पूजेच्या वेळी शंखनाद करणे लाभदायकच; मात्र शंखनादाच्या वेळी टाळा 'या' चुका!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 03:32 PM2022-03-11T15:32:33+5:302022-03-11T15:33:03+5:30
भगवान विष्णूला शंखोदक अर्पण करणे शुभ मानले जाते. परंतु भगवान शिव आणि सूर्यदेवाला कधीही शंखोदक अर्पण करू नाहीत. जाणून घ्या अधिक माहिती ...
सनातन धर्मात शंखाला खूप महत्त्व आहे. नियमितपणे शंखनाद केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासोबतच घरातील संकटांपासून मुक्ती मिळते. भगवंताचे अधिष्ठान राहते. म्हणून आपण पूजेच्या वेळी शंखनाद करतो तसेच शंखोदक घेतो आणि देवघरात शंख ठेवून त्याची पूजाही करतो. मात्र शंखनादाबरोबर शंखाशी संबंधित काही चुकीच्या गोष्टी टाळायला हव्यात. त्या गोष्टींबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
शंखाचे महत्त्व
शास्त्रानुसार चौदा रत्नांपैकी एक मानल्या जाणाऱ्या शंखाची उत्पत्ती समुद्रमंथनाच्या वेळी झाली. म्हणूनच शंख देवी लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. म्हणूनच भगवान विष्णूशीदेखील त्याचा संबंध आहे.
धार्मिक मान्यतेनुसार, शंख हे भगवान विष्णूच्या शस्त्रांपैकी एक मानले जाते. भगवान विष्णूंच्या हातात चक्र, गदा, कमळाचे फूल आणि शंख आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की ज्या घरात शंख वाजविला जातो, त्याच्या ध्यानाने भगवान विष्णू आकर्षित होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते.
शंख वाजवण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या
>>देवघरात शंख ठेवल्यास एक नाही तर दोन शंख आणावेत. एक शंख वाजवण्यासाठी आणि दुसरा अभिषेकासाठी!
>>जो शंख तुम्ही शंखनादासाठी घेता, तो शंख देवघरात पूजेसाठी वापरू नये, कारण तो शंख ओठाचा स्पर्श झाल्याने उष्टा होतो.
>>त्याचबरोबर पूजेसाठी वापरत असलेला शंख शंखनादासाठीही वापरू नका. यासाठीच २ स्वतंत्र शंख आणावेत असे सुरुवातीला म्हटले आहे.
>>देवघरात एका वेळेस एकच शंख पूजेसाठी ठेवावा. दुसरा शंख देवघरातल्या सामानाजवळ किंवा कलशाजवळ ठेवावा.
>>शंख नाद करण्याचा शंख पांढर्या कपड्यात गुंडाळून देवघराजवळ ठेवावा. म्हणजे त्याचे पावित्र्य राखले जाते आणि एकावेळी एकच शंख पुजला जातो.
>>भगवान विष्णूला शंखोदक अर्पण करणे शुभ मानले जाते. परंतु भगवान शिव आणि सूर्यदेवाला कधीही शंखोदक अर्पण करू नाहीत
>>शंख फुंकण्यापूर्वी एकदा गंगेच्या पाण्याने धुवावे. जर गंगाजल नसेल तर तुम्ही साधे पाणी देखील वापरू शकता.
>>पूजेसाठी नेहमी शंखात पाणी ठेवावे. रोज पूजा केल्यानंतर हे पाणी घरभर शिंपडावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि सुख-शांती राहते.
>>तुमचा शंख कधीच कोणाला वापरायला देऊ नका किंवा इतरांचा तुम्ही वापरू नका.
>>शंखनादाची वेळ सकाळच्या पूजेसाठी उत्तम असते. याव्यतिरिक्त सायंकाळी, रात्री शंखनाद करू नये.