संपत्ती मिळवण्यासाठी काही मंत्र आहे का? त्याचा खरंच उपयोग होतो का? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 12:36 PM2022-01-24T12:36:44+5:302022-01-24T12:37:09+5:30
या उपासनेला फार खर्च लागत नाही आणि वेळही लागत नाही. हा उपाय जरूर करून पहा!
झटपट श्रीमंत व्हावे, सगळ्या सुख सोयी उपभोगाव्या आणि निवांत आयुष्य जगावे असे प्रत्येकाला वाटते. परंतु श्रीमंत होणे आणि श्रीमंती टिकवून ठेवणे सोपे नाही. त्यासाठी लक्ष्मी मातेची कृपा आणि वंâबरतोड मेहनत करावी लागते. जो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, त्याच्यावर लक्ष्मी मातेची कृपा होते.
परंतु अनेकदा अपार मेहनत करूनही हवी तशी प्रगती होत नाही. अशा वेळी आपण आधार घेतो उपासनेचा. अर्थात कोणतीही उपासना कामापुरती करून सोडून द्यायची नसते. ती सातत्याने करायची असते, तरच तिचे फळ मिळते. समर्थ रामदास स्वामीदेखील सांगतात, 'उपासनेला दृढ चालवावे' म्हणजेच एकदा का उपासनेला सुरुवात केली की ती अर्धवट सोडून न देता सातत्याने करावी. त्यात खंड पडू देऊ नये.
ज्याप्रमाणे आपण सातत्याने प्रयत्न करतो, कष्ट करतो, मेहनत घेतो त्याप्रमाणे आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना श्रद्धेची जोड दिली तर निश्चितपणे फळ मिळते असा भाविकांचा आजवरचा अनुभव आहे. यासाठीच `परम सुखाचे रहस्य' या पुस्तकात लेखक अ.ल. भागवत यांनी एक उपासना दिली आहे. तिचा वापर करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होते असे म्हटले आहे.
सदर मंत्र सांगतात ते लिहितात, 'मनोभावे केलेली प्रार्थना किंवा प्रामाणिकपणे घेतलेले कष्ट कधीच वाया जात नाहीत. वेदांमध्ये सांगितलेला पुढील मंत्रदेखील श्रद्धापूर्वक म्हणावा-
ऊँ नमो विष्णवे नम:
हा मंत्र धनप्राप्तीसाठी फार प्रभावी असल्याचे म्हटले जाते. रोज स्नान करून झाल्यावर हा मंत्र १०८ वेळा श्रद्धापूर्वक म्हणावा. त्यामुळे वाईट तर होणार नाहीच, झाले तर चांगलेच होईल. ज्याठिकाणी विष्णू तिथे लक्ष्मीमाता, हे समीकरण आहे. झालाच तर आर्थिक लाभ होईल, हानी होणार नाही हे निश्चित!
हे लक्षात घेऊन ज्यांना शक्य असेल त्यांनी हा मंत्र रोज १०८ वेळा जपावा किंवा १०८ वेळा लिहून काढावा. मंत्र लिहिलेली वही सांभाळून लक्ष्मी पूजेच्या दिवशी पूजेत ठेवावी आणि तिची यथासांग पूजा करून साळी व लाह्यांचा नैवेद्य दाखवावा. शेवंतीचे फुल वाहावे. या उपासनेला फार खर्च लागत नाही आणि वेळही लागत नाही. विष्णूंचे नाव अंतर्मनात कोरले जाऊन तुम्ही सर्व गोष्टींनी सुखी व्हाय यात संशय नाही!