२१ जून दक्षिणायन आरंभ: काय घडते या काळात? कोणत्या गोष्टी असतात निषिद्ध? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 02:54 PM2022-06-21T14:54:31+5:302022-06-21T14:54:57+5:30
२१ जूनपासून दक्षिणायन सुरु होत आहे. पुढील सहा महिने दिवस छोटा आणि रात्र मोठी असल्याने पाळावयाची पथ्य कोणती ते जाणून घ्या!
२१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी दक्षिणायन सुरू होत आहे. वर्षभरात १२ संक्रांती असतात. त्यातील चार संक्राती मुख्य असतात. मेष, तूळ, कर्क आणि मकर या राशींची संक्राती मुख्य मानली जाते. पैकी आपल्याला परिचयाची असते ती म्हणजे मकर संक्रांती. सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांती म्हणतात. तर मिथुन राशीतून कर्क राशीत सूर्य प्रवेश करतो तेव्हा कर्क संक्राती म्हणतात. मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरु होते, यात दिवस मोठा आणि रात्र छोटी होत जाते तर दक्षिणायन सुरु झाले असता दिवस छोटा आणि रात्र मोठी होऊ लागते. यंदा कर्क संक्रांति १६ जुलै रोजी असली तरी दक्षिणायन २१ जून पासून सुरु होत आहे. या कालावधीत कोणकोणती कार्य निषिद्ध सांगितली आहेत त्याचा आढावा घेऊ.
उत्तरायण आणि दक्षिणायन दरम्यान असणारे ऋतू :
उत्तरायण सहा महिने तर दक्षिणायन सहा महिने असते. यादरम्यान सहा ऋतूंची तीन तीन भागात विभागणी होते. शिशिर, वसंत आणि ग्रीष्म हे तीन ऋतू उत्तरायणात समाविष्ट होतात तर वर्षा, शरद आणि हेमंत दक्षिणायनात समाविष्ट होतात. सूर्य कर्क राशीतून धनु राशीकडे स्थलांतरित होण्याचा काळ दक्षिणायन म्हणून संबोधला जातो.
दक्षिणायन काळात काय घडते?
दक्षिणायन हे नकारात्मकतेचे तर उत्तरायण सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. उत्तरायणाच्या काळात सण-उत्सव साजरे केले जातात तर दक्षिणायनच्या काळात व्रत वैकल्य केली जातात. दक्षिणायन काळात देवशयनी एकादशी येते. याचाच अर्थ देव विश्रांती घेतात. दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते. या काळात अराजकता माजू नये यासाठी व्रत वैकल्याचे धोरण अवलंबिले जाते. एवढेच नाही तर पितरांची सेवा देखील या काळातच केली जाते.
शुभ कार्य निषिद्ध :
आषाढी एकादशी अर्थात देवशयनी एकादशीपासून चातुर्मास प्रारंभ होतो. या काळात देवाच्या अनुपस्थितीमुळे मुंज, लग्न इ. शुभ कार्ये केली जात नाही. या काळात विविध व्रत वैकल्य, उपास, तीर्थयात्रा, दान धर्म केले जाते. या काळात प्रकृतीत बिघाड होण्याची शक्यता असल्याने चातुर्मासाचा उपास एकभुक्त राहून केला जातो.