'कन्यादान' म्हणजे खरंच मुलीचं वस्तू म्हणून केलेलं दान असतं का?; काय असतो हा विधी?; जाणून घेऊया!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 12:58 PM2022-04-21T12:58:00+5:302022-04-21T12:59:16+5:30
कन्या ही काय वस्तू आहे का दान करायला?, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी विचारला आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया या विधीचा शास्त्रोक्त अर्थ!
नुकतंच लग्न झालेल्या एका अभिनेत्रीनं काही महिन्यांपूर्वी 'कन्यादान नाही... कन्यामान', अशी एक जाहिरात केली होती. दान करायला मुलगी ही काही वस्तू नाही, असा 'बाणेदार' विचार तिनं मांडला होता. त्यावरून, हिंदू धर्मातील कन्यादानाच्या विधीबद्दल बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर आता, कन्या ही काय वस्तू आहे का दान करायला?, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी विचारला आहे. या भाषणात त्यांनी ब्राह्मण समाजाचा अपमान केल्याचा आरोपही ब्राह्मण संघटना करत आहेत आणि त्यावरून निदर्शनंही सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, 'कन्यादान' या विधीमागचा शास्त्रशुद्ध अर्थ काय आहे, भावार्थ काय आहे, हे जाणून घेऊया.
आपल्याकडे विवाह सोहळ्याची आखणी अतिशय सुंदर केलेली आहे. विहिणींची भेट, व्याह्यांची भेट, करवलीचा मान, कानपिळीचा मान, मामाचा मान, काकांचा मान, मंगलाष्टक म्हणताना आत्या, आजी, मामी, मावशीचा मान अशी सगळ्यांची दखल घेतलेली आहे. अशा या सुंदर सोहळ्यात कन्या ही उत्सवमूर्ती असताना तिला 'दानाची वस्तू' कसे ठरवले जाईल, हा साधा विचार आपण केला पाहिजे.
दान म्हणजे देणे. कन्यादान म्हणजे कन्या देणे एवढा सोपा अर्थ आहे. इतर वस्तूंचे दान करताना 'इदं न मम' असे म्हणतो, परंतु मुलगी देताना वराकडून वचन घेतले जाते. मुलगी काही वस्तू म्हणून दिली जात नाही, तर वधूपिता वधूचा हात वराच्या हाती सोपवताना सांगतात, 'विधात्याने मला दिलेले वरदान, जिच्यामुळे माझ्या कुळाची भरभराट झाली, ती तुझ्या हाती सोपवत आहे. ती तुझ्या वंशाची वृद्धी करणार आहे. म्हणून धर्म, अर्थ, काम, मोक्ष अशा चारही बाबतीत तिची प्रतारणा करू नकोस आणि तिच्याशी एकनिष्ठ राहा व दोघांनी सुखाचा संसार करा.' असे वचन घेतात. त्यावर 'नातिचरामि ' म्हणत वर म्हणतो, 'तुम्हाला दिलेल्या वचनाचे मी उल्लंघन करणार नाही.'
केवढी मोठी जबाबदारी आहे ही! देवाब्राह्मणांच्या, नातेवाईकांच्या, आप्तेंष्टांच्या साक्षीने वधूपित्याने नवरदेवाकडून घेतलेले हे वचन आहे आणि त्यानेही पूर्ण विचारांती दिलेला शब्द आहे. तो शब्द पाळण्यासाठी तो कटिबद्ध झालेला आहे.
हा प्रसंग, हा क्षण, हा विधी म्हणजे कन्यामानच नव्हे का? मग कन्यादान या शब्दात वावगे वाटण्यासारखे उरते तरी काय? नवीन प्रथा पाडताना जुन्या प्रथा आधी समजावून घेऊया आणि आधुनिकतेला, जाहिरातबाजीला न भुलता आपली संस्कृती, परंपरा, वेद, शास्त्र, पुराणे यांचा सन्मान करूया.