Jaya Ekadashi 2023: भूत, पिशाच्च योनीतुन मुक्ती मिळवण्यासाठी केले जाते जया एकादशीचे व्रत; सविस्तर वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 07:00 AM2023-01-31T07:00:00+5:302023-01-31T07:00:02+5:30
Jaya Ekadashi 2023: या एकादशीचे महत्त्व श्रीकृष्णाने युधिष्ठिराला समजावले होते, आपणही ते जाणून घेऊ.
हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अतिशय महत्त्व आहे. १ फेब्रुवारी रोजी माघ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशी आहे. ही एकादशी जया एकादशी या नावे ओळखली जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. हे व्रत अतिशय पुण्यदायी मानले जाते. असे म्हटले जाते, की या व्रतामुळे भूत, पिशाच्च आदि योनीतून मुक्तता मिळते.
दर महिन्यात दोन एकादशी येतात. अशा रितीने वर्षभरात २४ एकादशी येतात. अधिक मासात आणखी दोन एकादशींची भर पडते आणि वर्षभरात २६ एकादशी होतात. माघ मासात षटतिला आणि जया एकादशी येते. आज जया एकादशी. तिलाच भिष्म एकादशी असेही म्हणतात. ही एकादशी केली असता चार लाभ होतात.
या एकादशीचे महत्त्व श्रीकृष्णाने युधिष्ठिराला समजावले होते. एकादशीमुळे मन आणि शरीर एकाग्र होते. प्रत्येक एकादशीचे वेगवेगळे महत्त्व आहे. जया एकादशीचे व्रत करणार्यांना शारीरिक आणि मानसिक व्याधीतून मुक्तता मिळते व मन शांत राहते. या व्रताचे पालन करणाऱ्याला पापातून मुक्तता मिळते, अशी श्रद्धा आहे.जया एकादशीच्या दिवशी रवियोग आणि त्रिपुष्कर योग एकत्र येत असल्यामुळे या तिथीचे महत्त्व वाढले आहे. जया एकादशीचे व्रत केल्यामुळे धन संपत्तीत वाढ होते व आपल्या दैनंदिन कार्यात यश प्राप्त होते.
हे व्रत तीन प्रकारे केले जाते. उपाशी राहून, फलाहार करून किंवा फक्त पाणी पिऊन! परंतु, आजच्या धकाधकीच्या जिवनात असे कठोर व्रत करणे सर्वांनाच शक्य होईल असे नाही. म्हणून शास्त्राने यावर पर्याय सुचवला आहे, तो म्हणजे नामस्मरणाचा. एकादशी ही विष्णूंची प्रिय तिथी आहे. त्यानिमित्त विष्णुसहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करणे, विष्णूंना भक्तीभावाने तुळस वाहणे किंवा गरजू लोकांना यथाशक्ती दान केले, तरी एकादशीचे पुण्य पदरात पाडून घेता येते.
'देव भावाचा भुकेला' असे संतांनी सांगून ठेवले आहे. त्याला अपेक्षित असलेली निस्सिम भक्ती आणि प्रामाणिकपणा त्याच्या सेवेत अर्पण केला, की व्रतपूर्ती झाली असे समजण्यास हरकत नाही.