गीतेचे सार नव्हे, हे तर जीवनाचे सार!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: December 22, 2020 01:35 PM2020-12-22T13:35:04+5:302020-12-22T13:37:31+5:30
गीता वाचावी, नाही जमले तर गीतेचे सार वाचावे, तेही जमले नाही, तर गीतेवरील चित्र पहावे. आपण अर्जुन आहोत आणि आपल्या जीवनरथाची सूत्रे भगवंताच्या हाती आहेत. एवढे कळले, तरी गीता आपल्याला कळली, असे म्हणता येईल.
ज्योत्स्ना गाडगीळ
दु:खं कशामुळे होते, तर अपेक्षांचे ओझे वाहिल्यामुळे. ज्या दिवशी आपण हे ओझे उतरवून ठेवायला शिकतो, त्यादिवसापासून आयुष्यात कोणत्याही गोष्टींचे दु:खं वाटणे बंद होते. ही सहज सोपी परंतु आचरणात आणण्यासाठी अतिशय अवघड गोष्ट आहे. परंतु, एकदा का जमली, की स्वर्ग अवघ्या दोन बोटांवर भासू लागतो. हेच तत्वज्ञान भगवद्गीतेच्या शेवटी लिहिले आहे. त्यात अठरा अध्यायांचे मर्म सामावले आहे. म्हणून त्याला केवळ गीतेचे सार नाही, तर आयुष्याचे सार म्हणणे उचित ठरेल.
हेही वाचा : एखाद्या घावाने तुम्हीही दुखावले आहात का?; खचू नका, कारण...
जो हुआ वह अच्छा हुआ है,
जो हो रहा है, वह अच्छा हो रहा है,
जो होगा वह अच्छा होगा,
तुम्हारा क्या गया, जो तुम रोते हो,
तुम क्या लाए थे, जो तुमने खो दिया,
तुमने क्या पैदा किया, जो नष्ट हो गया,
तुमने जो लिया, यही से लिया,
जो दिया, यही पर दिया,
जो आज तुम्हारा है,
कल किसी और का था,
कल किसी और का होगा।
घरातल्या, कार्यालयातल्या भिंतींवर ठळक अक्षरात हे शब्द लिहून ठेवावेत आणि ज्या ज्या वेळेस उद्वेगजन्य परिस्थिती निर्माण होईल, त्या त्या वेळेस १०० आकडे उलट म्हणण्याऐवजी गीतेचे सार लक्षपूर्वक वाचावे. जमल्यास पाठ करून आत्मसात करावे.
'जे होते, ते चांगल्यासाठी', असे आपण दुसऱ्याच्या बाबतीत पटकन म्हणतो. कारण परदु:ख शीतल असते. दुसऱ्याच्या वेदना आपण समजू शकत नाही. शाब्दिक मलमपट्टी म्हणून आपण होईल सगळं ठिक किंवा जे होते ते चांगल्यासाठी असे म्हणत सारवासारव करतो. परंतु, हे साधे वाक्य नाही, तर आयुष्यातील प्रत्येक परिस्थितीकडे सकारात्मकतेने बघायला शिकवणारा दृष्टीकोन आहे. कोणत्याही घटनेची आपण नकारात्मक बाजू आधी पाहतो. मात्र, ते पाहण्याच्या नादात सकारात्मक बाजू पाहणे राहूनच जाते. गीतेचे सार लिहिताना, सुरुवातच या सकारात्मकतेने केली आहे.
दुसरी ओळ आपल्याला दिलासा देते, जे होत आहे आणि जे होणार आहे, तेही चांगल्यासाठीच होणार आहे. उगीच काळजी करून आताचा क्षण वाया का घालवायचा? त्यापेक्षा सकारात्मकतेचे बळ जगण्याची उमेद देते. दिलासा मिळतो. उद्या काही वाईट घडलेच, तर त्यातूनही काहीतरी चांगले घडेलच, फक्त ते पाहणारा दृष्टीकोन असू द्या.
जन्माला येताना आणि मृत्यू पावताना आपले हात रिकामे होते आणि रिकामेच राहणार आहेत. हे सत्य माहित असूनही मनुष्य आयुष्यभर सगळ्या वस्तू, धन, संपत्ती यांची जमवाजमव करत राहतो, लोकांशी वैर घेतो, त्यांना बोल सुनावतो. गीतेत म्हटले आहे, तुम्ही काही आणलेच नव्हते, तर गमावण्याची भीती किंवा काळजी कशाला? जे घेतले, ते इथूनच, जे कमावले तेही इथूनच. जाताना सगळे इथेच ठेवून जायचे आहे, मग व्यर्थ चिंता कशाला? जे तुम्ही माझे माझे म्हणत मिरवता, उद्या ते दुसऱ्या कोणाचे होणार आहे, त्यावर कायमस्वरूपी तुमचा हक्क राहणार नाही. सत्तांतर कायमच होत राहते.
या सर्व गोष्टी आपल्याला कळत नाहीत का? कळतात, फक्त वळत नाहीत. ते वळवण्यासाठी हे सुविचार मनावर बिंबवले गेले पाहिजेत. अनुसरता आले पाहिजेत. आयुष्याचे गणित आपोआप सुटेल. म्हणून गीता वाचावी, नाही जमले तर गीतेचे सार वाचावे, तेही जमले नाही, तर गीतेवरील चित्र पहावे.
एकदा एका श्रोत्याने कीर्तन संपल्यावर कीर्तनकारांना विचारले, `महाराज, मी गीता वाचून पाहिली, पण मला काहीच समजले नाही.' त्यावर महाराज म्हणाले, 'हरकत नाही. गीता कळली नाही, तरी गीतेचे चित्र तुम्हाला नक्की कळेल. ते रोज पाहत जा. चित्र अतिशय सोपे आहे. आपण अर्जुन आहोत आणि आपल्या जीवनरथाची सूत्रे भगवंताच्या हाती आहेत. एवढे कळले, तरी गीता आपल्याला कळली, असे म्हणता येईल.'
हेही वाचा : अवघ्या दीनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे...