देवाकडे काहीही मागणे योग्य असते की अयोग्य? वाचा हा दृष्टांत!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 10:01 AM2021-06-15T10:01:48+5:302021-06-15T10:02:08+5:30

देवाकडे काही मागायचेच असेल, तर देवाचे सान्निध्य मागावे. त्याची सेवा मागावी. आपोआप आपले मनोरथ पूर्ण होते. 

Is it right or wrong to ask God for anything? Read this illustration! | देवाकडे काहीही मागणे योग्य असते की अयोग्य? वाचा हा दृष्टांत!

देवाकडे काहीही मागणे योग्य असते की अयोग्य? वाचा हा दृष्टांत!

googlenewsNext

आपण सगळेच देवाकडे गेल्यावर काही ना काही मागत असतो. जेवढे काही मिळालेले आहे, त्याबद्दल समाधान न मानता काय मिळाले नाही, याबद्दल देवाकडे तक्रार करतो. एका कवितेत एक कवी म्हणतात, 

आम्ही देवळात जाऊन दुकानात गेल्यासारखे वागतो,
चार आठाणे टाकून काहीतरी मागतो!

आता चार आठाण्यांचा जमाना राहिला नाही. म्हणून आताचे भक्त देवाला सोने, चांदी, हिरे, गाडी, बंगला ऑफर करतात. पण अशा प्रलोभनांना भूलेल तो देव कसला? देव तर भावाचा भुकेला. त्याला हवा असतो तो केवळ शुद्ध भाव! त्याचा मात्र असतो अभाव! आपण देवाकडे मागत राहतो आणि देव देत राहतो. कारण असे मागणारे देवाला जवळ नकोच आहेत. जे आपल्याकडचे दुसऱ्याला देऊ करतात आणि देवाला आपलेसे करतात, असेच भक्त देवाला हवे आहेत. म्हणून देवाकडे जाऊन काहीही मागणे म्हणजे देवाला आपल्यापासून दूर करण्यासारखे आहे. 

देवाकडे काहीही का मागू नये. याबाबत समर्थ रामदास स्वामींचा एक दृष्टांत सांगितला जातो. समर्थांचा शिष्य समर्थांना विचारतो, 'गुरुदेव, देवाकडे आपण काहीही मागणे योग्य असते का? आणि योग्य असले तर काय मागितले पाहिजे?'

समर्थ आपल्या शिष्याला घेऊन एका राजाच्या महालाबाहेर गेले. दूर एका झाडाखाली ते दोघे उभे होते. तिथून राज दरबारातील परिसराचे अवलोकन करत होते. त्या परिसरात एक भिकारी बसला होता. जाता येता राजाची दृष्टी आपल्यावर पडावी या हेतूने तो तिथे बसला होता. समर्थांनी त्याच्याकडे बोट दाखवत शिष्याला सांगितले, भिकारी राजाकडे काही न मागता केवळ त्याच्या दृष्टीक्षेपात येण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला काय गरज आहे, हे राजाने ओळखावे आणि त्याला मदत करावी, अशी भिकाऱ्याची अपेक्षा आहे. त्यानुसार राजाची त्याच्यावर नजर जाताच, सेवकांकरवी राजाने त्याला अन्न धान्य, कपडे दान दिले. भिकाऱ्याची गरज भागली. 

आपण मंदिरात जाऊन देवाकडे काही मागत असू तर आपल्यात आणि त्या भिकाऱ्यात काहीच भेद उरणार नाही. प्रश्न राहिला देवाच्या दृष्टीक्षेपात येण्याचा, तर तो आपल्या सर्वांकडे लक्ष ठेवून आहे. म्हणून त्याच्याकडे निदान ऐहिक सुखं मागण्याची आवश्यकता नाही. काही मागायचेच असेल, तर देवाचे सान्निध्य मागावे. त्याची सेवा मागावी. आपोआप आपले मनोरथ पूर्ण होते. 

Web Title: Is it right or wrong to ask God for anything? Read this illustration!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.