तुकाराम महाराजांची ही भूमिका मानसोपचार तज्ञाचीच नव्हे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 05:14 PM2021-03-05T17:14:53+5:302021-03-05T17:32:51+5:30
मन प्रसन्न ठेवण्यासाठी खूप कष्ट करावे लागत नाही, तर फक्त स्वत:शी प्रामाणिक राहावे लागते. तुम्ही जगाला फसवू शकाल, पण स्वत:ला कधीच नाही.
भक्तीमार्गात दंग असणारे तुकाराम महाराज प्रसंगी मानसोपचार तज्ज्ञ होतात आणि आपल्या सुंदर रचनेतून मनोमनीच्या प्रश्नांची सुरेखपणे उकल करतात.
मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण,
मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते।
मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली,
मने इच्छा पुरविली, मन माउली सकळाची।
मन गुरु आणि शिष्य, करी आपुलेचि दास्य,
प्रसन्न आपआपणास, गति अथवा अधोगति।
साधक वाचक पंडित, श्रोते वक्ते ऐका मात,
नाही नाही आन दैवत, तुका म्हणे दुसरे।।
एका वेगळ्या चालीमध्ये रचलेला हा तुकाराम महाराजांचा अभंग मोठे तत्त्वज्ञान सांगतो. मन हेच मुख्य परमार्थसाधन आहे व त्याची प्रसन्नता हेच परम साध्य आहे. प्रसन्नता म्हणजे काय? उत्सहाने ओसंडून चंचल होणे नवहे. प्रसन्नता म्हणजेच शांती, समाधान. ज्याचे मन साम्य अवस्थेत असते, त्याने जन्ममरणरूपी संसार जिंकला आहे.
आपला सर्व आटापिटा मन:शांतीसाठी सुरू आहे. ती मिळवण्यासाठी सगळेच जण धडपडत आहेत. कोणाला लाख रुपये कमवूनही मन:शांती मिळत नाही, तर कोणाला दैनंदिन गुजराण झाली, तरी समाधानाने झोप लागते. मन:शांतीसाठी, मन प्रसन्न ठेवण्यासाठी खूप कष्ट करावे लागत नाही, तर फक्त स्वत:शी प्रामाणिक राहावे लागते. तुम्ही जगाला फसवू शकाल, पण स्वत:ला कधीच नाही. तुम्ही स्वत:ला फसवले, तर मन कधीच प्रसन्न राहू शकणार नाही.
मनाला प्रसन्न ठेवावे लागत नाही, ते आपोआप होते. कशामुळे? तर आयुष्याचा भरभरून आनंद घेतल्यामुळे. सतत कुढत राहणारी व्यक्ती, सतत दुसऱ्यांचे दोष शोधणारी व्यक्ती, सतत कुरघोडी करणारी व्यक्ती जीवनाचा निर्भेळ आनंद घेऊ शकत नाही. हे जग कल्पनेतले नाही, तर तुमच्या सभोवतालीच आहे. तुम्ही कसे वागता, बोलता, राहता, यावर तुमचे अस्तित्त्व आणि आनंद अवलंबून असतो.
आपले मन आपल्याला योग्य मार्ग दाखवत असते परंतु आपण आपल्या विकारी बुद्धीने त्याचे ऐकणे टाळतो. त्याचा आवाज दाबतो. आपले मन आपल्याला कधीच धोका देत नाही. ते आपल्याला गुरुसमान मार्गदर्शन करते. चूक-बरोबर याची जाणीव करून देते. त्याचे ऐका. या कोलाहलात मनाचा आवाज दाबून टाकू नका.
हे मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून हृदयस्थ परमेश्वर आहे. त्याच्याशी बोला. त्याचे ऐका. तो वक्ता आहे आणि श्रोता सुद्धा आहे. तो तुम्हाला कधीच एकटे पडू देणार नाही. त्याच्याशी मैत्री झाली, तर मन नेहमीच प्रसन्न राहील आणि सर्व प्रकारच्या सिद्धी तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील, अशी ग्वाही तुकोबाराय देतात.