हरीणीच्या बाबतीत एका क्षणात जसा चमत्कार घडला, तसा तुमच्याही बाबतीत घडू शकेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 08:00 AM2021-06-03T08:00:00+5:302021-06-03T08:00:11+5:30
आपल्यावरही चोहोबाजूंनी संकट ओढावल्याची स्थिती जाणवेल, त्यावेळेस मनापासून परमेश्वराचा धावा करा. एक संधी मागा. ती निश्चित मिळेल.
उन्हाळ्याचे दिवस होते. जंगलात घनदाट वनराई असूनही सूर्याचा प्रकोप सर्व प्राणीमात्रांना असह्य झाला होता. अशातच वणवा पेटला आणि आग पसरू लागली. जीव वाचवण्याच्या भीतीने प्राणी सैरावैरा पळू लागले. त्यातच एक हरीणी होती. ती गर्भार होती. आगीचे लोळ चहू बाजूंनी उठत होते. तिचा प्रसुतीकाळ समीप आला होता. पिलांना जन्म देण्यासाठी ती सुरक्षित जागा शोधत होती. ती नदीजवळ येऊन पोहोचली. तिथला परिसर आगीपासून मुक्त होता.
परंतु आपला कोणीतरी पाठलाग करत आहे, याची तिला जाणीव झाली. तिने नजरेच्या कडेने पाहिले, तर एक शिकारी झाडाझुडूपात दबा धरून बसला होता. नदी पार करून जाण्याचे हरीणीत त्राण नव्हते. नदीच्या पलीकडे वाघोबा शिकार मिळेल म्हणून आशेने पाहत होता.
हरीणीला वाटले, आपला शेवट जवळ आला आहे. मी माझ्या पिलांना जन्म देऊ शकले नाही. ही सृष्टी दाखवू शकले नाही. माझ्याबरोबर त्यांचाही अंत होणार. चोहोबाजूंनी संकट ओढावल्यामुळे ती डोळे मिटून परमेश्वराचा धावा करू लागली. `देवा, माझ्या पिलांना जन्म घेण्याची संधी दे. त्यांना ही सृष्टी पाहू दे. आमचे रक्षण कर.'
शिकाऱ्याने बंदूकीवर नेम धरला आणि हरीणीच्या दिशेने गोळी सोडणार, तोच त्याच्या डोळ्यात वणव्याची ठिणगी वाऱ्यासरशी येऊन त्याच्या डोळयात उडाली. त्यामुळे शिकाऱ्याचा नेम चुकला. हरीणीवर धरलेला नेम वाघोबाच्या दिशेने वळला आणि त्या गोळीने वाघोबा घायाळ झाला. शिकारी डोळ्याला झालेल्या जखमेमुळे पळत सुटला. वाघोबा निपचित पडला. क्षणार्धात वातावरणात बदल झाला. काळे ढग दाटून आले. हलक्या हलक्या सरी बरसू लागल्या. जंगलातली आग विझली. काही क्षणांपूर्वी चोहोबाजूंनी ओढावलेले संकट एकाएक नाहीसे झाले. हरीणीने देवाचे मनोमन आभार मानले आणि नदीकाठच्या त्या रम्य परिसरात, शीतल वातावरणात गोंडस पाडसांना जन्म दिला.
त्या संकटाच्या प्रसंगी हरीणी डगमगली नाही, तिची देवावरची श्रद्धा डळमळीत झाली नाही आणि संकटातून पळ काढला नाही, त्याचप्रमाणे आपल्यावरही चोहोबाजूंनी संकट ओढावल्याची स्थिती जाणवेल, त्यावेळेस मनापासून परमेश्वराचा धावा करा. एक संधी मागा. ती निश्चित मिळेल. यासाठी अढळ श्रद्धा हवी. तर आणि तरच एका क्षणात चमत्कार घडतो आणि चित्र पालटते.