराव्या/ तेराव्या वर्षापासून दरमहा पाळीच्या दरम्यान अ रक्तस्त्राव वाहून जातो. नवीन,शुद्ध रक्त तयार होऊन गर्भाशय तयार होते. अनाहत कर्म निसर्ग करतो. कोवळ्या नाजूक तनुला डौलदार पणा येतो. कांतीला तजेला येतो. तारुण्य पिटिका गाली उमटतात. तनमन मोहोरते. भावना उद्दीपित होतात. कळीचे फूल बनणे हा वेदनांसह सुखसोहळा असतो. त्याच वेळेस या उमलणाऱ्या कळीचा सांभाळ करणे ही मोठी जोखीम असते.
चार दिवसांचा विटाळ का?
शरीरातील स्त्राव बाहेर पडत असताना, जर शरीर संबंध आला,तर स्त्रियांना त्रास होतो. शारीरिक व मानसिक थकवा येतो. आणि स्त्री ला आनंद घेण्या ऐवजी भिती वाटते.उबग येतो. पूर्वी मनमोकळे संवाद नव्हते. कारण मुली आणि मुलगे सुद्धा वयाने लहान होते. पण बचावासाठी काय करावे? हे ज्ञान नव्हते. म्हणून दोघांना(पती-पत्नी) एकत्र आणायचेच नाही ,म्हणजे बाजूला बसवणे. आणि आराम देणे, हा हेतू होता.
विवाह प्रथेचा हेतू :
विवाह याचा हेतूच मुळी शरीरसंबंध आणि सुंदर, सुदृढ संपन्न कुलवृद्धी हा होता. हेतू चांगला होता.शिक्षणाची वृद्धी झाली.मुली शाळेत जाऊ लागल्यावर सुद्धा विटाळशीसाठी राखीव कोपरा, राखीव मोरी, पूर्वी वाड्यात शाळा भरत तेथे असत. ही प्रथा हळूहळू बंद झाली. पण त्यामुळे त्या चारदिवस अशुद्ध रक्तस्त्राव असताना, कंबरदुखी, पोटदुखी असताना सुद्धा स्त्रियांना घरात, बाहेर ढोर मेहनत घ्यावी लागते.
कुलधर्म- कुलाचार :
रक्त स्त्राव काळात तन अस्वस्थ, असते.आजारी ,अशक्त असते. मन उदास असते.उदास मनाला उत्तेजित करण्यासाठी त्या काळात शिवणे, विणणे, निवडणे, टिपणे, भरतकाम करायला देत असत. त्या नंतरचे काळात महिला शाळेत जाऊ लागल्या तेव्हा, त्या चार दिवसांत बाजूला बसून पाढे म्हणणे,गणिते सोडवणे,शुद्धलेखन करणे,वाचन करणे करत. बायका अशा खटाटोपी, की त्यांनी त्या चार दिवसांचाही उपयोग करून घेतला. माझ्या आजीला महिन्यातील ते चार दिवस पर्वणी वाटे. कारण तिने चारवर्षात फायनल म्हणजे तेव्हाची इयत्ता सातवी पास केली. दर महिन्याच्या त्या चार दिवसांत तिला दिवस रात्र अभ्यास करायला वेळ मिळे. अशी आणखीही अनेक उदाहरणे देता येतील. प्रतिकूलतेत त्यांनी अनुकूलता शोधण्याचा सराव केला. मात्र, आता प्रत्येक दिवस प्रतिकूल असतो. घड्याळाच्या काट्याशी मुकाबला असतो. त्यामुळे अनुकूलता शोधणे आणि त्या चार दिवसात आराम मिळवणे दुर्मिळच झाले आहे.
याला विटाळ मानावा का?
मल,मूत्र,थुंकी,शेंबूड,रक्त जे स्त्राव शरीराबाहेर टाकले जातात ,ते आपण अस्वच्छ मानतो. लगेचच आपण हातपाय तोंड धुतो. स्वच्छता पाळतो. अगदी तान्हुल्याला सुद्धा त्या घाणीत ठेवत नाही. देवाची पूजा करण्यापूर्वी सुद्धा शुचिर्भूत होतो.
ऋतुस्त्रवा काळात आपण दुर्गंधी, नकोसा स्त्राव बाळगताना, मन आजारी,उदास ,दुखरे असताना पूजेने मनाला प्रसन्न कसे वाटणार?
त्यामुळे इथे केवळ शरीर शास्त्र नाही तर मानस शास्त्रही जोडले गेले आहे ते आपण लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे तो काळ विटाळ ठरवला गेला. त्या काळात देहाने पूजा शक्य झाली नाही तरी मानस पूजा करणे सहज शक्य आहे.
जुन्या रीतीरिवाजांना नावे ठेवण्याच्या नादात, महिला सर्व गोष्टी आपल्या अंगावर घेतात. चिडचिड, बडबड, नैराश्य ओढवून घेतात. स्व तनामनाची स्वच्छता, शुचिता, पवित्रता राखा आणि मग देव पूजा,पोटपूजा करा.काही महिला विज्ञानाच्या आधीन होतात.आता नकोच ती दरमहा कटकट म्हणून आपणहून गर्भाशय (Uterus) काढून टाकायला तयार होतात.
स्त्री-भृण हत्या करणे./ स्व मने गर्भपात करणे./संतती नियमनाची साधने नैसर्गिक सुंदर शरीरात बरीच वर्षे बसविणे /सतत संततीप्रतिबंधक गोळ्या-औषधे घेणे...हे निसर्गाच्यावर विज्ञान वार करण्यासारखे आहे. परिणामी जन्मभर शरीर खिळखिळे होते. अशक्त वा अति स्थूलता वगैरे तनामनाचे रोग भोग त्रस्त करतात. त्यामुळे या विषयाकडे संतुलित दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे आणि शांतपणे विचार केला पाहिजे.
आपण निसर्ग निर्मित वृक्षाला-पाना-फुलांना सुद्धा जपतो. जतन करतो. पण तनुवेलीवर मात्र सतत विज्ञान सहाय्याने आघात करतो. तसे न करता विज्ञानाचा सदुपयोग करून घेऊया. ज्ञान मिळवुया. भान राखुया.