शारीरिक आणि मानसिक व्याधीतून मुक्ती मिळवण्यासाठी केले जाते 'जया एकादशीचे' व्रत; वाचा मुहूर्त, विधी आणि महत्त्व!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 01:07 PM2021-02-19T13:07:48+5:302021-02-19T13:14:56+5:30
एकादशी ही विष्णूंची आवडती तिथी. दर एकादशीचे वेगळे महत्त्व आहे. जया एकादशी मनःशांती देणारी आहे.
एकादशीमुळे मन आणि शरीर एकाग्र होते. प्रत्येक एकादशीचे वेगवेगळे महत्त्व आहे. जया एकादशीचे व्रत करणाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक व्याधीतून मुक्तता मिळते व मन शांत राहते. या व्रताचे पालन करणाऱ्याला पापातून मुक्तता मिळते, अशी श्रद्धा आहे.
हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अतिशय महत्त्व आहे. २३ फेब्रुवारी रोजी माघ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशी आहे. ही एकादशी जया एकादशी या नावे ओळखली जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. हे व्रत अतिशय पुण्यदायी मानले जाते. असे म्हटले जाते, की या व्रतामुळे भूत, पिशाच्च आदि योनीतून मुक्तता मिळते.
जया एकादशी व्रताचे नियम : हे व्रत दोन प्रकारे केले जाते. निर्जल, फलाहारी किंवा जलीय व्रत. सामान्यत: जी व्यक्ति पूर्णपणे निरोगी असते, शरीराने सुदृढ असते, ती व्यक्ती निर्जल उपास करण्यास योग्य ठरते. अन्य लोकांनी फळे खाऊन किंवा पाणी पिऊन हे व्रत करावे. व्रताच्या आदल्या दिवशी सात्विक भोजन करावे. सकाळी आंघोळ केल्यावर धूप, दीप, फळ, पंचामृत भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णाच्या प्रतिमेची पूजा करावी. रात्री जपमाळ ओढावी किंवा भजन म्हणावे. दुसऱ्या दिवशी गरजवंताला दान दक्षिणा द्यावी आणि व्रत पूर्ण करावे.
जया एकादशीचा शुभ मुहूर्त : २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजून ५१ मीनिटांपासून ९ वाजून ९ मीनिटांपर्यंत असेल.