गर्भामध्ये असतानाही संस्कार घडवावे, ही खूप चांगली समज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 06:05 AM2020-05-23T06:05:41+5:302020-05-23T06:05:59+5:30
लहानपणापासून आई-वडील आपल्या मुलांवर एकसारखे संस्कार करतात. तरीसुद्धा प्रत्येकाचा व्यवहार, विचार करण्याची पद्धती, आवड-निवड निराळी असते. आज समाजात गर्भसंस्काराचे खूप महत्त्व आहे.
- नीता ब्रह्मकुमारी
महाभारतातील अभिमन्यूची भूमिका सर्वांना माहीतच असेल. गर्भामध्ये राहून चक्र व्यूहाचे ज्ञान घेणारा अभिमन्यू आपण कसा विसरू शकतो? जन्माला येण्यापूर्वीच कुणी इतकी मोठी विद्या आत्मसात करू शकतो, याचे कधी-कधी नवलच वाटायचे; पण आज हे सत्य आपणा सर्वांनाच समजले आहे. संस्कारांचे बीजारोपण जन्मानंतर नाही, तर जन्मापूर्वीच आपण करावे व ते कसे करावे, त्याचे महत्त्व आपण जाणून घ्यावे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात संस्कारांचे महत्त्व आहे. जसे संस्कार तसा स्वभाव, व्यवहार आणि त्यानुसार जीवन दिसून येते. आपण पाहिले असेलच की, घरामध्ये जितके सदस्य आहेत त्या प्रत्येकाचे संस्कार वेगवेगळे आहेत.
लहानपणापासून आई-वडील आपल्या मुलांवर एकसारखे संस्कार करतात. तरीसुद्धा प्रत्येकाचा व्यवहार, विचार करण्याची पद्धती, आवड-निवड निराळी असते. आज समाजात गर्भसंस्काराचे खूप महत्त्व आहे. सर्वप्रथम आपल्याला हे समजून घेणे गरजेचे आहे की, हे संस्कार नक्की कोणावर घडविले जातात? शरीरावर की शरीरामध्ये असलेल्या आत्म्यावर? शरीर हे एक साधन आहे, ज्याला ‘आत्मा’ ही शक्ती चालविते. प्रत्येक जन्मामध्ये जे आपण अनुभविले, त्या जन्मी मिळालेल्या जन्मदात्यांनी दिलेले संस्कार, परिस्थितीनुसार जो स्वभाव बनला, ज्या प्रकारच्या सवयी स्वत:ला लावल्या, असे खूप काही आत्मा मरणोत्तर स्वत:बरोबर घेऊन जातो.
फक्त एका जन्माचे नाही; पण कितीतरी जन्मांचे संमिश्रण प्रत्येकामध्ये आहे. जन्मानंतर मृत्यू आणि मृत्यूनंतर पुन्हा जन्म, अशा चक्रामध्ये सर्वच बांधले गेले आहेत; पण एखादी गर्भवती महिला जेव्हा नव्याने त्या आत्म्याचे स्वागत करते, तेव्हा अनेक प्रकारची काळजी त्या जन्मप्रसंगासाठी घ्यावी लागते. शरीराचे अवयव छोटे असले, तरी त्या आत्म्यामध्ये पूर्वजन्माचे खूप काही भरलेले असते. जन्माला आल्यानंतर खूप काही शिकविण्यापेक्षा गर्भामध्ये असतानाही संस्कार घडवावे, ही खूप चांगली समज आज पालकांमध्ये जागृत होत आहे.