पूजेच्या वेळी हातून मूर्ती भग्न पावणे अशुभ मानले जाते का? अशावेळेस शास्त्र काय सांगते, वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 09:08 AM2021-03-27T09:08:04+5:302021-03-27T09:08:47+5:30

पूजा 'उरकण्याच्या' नादात अनेकदा हातून मूर्तीची किंवा तसबिरीची मोडतोड होते आणि आता आपल्यावर काहीतरी अरिष्ट ओढावणार आहे, ही भीती मनाला लागून राहते. अपराधी भाव येतात. यावर शास्त्र काय सांगते, ते पाहू. 

Is it considered inauspicious to break an idol by hand during worship? Read what the Scriptures say! | पूजेच्या वेळी हातून मूर्ती भग्न पावणे अशुभ मानले जाते का? अशावेळेस शास्त्र काय सांगते, वाचा!

पूजेच्या वेळी हातून मूर्ती भग्न पावणे अशुभ मानले जाते का? अशावेळेस शास्त्र काय सांगते, वाचा!

googlenewsNext

'देवाचिये द्वारी उभा क्षणभरी' अशी आपल्या सर्वांचीच अवस्था झाली आहे. पूर्वीच्या काळी आपले आजी आजोबा देवपूजेसाठी जेवढा वेळ देत, तेवढा वेळ देणे आपल्याला शक्य होत नाही. म्हणून आपण पूजा अक्षरशः उरकतो! वरून म्हणतो, नाश्ता करतो आणि पूजा उरकतो. वास्तविक हे उलट झाले पाहिजे. पूजा उरकण्याची बाब नाही. ती करण्याची बाब आहे. देवपूजा देवासाठी नसून ती आपल्या मनःशांतीसाठी असते. दिवसभराच्या गडबडीत काही क्षण देवापाशी आपले मन स्थिर व्हावे, यासाठी देवपूजेचा उपचार सांगितला आहे. 

परंतु, तसे होत नाही. पूजा 'उरकण्याच्या' नादात अनेकदा हातून मूर्तीची किंवा तसबिरीची मोडतोड होते आणि आता आपल्यावर काहीतरी अरिष्ट ओढावणार आहे, ही भीती मनाला लागून राहते. अपराधी भाव येतात. यावर शास्त्र काय सांगते, ते पाहू. 

सनातन धर्मामध्ये पूजेचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये साकार, निराकार हे दोन मुख्य प्रकार आहेत. साकार पूजेमध्ये देवतांचा फोटो, मूर्ती यांची आपण पूजा करतो, तर निराकार पूजेत केवळ नामस्मरण करतो किंवा मानसपूजा करतो. आपण सगळे जण सगुण भक्तीशी जोडलेले आहोत. 

मूर्तिपूजेशिवाय पूजा झाली, असे आपल्याला वाटत नाही. म्हणून देवघरात आपल्या दैवतांची मूर्ती किंवा तसबीर आपण ठेवतो. या मूर्ती बहुतेक करून चांदीच्या किंवा पितळ्याच्या असतात. रोज पूजा करताना, देवाला स्नान घालताना मूर्तींशी आपला संपर्क येतो. मूर्तीला स्नान घालून जागेवर ठेवताना, किंवा देव उजळताना त्यांच्या नाजूक भागाला धक्का लागून कधी कधी मूर्ती भग्न पावतात. जसे की अन्नपूर्णेची पळी, दत्तात्रयाचे त्रिशूळ, शंकराचा फणाधारी नाग, गणेशाच्या हातातील अंकुश यांचे काम नाजूकपणे केलेले असेल, तर ते भग्न पावण्याचे प्रकार सर्वाधिक घडतात. 

हेच तसबिरींच्या बाबतीतही घडते. फुल किंवा हार वाहताना, गंध लावताना, तसबीर पुसून स्वच्छ करून ठेवताना अनेकदा हातातून निसटते आणि भेगाळते. असे प्रकार घडल्यावर आधी वाईटात वाईट विचार मनात येतात. दरम्यान काही वाईट घटना घडली, तर त्याचाही संबंध या घटनेशी लावला जातो. किंवा काहीतरी अरिष्ट घडणार ही टांगती तलवार डोक्यावर असते. 

परंतु तसे काहीही होत नाही. हा केवळ अपघात आहे. हातून काचेचा कप फुटावा, एवढी सामान्य ही बाब आहे. त्याचे अवडंबर करण्याची अजिबात आवश्यकता नाही. याचा अर्थ धसमुसळेपणा करणेही योग्य नाही. म्हणून पूजा उरकण्याऐवजी ती शांतपणे केली, तर हे अपघात टाळता येतात. 

तरीदेखील, हातून अशा गोष्टी घडल्या तर त्या मूर्ती देव्हाऱ्यात तशाच ठेवाव्यात का? तर नाही. पूजा करताना दररोज त्या भग्न मूर्ती पाहून आपले मन विचलित होईल आणि पूजा करताना खंड पडेल. तसेच मनाला रुखरुख लागून राहील. ज्याप्रमाणे प्रिय व्यक्तीला जखम झाली तर आपल्याला दुःख होते, तसे देवमूर्तीला तडा गेली तर आपले मन हळहळते. यावर उपाय म्हणजे मूर्ती विसर्जित करणे. 

जुने फोटो, भग्न मूर्ती वाहत्या पाण्यात सोडून देणे सर्वार्थाने उचित ठरते. कारण, त्या गोष्टी प्रवाहाबरोबर वाहत पुढे जातात. म्हणून साचलेल्या पाण्यात, डबक्यात अशा गोष्टी टाकू नये. मातीच्या भग्न जुन्या मूर्ती जमीनित पुरल्यामुळे कालांतराने त्या मातीशी एकरूप होतात. अशा मूर्ती मातीत पुरण्यापूर्वी त्यांवर श्रद्धेने हळद कुंकू अक्षता वाहाव्यात. तसेच नवीन मूर्ती घेताना त्या जाणीवपूर्वक माती, दगड, वाळूपासून बनवलेल्या विकत घ्याव्यात. अशा मूर्ती विसर्जित करताना निसर्गाशी सहज एकरूप होतात. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नदीत किंवा समुद्रात सोडून न देता त्यांना जाळण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु तसे करतानाही श्रद्धापूर्वक मूर्तीला निरोप द्यावा.

कागदी फोटो किंवा शाडूच्य मूर्ती असतील तर त्या एका बादलीत पाणी भरून त्यात विरघळू द्या. त्याचा लगदा तयार झाला की तो लगदा वापरून एखादे झाड लावा. फोटो फ्रेम असतील, तर काळजीपूर्वक फोटो फ्रेममधून बाहेर काढून घ्या. फ्रेम तुटलेली असेल, तर ती टाकून देता येईल व फोटो पाण्यात विरघळून किंवा झाडाच्या मातीत मिसळता येईल. हाच नियम जुन्या पोथ्यांच्या बाबतीत वापरता येईल. वाहत्या पाण्यात पोथी विसर्जित करता येईल.

Web Title: Is it considered inauspicious to break an idol by hand during worship? Read what the Scriptures say!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.