Janmashtami 2021 : फटलणच्या कृष्ण मंदिरातील अशी कृष्णमूर्ती भारतातच काय, जगातही सापडणे अशक्य; जाणून घ्या तिचे वैशिष्ट्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 12:39 PM2021-08-23T12:39:30+5:302021-08-23T12:40:27+5:30

Janmashtami 2021 : भगवान श्रीकृष्णांनी आपल्या भक्तासाठी फलटण येथील 'गिरवी' ह्या ठिकाणी आपले अधिष्ठान मांडले. तेच ठिकाण आज 'दक्षिण भारतातील वृंदावन' म्हणून ओळखले जात आहे.

Janmashtami 2021: Such a Krishna idol in the Krishna temple of Phatlan is impossible to find in India or in the world; Get to know her features! | Janmashtami 2021 : फटलणच्या कृष्ण मंदिरातील अशी कृष्णमूर्ती भारतातच काय, जगातही सापडणे अशक्य; जाणून घ्या तिचे वैशिष्ट्य!

Janmashtami 2021 : फटलणच्या कृष्ण मंदिरातील अशी कृष्णमूर्ती भारतातच काय, जगातही सापडणे अशक्य; जाणून घ्या तिचे वैशिष्ट्य!

googlenewsNext

७०० वर्षांपूर्वी गिरवी येथे बाबुराव देशपांडे नावाचे सद्गृहस्थ राहत होते. ते श्रीकृष्णभक्त होते. कृष्णदर्शनाचा त्यांना ध्यास लागला होता. समाधीस्थ अवस्थेत असताना त्यांना साक्षात गोपालकृष्णाने दृष्टांत दिला आणि अमुक एका ठिकाणी शाळीग्राम मिळेल, अशी माहिती मिळाली. बाबुराव महाराजांनी शाळीग्रामचा शोध घेतला आणि खरोखरीच संबंधित जागी उत्खनन केल्यावर त्यांना शाळीग्राम मिळाला, ज्यावर विष्णुची चिन्हे होती. त्यातून गोपाळकृष्णाची साजिरी मूर्ती घडवून घ्यावी, अशी बाबुराव महाराजांची तीव्र इच्छा होती. मात्र, त्यांच्या मनासारखी मूर्ती घडवणारे कारागीर त्यांना मिळत नव्हते. बाबुराव महाराज अस्वस्थ झाले. त्यांनी कृष्णाचा धावा केला. 

काही काळातच 'जय-विजय' नावाचे दोन कारागीर बाबुराव महाराजांना येऊन भेटले. दारात आलेल्या कारागीरांची जोडी अजबच होती. त्यांच्यातला एक थोटा होता, तर दुसरा आंधळा. त्यांनी बाबूराव महाराजांना अपेक्षित असलेली मूर्ती बनवून देण्याचा दावा केला. बाबूराव महाराजांकडे पर्याय नव्हता. त्यांनी होकार दिला. दोघांची शारीरिक अडचण पाहता, ते मूर्ती कशी घडवणार, याबद्दल त्यांना कुतूहल वाटू लागले. त्यांच्या हाती शाळीग्राम सोपवून दिमतीला माणसे ठेवण्यात आली. मात्र, त्या दोघांनी एकांत मागून घेतला आणि एका खोलीत स्वत:ला बंदिस्त करून घेत संपूर्ण लक्ष मूर्तीवर केंद्रित केले. काही काळातच काम पूर्ण करून त्यांनी बाबुराव महाराजांसमोर मूर्ती ठेवली. आपल्या मनातली छबी सगुण साकार झालेली झालेली पाहून ते भावविभोर झाले. 

कुठेही जोड न लावता एकाच पाषाणाची चार फूट उंचीची  मूर्ती. त्यात कृष्ण एका पायावर उभा आहे. दुसऱ्या पायाची आढी घातली आहे.  केवळ पायाच्या अंगठ्यावर तो पाय टेकलेला आहे. यातच त्या मूर्तिकारांचे कौशल्य आहे. मूर्तीची घडण अतिशय रेखीव आहे. चेहऱ्यावर प्रसन्नता आहे. नेत्र विशाल व आकर्षक आहेत. मूर्तीच्या शरीरावरील, गळ्यातील, हातातील, कमरेवरील अलंकार पाषाणातूनच घडविले आहेत. दोन्ही  हात उजव्या बाजूस वर मुरली वाजवीत आहेत, अशा रीतीने दोन्ही हातांची बोटे कोरली आहेत.  त्या बोटांमध्ये आपण फक्त लाकडी मुरली ठेवावयाची, तोंडाचा भाग बरोबर मुरलीवर येतो. गोकुळ वृंदावन भागातीलच अलंकारांची सर्व घडण आहे. हातावरील रेषा (शिरा) देखील स्पष्ट दिसतात. कृष्णाच्या पायाजवळ दोन्ही गायी अगदी तल्लीन होऊन कृष्णाची मुरली ऐकत आहेत, असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर आहे. तसेच दर्शनी पट्टीवर चार लहान मानवी आकृती आहेत. त्या जय-विजय व दोन  मूर्तिकारांच्या आहेत. 

या मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हरि-हर ऐक्याचे घडणारे दुर्लभ दर्शन हे होय. ज्या सिंहासनावर श्रीगोपाळकृष्ण स्थापित आहेत ते सिंहासन शिवलिंगाकार (साळुंका रूपाचे) आहे. अशी मूर्ती भारतातच काय, तर जगातही सापडणे अशक्य! मूर्तीत हरीहर भेट साकारल्यामुळे त्यांचे सेवक हनुमंत, गरुड आणि नंदीही साकारले. 

