आनंद तरंग: व्यापक अभिव्यक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 12:09 AM2020-06-29T00:09:39+5:302020-06-29T00:10:06+5:30
परिपक्व समजतो, त्या व्यक्तीही चटकन् रागावतात. पारिजातकाच्या फुलाच्या जखमेनेही घायाळ होतात. आम्ही मनातून चांगले जग निर्माण व्हावे, असा विचार करतो
इंद्रजित देशमुख
समाजमाध्यमांनी व्यक्त होण्यासाठी मोठे माध्यम समोर आणले आहे; पण यातील व्यक्त होणे बऱ्याच प्रमाणात विकृतीच्या पातळीवर गेलेय. कळपशाही व कंपूशाहीतून प्रकट झालेले शब्दांचे विषारी तुषार अंगावर येत आहेत. खूप कमी अभिव्यक्ती विशाल व व्यापक आहे. मी स्वत:विषयी कोष निर्माण केला आहे. ‘मी सर्वज्ञ आहे. निर्दोष आहे.’ हे कोष मी माझ्याभोवती निर्माण केलेत; पण तसे दिसून येत नाही.
परिपक्व समजतो, त्या व्यक्तीही चटकन् रागावतात. पारिजातकाच्या फुलाच्या जखमेनेही घायाळ होतात. आम्ही मनातून चांगले जग निर्माण व्हावे, असा विचार करतो; पण बाह्यजगाच्या धक्क्याने त्या जगाचे स्वप्न भग्न पावतेय. संवाद, अभिव्यक्तीचा दर्जा माणसाच्या समजुतीनुसार वाढतो. जितकी समज खोल, तितका संवादाचा व अभिव्यक्तीचा दर्जा उच्चतम; पण इथे समज खोल व्हायला तयार नाही. परिपक्व लोकही काय प्रतिसाद देतील सांगता येत नाही. मन्सूर नावाच्या संतांना त्या देशातील राजाने सुळावर चढवायचे ठरविले. राजाच्या बाजूने असणारा जमाव जमला. मन्सूर यांचे गुरूही उपस्थित होते. मन्सूर यांना सुळावर देताना लोक दगड मारत होते. मन्सूर शांतपणे दगडांचा स्वीकार करीत होते; पण त्यांच्या गुरूंनी त्यांच्यावर फुले उधळली, तेव्हा ते व्यथित झाले. ‘गुरुजी तुम्हीसुद्धा?’ गुरुजींची फुले त्यांना पचवायला जड गेली; कारण अर्धवट झुंडीने मारलेले दगड सहज आहेत. कारण ते अर्धवटच आहेत; पण परिपक्व माणूसही गर्दीत सहभागी होतो तेव्हा तोही झुंडीपैकी एक होतो, हे वेदनादायी असते. म्हणून संवाद, अभिव्यक्ती दर्जेदार हवी.