दर वेळी संकटाला सामोरे न जाता प्रसंगी जीव वाचवणेही महत्त्वाचे असते; घेऊया महापुरुषांकडून धडा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 03:25 PM2022-01-22T15:25:55+5:302022-01-22T15:26:19+5:30
प्रसंगी खुद्द श्रीकृष्णाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा हेच धोरण अवलंबिले होते.
धैर्य ही केवळ रणांगणात दाखवण्याची गोष्ट नाही. तर बारीकसारीक निर्णय प्रक्रियेत अचूक निर्णय घेण्यासाठी लागणारा विचार देखील धैर्याचे प्रतीक आहे. कोणताही निर्णय योग्य असतोच असे नाही, तर तो योग्य आहे हे सिद्ध करावे लागते. त्या निर्णयाच्या क्षणी वापरलेल्या सद्सदविवेकबुद्धीलाही धैर्य म्हणतात. प्रत्येक गोष्टीचा सामना करण्यासाठी धैर्य लागते. ते शारीरिक, मानसिक आणि आर्थिक स्वरूपाचे असते. त्याचा योग्य वेळी योग्य तऱ्हेने वापर करावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी उघडपणे केलेले युद्ध हे धैर्य आणि प्रसंगी केलेला गनिमी कावा, हेदेखील धैर्यच! कृष्णाने केलेले कालियामर्दन हे धैर्य आणि युद्धप्रसंगी रणछोडदास म्हणून पत्करलेली भूमिकासुद्धा धैर्यच! कंस वधानंतर मगधचा जरासंध राजा मथुरेवर आक्रमण करणार होता. कृष्णाने विचार केला, माझ्या एकट्यामुळे मथुरेवर संकट नको, म्हणून त्याने सुरक्षित जागी पलायन केले. लोक काय म्हणतील याचा विचार न करता त्याने रणछोडदास हे विशेषण पत्करले. हे धैर्याचेच प्रतीक म्हणायला हवे ना...!
विपत्काली धैर्य प्रभुपणि सहिष्णुत्व बरवे,
सभे पांडित्याचा प्रसर समरी शौर्य मिरवे,
स्वकीर्तीच्या ठायी प्रचुर अति विद्याव्यसन जे,
तयांचे हे स्वाभाविक गुण सहा सत्पुरुष ते।
संकटकाळी धैर्य? ते पाहिजेच की हो! पण मग एकट्या सत्पुरुषांनाच काय म्हणून? एवढी लहानशी मांजरदेखील बघा, कोणी शेपटी ओढली तर कशी फिसकन अंगावर येते! हाताचा उगारलेला पंजा आणि नागाचा फणा कशाचे प्रतीक आहे? विपत्काला धैर्याचेच ना? म्हणजे एकूणच काय? विपत्काली धैर्य हा स्वाभाविक गुण केवळ सत्पुरुषांनाच लागू होतो असे नाही, तर तो सजीवांचा, अखिल प्राणीमात्रांचा स्वाभाविक गुण आहे. सत्पुरुषांचे धैर्य हे तुमच्याआमच्यापेक्षा निराळे तर नाही ना? याचा विचार करता सॉक्रेटिसची गोष्ट आठवली.
अथेन्समध्ये एका वक्त्याचे धैर्य म्हणजे काय? या विषयावर घणाघाती भाषण झाले. हुतात्म्याची गोष्ट सांगून वक्त्याने समारोपात म्हटले, की अशा तऱ्हेने संकटसमयी तत्व न सोडणे म्हणजे धैर्य!
सॉक्रेटिस खवचट! तो त्या वक्त्याला म्हणतो कसा, 'माफ करा महाशय, तुमच्या भाषणातून धैर्य म्हणजे काय याचा मला बोध झाला नाही. संकटसमयी तत्त्व न सोडणे म्हणजे धैर्य असे आपण म्हणतात. समुद्रात असताना जीवितरक्षणासाठी जहाजावरची जागा सोडू नये, हे तत्व म्हणून ठिक आहे. पण जहाजच बुडू लागले तर?'
यावर वक्ता गडबडला. तो म्हणाला, 'ते निराळं आहे. अशावेळी तत्व सोडणे. जागा सोडणे महत्वाचे आहे. तेदेखील धैर्य आहे.'
मग सॉक्रेटिस इथे थांबतोय का? तो म्हणाला, 'महाशय याचा अर्थ असा झाला, की संकटकाळी तत्व न सोडणे म्हणजेही धैर्य आणि तत्व सोडणे म्हणजेही धैर्य, हे खरे ना?'
वक्ता चक्रावून गेला. सॉक्रेटिसला शरण येऊन म्हणाला, 'खरे म्हणजे धैर्य म्हणजे काय हे मलाच कळले नाही.'
शेवटी सॉक्रेटिस म्हणाला, 'भावनेच्या आहारी न जाता सारासार विचार करून मनाला पटेल तसे वागणे, याला` धैर्य म्हणूया का?'
सॉक्रेटिसने केलेली धैर्याची व्याख्या पाहता मला क्षणार्धात सगळी कोडी उलगडली. सावरकरांची ती समुद्रात घेतलेली उडी, गांधीजींचा प्रामाणिकपणा, शिवाजी महाराजांनी घेतलेला आग्र्याचा निर्णय, विवेकानंदांचे शिकागोतील भाषण, न्या. रानडे यांनी दुसऱ्या लग्नानंतर समाजाची सोसलेली टीका, ही धैर्याची रूपे नव्हे का?
म्हणून कुठलेही आव्हाने आले, की त्याला धीराने तोंड द्या. लगेच बाहू स्फुरण पावून चार हात करायला धावू नका. शांतपणे विचार करून प्रतिसाद द्या. तो विचार तुमच्या ठायी असलेल्या धैर्याची खूण पटवून देईल.