मनासारखी मूर्ती घडवली, ह्या आनंदात बाबुराव महाराजांनी कारागिरांना आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले. परंतु, जेवणाआधी विहीरीवर स्नानासाठी जातो असे सांगून कारागीर अंतर्धान पावले. जणू काही, स्वत: भगवान श्रीकृष्णच आपल्या भक्ताला अभिप्रेत असलेली मूर्ती साकारून निघून गेले.

बाबुराव महाराजांना अपेक्षित असलेली प्रतिमा अपंग व्यक्तीने ज्ञानेंद्रियांनी जाणून घेतली, तर अंध व्यक्तीने आपल्या साथीदाराच्या सूचनेनुसार ती मूर्ती कर्मेंद्रियांनी घडवली. थोडक्यात, श्रीकृष्णाच्या उपदेशाप्रमाणे ज्ञानयोगाचा आणि कर्मयोगाचा पुरस्कार केला आणि भक्ती मार्गामुळे ज्ञान आणि कर्म योग प्रकट झाला. 

बाबुराव महाराजांनी मूर्तीची यथोचित पूजा करून प्रतिष्ठापना केली. मंदिराची सेवा योग्य माणसांच्या हाती सोपवली आणि इहलोकीचे कार्य संपले आहे, असे ठरवून मूर्तीस्थापनेनंतर वर्षभरातच संजीवन समाधी घेतली. ती जागा गोपालकृष्ण मंदिराच्या खाली तळघरात स्थित आहे.

गोपालकृष्ण मंदिराची माहिती बाबुराव महाराजांचे वंशज जयंत देशपांडे ह्यांच्याकडून मिळाली. देशपांडेंची सतरावी पिढी मंदिरासाठी आपले योगदान देत आहे. १९५७ मध्ये सरकारी नियमानुसार मंदिराचे ट्रस्ट करण्यात आले. तर २००५ ते २०१० मध्ये ह्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. 

गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि देशपांडे कुटुंबियांच्या सहयोगाने गोपालकृष्ण मंदिरात दरवर्षी जन्माष्टमीचा उत्सव केला जातो. भजन-कीर्तन-भागवत-ज्ञानेश्वरी पारायणे होतात. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला गोपाळकृष्णाच्या प्रतिमेची आणि पादुकांची मिरवणुक काढली जाते. कार्तिक महिन्यात काकड आरती होते. तर, वैशाख वद्य प्रतिपदेला बाबुराव महाराजांच्या समाधीवर अभिषेक व पूजा केली जाते. गोपाळकाल्याचे कीर्तन होते. त्यावेळेस संपूर्ण गाव गोळा होते आणि उत्सवात सहभागी होते. 

गोपालकृष्ण मंदिराचा आतील आणि बाहेरील परिसर अतिशय शांत आहे. त्यामुळे अनेक साधक तिथे येऊन उपासना करतात. लोकाग्रहास्तव कृष्णमंदिराच्या सभोवतालच्या परिसरात असलेल्या ओवरीत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

करवीर पीठाचे शंकराचार्य ,किशोरजी व्यास उर्फ स्वामी गोविंददेवगिरी, गुजरातचे स्वामी सवितानंद, स्वामी अवधूतानंद, भागवताचार्य धनंजयराव देशपांडे, मनोहर दीक्षित महाराज, वेदाचार्य विवेकशास्त्री गोडबोले, राजमाता कल्पना सरकार आदी दिग्गज मंडळींनी गोपालकृष्ण मंदिराला भेट दिली आहे. 

मंदिराचा इतिहास, मूर्तीची माहिती, उत्सवाच्या उपक्रमाची माहिती मिळावी, म्हणून जयंत देशपांडे ह्यांनी माहिती पुस्तिका प्रकाशित केली. तिचे प्रकाशन फलटणचे प्राचार्य ज्येष्ठ लेखक वक्ते शिवाजीराव भोसले ह्यांच्या हातून करण्यात आले होते. त्यांनीही बाबुराव महाराजांबद्दल गौरवोद्गार काढले आणि उपक्रमाचे कौतुक केले. तसेच ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रा. ना. शुक्ला व जागतिक मूर्तीशास्त्र  तज्ज्ञ डॉ. जी. बी. देगलुरकर ह्यांच्यावरही गोपालकृष्णाने मोहिनी घातल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

हा भाग दुष्काळी आहे. मात्र, मंदिरातील अनुष्ठानामुळे या पंचक्रोशीतील पावसाचे प्रमाण वाढले असल्याचे ग्रामस्थांनी अनुभवले आहे. अशा ह्या गोपालकृष्ण मंदिरात केवळ उत्सवालाच नव्हे, तर वर्षभर भक्त येत असतात. ह्या मंदिराची आणि परिसराची महती प्रत्येकाने स्वत: तिथे येऊन अनुभवावी, असे आवाहन विद्यमान उत्तराधिकारी जयंत देशपांडे करतात. फलटण एसटी स्टँडवरून गिरवीला जाणारी बस सेवा आहे. साधकांनी भेट देण्यापूर्वी देशपांडे (९८२३००९५८९) ह्यांच्याशी संपर्क साधून पूर्वसूचना द्यावी. या मंदिराबद्दल अधिक माहितीसाठी http://gopalkrishnamandirgirvi.org/ या संकेत स्थळाला भेट द्यावी. तर मग तुम्ही कधी भेट देताय, ह्या दक्षिण भारतातील वृंदावनाला? 
 

Web Title: Janmashtami 2021: Such a Krishna idol in the Krishna temple of Phatlan is impossible to find in India or in the world; Get to know her features!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.