Ganesh Jayanti : मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेणे शक्य नाही? मग या शब्दचित्रातून बाप्पाचे दर्शन घ्या!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 15, 2021 09:00 AM2021-02-15T09:00:00+5:302021-02-15T09:00:00+5:30
Ganesh Jayanti : एखाद्या कसलेल्या चित्रकाराने रेखीव आणि ठाशीव रेषांनी चित्र रेखाटावे, तसे शब्दचित्र कवीने नजरेसमोर उभे केले आहे.
गणपती हा त्याच्या भक्तांच्या प्रतिभेला नेहमीच आव्हान देणारा, विविध प्रकारांनी भजन करावे असा स्फुर्तिदाता आहे. आज त्याचा जन्मदिवस. मंदिरात जाऊन त्याचे दर्शन घेणे शक्य नसेल, तर कवी विष्णुदास यांनी रेखाटलेल्या शब्दचित्रातून गणेशाचे दर्शन घेऊया आणि माघी गणेश जन्म साजरा करूया.
नमो गणराया मंगलमूर्ती, सकल विबुधगण मंगल गाती,
रत्नजडित शिरी मुकुट विराजे, कुंडल कानी हालती,
दुवारंकुरदळ शमिपुष्पाचे, हार गळ्यामध्ये डुलती,
शुंडा-दंडित मोदक मंडित, आयुधे करी लखलखती,
विष्णुदासाचे मनभृंगा, चरणकमल विश्रांती।
श्रीगजानन गणेश हा बुद्धिदाता आहे. ज्ञानेश्वरमाऊलींनी सर्व साहित्यसृष्टीतच गणेशाचे अतिभव्य रूप पाहिले. ज्ञानदेवांचा हा वाङमय गणेश गेली सातशे वर्षे महाराष्ट्रात सर्वांनाच आकर्षून घेत आहे. सर्वच साधु संतांनी आणि कवींनी गणेशनमने लिहिली आहेत. गणेशाची भक्तिपर कवने रचली आहेत. या ठिकाणी दिलेल्या भजनात योग्य शब्दात गणपतीचे यथातथ्य वर्णन केलेले आहे. गणपतीवर विविध प्रकारची वाङमयीन रूपके अनेकांनी लिहिली आहेत. इथे मात्र साध्या, सोप्या, नेटक्या आणि यथार्थ शब्दांत सायुध, सालंकृतत, मंगलमूर्ती गणरायाला आपणासमोर मूर्तिमंत रंगवले आहे.
कवी म्हणतात, हे गणराया तू मंगलमूर्ती आहेस, तुला माझा नमस्कार असो. सगळे ज्ञानी आणि बुद्धिमंत तुझ्या कृपेने मांगल्यपूर्ण अशी कवने गात आहेत. तुझी स्तुती करीत आहेत, तुझे भजन आळवीत आहेत. तुझ्या शिरोभागी तेज:पुंज मस्तकावर रत्नजडित मुकुट शोभतो आहे. तुझ्या कानात रत्नकुंडले हलत आहेत. दुर्वांकुराचे, शमीचे आणि फुलांचे असे विविध प्रकारचे हार तुझ्या गळ्यात डुलताहेत. तुझ्या हातात पाश, अंकुश, त्रिशूळ इ. आयुधे म्हणजे शस्त्रास्त्रे तर नुसती लखलख करत आहेत. दुष्टदुर्जनांच्या छातीत धडकी भरत आहे. तुझा महासामर्थ्यशाली शुंडादड तुझ्या बळाची जाणीव करून देतो. तुझ्या हातात मोदक आहेत आणि विष्णुदास कवीच्या मनाचा भुंगा तुझ्या चरणकमळांच्या ठायी विश्रांती मिळो अशी प्रार्थना करतो आहे.
किती प्रासादिक आणि नेहमीच्या परिचयाच्या शब्दातून गणपतीचे वर्णन करणारे हे भजन आहे. विशिष्ट शब्दयोजनेमुळे आणि गाण्यास अतिशय सुलभ असल्याने ते लोकप्रिय आहे. एखाद्या कसलेल्या चित्रकाराने रेखीव आणि ठाशीव रेषांनी चित्र रेखाटावे, तसे शब्दचित्र कवीने नजरेसमोर उभे केले आहे.