नामासाठी चित्त एकाग्र होणे महत्त्वाचे नाही, तर चित्त एकाग्र होण्यासाठी नाम घ्यावे!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 6, 2021 08:00 AM2021-01-06T08:00:00+5:302021-01-06T08:00:06+5:30
नाम घेण्यासाठी चित्त एकाग्र होईल, याची वाट बघू नका, तर चित्त एकाग्र होण्यासाठी नाम घेत राहा. नाम घेता घेता चित्त आपोआप एकाग्र होईल.
ज्योत्स्ना गाडगीळ
पहाटे उठून व्यायाम करा, रात्री जागून अभ्यास करा, मन लावून ग्रंथांचे वाचन करा, रोज एकदा तरी जपाची माळ ओढा, काही क्षण देवाच्या सान्निध्यात घालवा. अशा सूचनांचे पालन करा म्हटले, की त्या क्षणापासून मनाची चलबिचल सुरू होते. याउलट, सिनेमा बघताना, सहलीला जाताना, गाणी ऐकताना, नाचताना, गाताना, गप्पा मारताना मन एकाग्र करा, हे सांगावे लागत नाही. ते आपोआप होते. कारण त्या गोष्टी आपल्या आवडीच्या असतात. मात्र हरीनामाची आवड आपण लावूनच घेतलेली नसते. संत नामदेव तर उपहासाने म्हणतात,
कीर्तनी बैसता निद्रे नागविले,
मन माझे गुंतले, विषयसुख।
पूर्वी मनोरंजनाची साधने नसल्यामुळे गावकरी काम संपवून रात्री कीर्तनाला जात असत. रात्रीचा गारवा, कीर्तनकारांचे निरुपण, तालासूरांची मंद जोड आणि पाठीला मंदिराच्या खांबाचा टेकू मिळाला, की श्रोत्यांची ब्रह्मानंदी टाळी लागत असे. त्यांना पाहून कीर्तनकार वरचेवर हरिनामाचा गजर घेत असत. झोपी गेलेले जागे होत आणि पुन्हा डुलत डुलत कीर्तनात रंगून जात असत. याचेच वर्णन नामदेव महाराज करतात, मन विषयसुखात जेवढे रंगलेले असते, तेवढे हरिनामात रंगत नाही.
हेही वाचा : खरे संत कसे ओळखावेत, सांगत आहेत संत निळोबा राय!
यावर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, 'नाम घेण्यासाठी चित्त एकाग्र होईल, याची वाट बघू नका, तर चित्त एकाग्र होण्यासाठी नाम घेत राहा. नाम घेता घेता चित्त आपोआप एकाग्र होईल. ज्याप्रमाणे मीठ पाण्यात विरघळले असता, त्याचे वेगळे अस्तित्त्व राहात नाही, तसेच नाम घेण्याची सवय लागल्यावर चित्त वेगळे राहात नाही. मात्र, त्यासाठी नामाची गोडी लावून घ्यावी लागते.'
नाम घेताना मन लागत नसेल, तर त्यावर गोंदवलेकर महाराज पर्याय सुचवतात, ज्याप्रमाणे अभ्यास करताना मुलांना आपण मोठ्याने वाचायला सांगतो, जेणेकरून सगळे लक्ष वाचनावर केंद्रित होते, त्याप्रमाणे नामस्मरणही मोठ्याने घ्यावे, म्हणजे लक्ष विचलित होणार नाही. आपण घेतलेले नाम आपल्या कानावर पडून त्याचेच चिंतन होत राहील.
दुसरा पर्याय असा, की भगवंताला केवळ देवघरात न शोधता चराचरात पाहावे. आपल्या सभोवतालीच्या गोष्टी भगवंतमय दिसू लागल्या, की आपल्याकडून चांगलेच कार्य घडत राहील आणि आपोआप देवाची भक्ती घडेल.
हेही वाचा : तुका म्हणे माझे, हेचि सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने!