Jivati Vrat 2023: मराठवाड्यात गौरीचा मुखवटा बसवून केले जाते जिवती पूजन; वाचा कुलधर्म आणि पूजाविधी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 10:51 AM2023-08-18T10:51:00+5:302023-08-18T10:51:52+5:30
Jivati Puja 2023: सण एकच असला तरी दर दहा कोसावर संस्कृती बदलते, याचीच प्रचिती देणारे मराठवाड्यातले आगळे वेगळे जिवती पूजन!
>> योगेश काटे, नांदेड
मराठवाड्यात गौरीचा मुखवटा बसवून जिवती पूजन (Jivati Puja 2023)केले जाते. प्रत्येकाच्या घरच्या कुळधर्माप्रमाणे ही पूजा असते. कोणाकडे एकाच शुक्रवारी तर कोणाकडे चारही शुक्रवारी पुरणा -वरणाचा स्वयपाक, नैवेद्य व सवाष्ण जेवू घालतात. महाराष्ट्र,तेलंगाणा, तसेच कर्नाटक राज्यात वेगवेगळ्या पध्दतीने संपत शुक्रवारचा (Sampat Shukrawar 2023)कुळाचार केला जातो.
तेलंगाणात, कर्नाटक मध्ये वरदलक्ष्मी म्हणून हे व्रत केले जाते. श्रावणात येणाऱ्या प्रत्येक शुक्रवारी (Shravan Shukrawar 2023) श्री महालक्ष्मी चा मुखवटा स्थापन करतात व कुंकुमार्चन करतात. तेलंगाणात देवीस पायस तसेच कर्नाटकात हयग्रीवाचा नैवद्य दाखवतात. सवाष्णींना हळद कुंकवाला बोलवतात. पुजा अगदी आपल्या येथे भाद्रपदातील शुक्ल पक्षातील महालक्ष्मी पूजन आपण करतो तशीचअसते. आपल्या कडे प.महाराष्ट्र, कोकण, विदर्भ,खानदेश व मराठवाड्यात वेगवेगळ्या पध्दतीने हा कुळाचार केला जातो.
मराठवाड्यात खास करुन ब्राम्हण समाजात हा कुळाचार करतात. कोणी यास जेष्ठा देवी असे म्हणतात. या दिवशी घरातील स्त्रिया उपवास धरतात सकाळी देवीचा मुखवटा स्थापन करतात. तसेच आघाडा,केना,दुर्वा, विशेष करुन जास्वंदाचे फुल वाहिले जाते व दुध व साखरेचा तसेच गुळ फुटाण्याचा नैवद्य दाखवला जातो सकाळच्या पूजते. मग सोवळ्यात पुरणा वरणाचा स्वयंपाक होतो. संध्याकाळी महाआरती होते व सवाष्ण व ब्राम्हणास जेवु घातले जाते.
या दिवशी विशेष म्हणजे आपली आई जगत् जननी जगदंबेस आपल्या मुलांच्या दिर्घ व कीर्तीमान आयुष्यासाठी प्रार्थना करते तसेच आपल्या डोक्यावर अक्षदा टाकते. पूर्ण श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी हा कुलाचार होतो. संध्याकाळी सवाष्णीस हळदी कुंकावाचे आमंत्रण देवुन ओटी भरली जाते. प्रत्येक शुक्रवारी नाही जमले तर पहिल्या नाही तर शेवटच्या शुक्रवारी आपल्या घरी हा कुलाचार करा सवाष्णीस बोलवुन घरीच स्वयंपाक करा. थोडा त्रास होईल पण समाधान मिळेल. आई जगदंबेची ही सेवा श्रध्देने बघा आपणास व आपल्या कुटुंबास मानसिक समाधान लाभेल.
।। श्रीकृर्ष्णापणमस्तू।।