सुट्टीच्या दिवशी घराची आवराआवर करता, तशी थोडीशी मनाचीही आवराआवर करा; त्यासाठी...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 07:00 AM2023-04-13T07:00:00+5:302023-04-13T07:00:07+5:30
गोष्टी जागच्या जागी असल्या की सापडणे सोपे जाते, तसेच मन आवरलेले असेल तर विषयांचा गुंता सुटायला मदत होते. पुढील गोष्टी जरूर आजमावून पहा!
आपल्या रोजच्या वस्तू आपण नीटनेटक्या ठेवतो. त्यांची देखभाल करतो, आवराआवर करतो, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले मन, ते आवरायला नको का? ते कसे आवरायचे, सांगत आहेत, साधू गौर गोपाल दास.
आपण रोज जेवतो. कोणी दोनदा, कोणी तीनदा, तर कोणी दिवसभर. परंतु, खाल्लेल्या अन्नाचा निचरा झाला नाही, तर काय होईल? मृत्यू.
आपण रोज पाणी पितो. कोणी एक लीटर, कोणी दोन लीटर, कोणी त्याहून जास्त. परंतु, प्यायलेले पाणी शरीरातून बाहेर पडले नाही, तर काय होईल? मृत्यू.
आपण दर क्षणाला श्वास घेतो. किती वेळा घेतो, याची मोजदादही ठेवत नाही. योगाभ्यासात श्वास घेण्याचे विशिष्ट तंत्र शिकवले जाते. मात्र, घेतलेला श्वास सोडलाच नाही, तर काय होईल? मृत्यू.
त्याचप्रमाणे कोणतीही गोष्ट घेऊन झाल्यावर ती सोडूनही देता आली पाहिजे. साचून राहिलेल्या गोष्टी खराब होतात. त्यांचा क्षय होतो. त्या निकामी होतात. शेवटी नाशवंत होतात.