भूतकाळ विसरणे कठीण, पण भविष्य घडवायचे असेल तर लक्षात ठेवा 'या' गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 06:35 PM2023-07-25T18:35:19+5:302023-07-25T18:37:07+5:30

असे म्हणतात, की ज्याला भविष्य घडवायचे असते ती व्यक्ती भूतकाळात रमत नाही तर वर्तमानात जगते, त्यासाठी या महत्त्वपूर्ण गोष्टी करा. 

It's hard to forget the past, but if you want to create the future, remember 'these' things! | भूतकाळ विसरणे कठीण, पण भविष्य घडवायचे असेल तर लक्षात ठेवा 'या' गोष्टी!

भूतकाळ विसरणे कठीण, पण भविष्य घडवायचे असेल तर लक्षात ठेवा 'या' गोष्टी!

googlenewsNext

भूतकाळात रमणे, हा मनुष्याचा स्थायी भाव आहे. परंतु, त्यात किती काळ रमावे, याचे बंधन आखायला हवे. अन्यथा आठवणींवर जगायची सवय लागते. आपण वर्तमानात जगायची सवय लावून घेतली पाहिजे. आज केलेले चांगले काम, भविष्यात भूतकाळाच्या आठवणी बनून समोर येणार आहेत, अगदी फेसबुक मेमरीसारख्या! म्हणून आपले लक्ष 'आज' वर केंद्रित केले पाहिजे. हिंदी मध्ये भूतकाळाला आणि भविष्यकाळाला `कल' असे संबोधले जाते. एक कल, म्हणजे काल आणि दुसरा कल म्हणजे उद्या. हे दोन्ही आपल्या हातात नाहीत, म्हणून आपला `कल' म्हणजे प्रभाव `आज'वरच असला पाहिजे. हे लक्षात घेऊन `कल हो ना हो' हे गाणे ऐकले, तर आपल्याला दोन्ही `कल' चा कल कोणत्या दिशेने आहे, हे लक्षात येईल. एक सुभाषितकार लिहितात,

गत शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिन्तयेत्
वर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षण:।।

गतकाळाचा शोक करू नका. भविष्यकाळाची चिंता करू नका. शहाणे लोक वर्तमानाकडे बघून जगत असतात. हेच गीतकार सुधीर मोघे गाण्यातून लिहितात, 'भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर...या वळणावर!'

चंदन उगाळले, तर खोड झिजेल, पण सहाण नाही. परंतु खोडाची झीज झाली, तरी किमान चंदन हाती येईल. आठवणींचे, दु:खाचे तसे नाही. ते जितके उगाळत राहू, त्यातून आपली मानसिक झीज होत राहिल. म्हणून सुभाषितकारांच्या सांगण्यानुसार, कालचा आणि उद्याचा विचार सोडून फक्त आजचा विचार करायला शिका. वक्त चित्रपटात प्रख्यात शायर साहिर लुधियानवी यांनीदेखील म्हटले आहे,

आगे भी जानेना तू, पिछे भी, जानेना तू, 
जो भी है, बस यही इक पल है।

झाल्या गोष्टीचा कधी खेद करू नये. इंग्रजीत एक वचन आहे, 'Don't cry over spilt milk' नासलेल्या दूधाबद्दल रडत बसू नका. पुढे तशी चूक होणार नाही, याबद्दल काळजी घ्या. झालेल्या चुकीतून शहाणे व्हा. रडत बसणे भेकडपणाचे लक्षण आहे.

आपल्या देशात दोन प्रकारची मंडळी भेटतात. पहिली मंडळी गतकाळाबद्दल अभिमान बाळगतात. आपले राष्ट्र पूर्वी परमवैभवात होते. तसे वैभव आपल्या राष्ट्राला मिळवून दिले की झाले. या विचारात ते इतिकर्तव्यता मानतात. पण हे वैभव कशामुळे गेले? तर परकिय आक्रमणामुळे. मोगल आले, इंग्रज, पोर्तुगीज आले. त्यांनी देशाला दारिद्रयात लोटले. ती स्थिती अजूनही फारशी बदललेली नाही. परकीयांनी आपल्यावर कसे अनन्वित अत्याचार केले याचा पाढा ते वाचत बसण्यापेक्षा, आपला देश हरतऱ्हेने स्वावलंबी कसा होईल, याचा विचार आणि कृती झाली पाहिजे. नुसत्या चर्चेतून सुडाची भावना निर्माण होते. त्यापेक्षा प्रगतीवर भर दिला पाहिजे.

लाँगफेलो नावाच्या इंग्रजी कवीने एक मार्मिक कविता केली होती, त्याचा अनुवाद ह. ना आपटे यांनी एका फटक्यात सांगितला,

गेल्या गोष्टी स्मरू नका, गतकाळाचा शोक फुका,
पुढचा भासो कितीही सुखाचा काळ, भरवसा धरू नका,

जसा गतकाळाचा शोक करू नये, तशी भविष्यकाळाची व्यर्थ चिंताही करू नये. आता आमचं कसं होणार, या विचाराने हातपाय गाळू नयेत. भविष्यकाळ घडवण्याची आपल्यावर आहे. यासाठी केशवसुतांनी `तुतारी' फुंकून आपल्याला संदेश दिला आहे, 

जुने जाऊ द्या मरणालागुनि, जाळुनि किंवा पुरून टाका,
सडत न एका ठायी, विक्रम काही करा, चला तर।

Web Title: It's hard to forget the past, but if you want to create the future, remember 'these' things!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.