'तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना' अशी लग्नगाठ साताजन्मांची असते का? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 04:26 PM2022-02-08T16:26:36+5:302022-02-08T16:27:36+5:30
नवरा बायकोला परस्परांना समजून घेण्यासाठी एक जन्मदेखील पुरणार नाही. म्हणून सात जन्माचा कालावधी भारतीय संस्कृतीने दिला असावा
लग्नाच्या गाठी स्वर्गात बनतात, असे आपण ऐकत आलो आहोत. त्यानुसार आपला जोडीदार मिळण्याच्या प्रतिक्षेत आयुष्यातील कितीतरी काळ आपण घालवतो. जेव्हा स्थळं सांगून येतात, सुचवली जातात, तेव्हा त्यात उणिवा शोधत स्थळ योग्य नाही म्हणत नकार कळवतो आणि सरतेशेवटी लग्न झाले, की गेल्या जन्मातही याच जिवाशी आपली गाठ पडली होती का, याचा शोध घेत बसतो.
सद्गुरु सांगतात, 'सर्वात महत्त्वाचे म्हणजे वरील सर्व विचार डोक्यातून काढून टाका. वास्तवात या. मागच्या जन्माचा शोध घेण्याआधी या जन्मात आपण काय कर्तृत्त्व गाजवले याचा विचार करा. आपल्या जोडीदाराशी जन्मोजन्मीच्या नात्यांचा शोध घेण्यापेक्षा या जन्मात त्याच्याशी आपले भावनिक बंध जुळले आहेत की नाही, आपण त्याला समजून घेत आहोत की नाही, आपले नाते सांभाळण्यासाठी आपण सक्षम आहोत की नाही, या गोष्टींचा विचार करा.
या बाबतीत आजची पिढी वास्तवाला धरून असते. एखाद्या उत्पादनावरील निर्मिती तारीख आणि अंतिम तारीख ज्याप्रमाणे तपासून घेते, त्याचप्रमाणे नाते जोडताना आपण ते कितीकाळ निभावू शकू याचाही विचार करते. अर्थात या धरसोड वृत्तीचा त्यांना त्रास होतो. परंतु, ते भूतकाळाचा विचार न करता वर्तमानाचा आणि भविष्याचा विचार करतात, ही बाब येथे अधोरेखित करायची आहे.
नवरा बायकोचे नाते साता जन्माचे असते, असा विचार, संस्कार आपल्या संस्कृतीने आपल्याला घालून दिला आहे. तो यासाठी, की नाते रुजण्यासाठी, मुरण्यासाठी आणि बहरण्यासाठी त्याला तेवढा वेळ द्यावा लागतो. नवरा बायकोच्या नात्यात तर एवढी गुंतागुंत असते, की 'तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना' अशी स्थिती असते. अशा नात्याला समजून घेण्यासाठी एक जन्मदेखील पुरणार नाही. म्हणून सात जन्माचा कालावधी दिला आहे.
तुर्तास हा हिशोब बाजूला राहू द्या. आपल्या सान्निध्यात चोवीस तास राहणारी, लग्नगाठ बांधून आपल्या जीवनात आलेली व्यक्ती आपण तिच्या गुणदोषांसकट स्वीकारली आहे का? आपण आपल्या नात्याचा आदर करतो का? आपले नाते बहरण्यासाठी आपण वेळ देतो का? एकदुऱ्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो का? अशा छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींचा विचार होणे अतिशय महत्त्वाचे आहे.
आपल्याला गतजन्माबद्दल माहीत नाही, भविष्यात काय घडणार तेही माहित नाही, मग आपल्या हातात उरतो तो केवळ वर्तमानकाळ. तो बहरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. नवरा बायकोचे नाते अतिशय सुंदर असते. इतर नात्यांपेक्षा हे नाते सर्वात जास्त परिचयाचे असते. म्हणून हे नाते पदोपदी जपण्याचा पूर्ण प्रयत्न करा. रोजचा दिवस हा नवीन जन्म असतो. या हिशोबाने नाते छान जपले, तर निदान या आयुष्यात जन्मोजन्मीच्या नात्याचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळू शकेल.