ज्यासी सदगुरु चरणी श्रध्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 07:05 PM2021-06-10T19:05:57+5:302021-06-10T19:06:23+5:30
Sant Gajanan Maharaj : संसारातील दुःखाचे भय दूर करणारा परब्रह्म नारायणस्वरुप सदगुरुच आहे, जो जन्म मरण चुकवितो.
सदगुरुचे चरणी समर्पण तेव्हांच होते जेव्हां शिष्याचा मी संपतो. शिष्य होऊन असे समर्पण करण्यास मनुष्य का तयार होतो. कारण जो मनुष्य जाणतो
सदगुरु परब्रह्म नारायण ।
निर्दळी भवभय दारुण ।
निवारोनी जन्ममरण । निववी पूर्ण निजबोधे ॥
संसारातील दुःखाचे भय दूर करणारा परब्रह्म नारायणस्वरुप सदगुरुच आहे, जो जन्म मरण चुकवितो. एकनाथ महाराज म्हणतात,
निववी निजबोधे. निवविणे चा अर्थ होतो थंड करणे. आम्ही दुध, चहा खूप उष्ण असला की फुंकर मारुन निववितो. तसे सदगुरु संसाराचे तापाने तप्त झालेल्या जीवाला निजबोधाची फुंकर मारुन निववितो. जीवाला दाखवून देतो वेड्या तू जीव नाहीस शिव आहेस. म्हणून ज्या जीवाला शिव होण्याची तृष्णा जागते तो जीव निघतो गुरुकडे.
भगवान बुध्दाकडे येणारे बरेच शिष्य राजघराण्यातील वा श्रेष्ठ श्रेष्ठी असलेल्या वैश्य म्हणजे श्रीमंत व्यापार्यांचे घरातून यायचे. तेव्हा बुध्दाचे शिष्य होणे म्हणजे भिक्कु व्हावे लागायचे. भिक्षा मागावी लागत असे. साध्या कुटीमध्ये निवास करावा लागायचा. उन, पाऊस वा थंडीपासून बचाव करायला फारशा सुविधा नसायच्या. ऐश्वर्यातून निघून भिक्षेकर्याचे गुरु आज्ञेने जीवन जगणे तप होते. सधन असून भिक्षा मागणे ही साधना होती अहंकाराला मारण्याची.
समर्पणचा अर्थ होतो आपली स्वतःची आता कंडीशनींग नाही, आपल्या अनुकुलतेची मागणी नाही. मी म्हणणारा माझा अहंकार नाही. जी गुरुची आज्ञा असेल तसे वागु, तशी भक्ती करु. तशी साधना करु. जी गुरुची मर्जी असेल ते स्वीकारु. खरा शिष्य गुरु जवळ काही मागायला नाही जात. खरा शिष्य तो आहे जो गुरु समर्पणात स्वतःला पूर्णतः समर्पित करायला तयार आहे. जशी नदी समर्पित होते सागरात. सागररुपच होते. गंगा सागर होते. गंगा मिळाली सागराला. अशीच शिष्याची अहंकाराची नदी सदगुरुचे परब्रह्मस्वरुप सागरात विलीन होते. गुरुचरणी समाप्त करतेा आपल्या अहंममतेच्या अस्तित्वाला. गंगेच्याच किनारी विवेकानंद जसे एकरुप झाले रामकृष्णरुपी परमानंदाचे सागरात.
संत एकनाथ महाराज म्हणतात,
जै पुरुषाची अहंता गळे । तै देह अदृष्ट योगे चळे । जेवी सुकले पान वायु बळे । पडिले लोळे सर्वत्र ॥
जेव्हां मनुष्याचा अहंकार गळून जातो, तेव्हा त्या मनुष्याचा देह हा माझा देह ही भावना संपते. मग तो देह अदृष्ट योगे, दृष्टीस न येणारा जो योग असेल तसा चालतो. हा अदृष्ट योग आहे दैव योग. देहाचे बाबतीत दैव काय करेल दृष्टीत येत नाही. स्वस्थही ठेवू शकते वा अाजारीही पाडु शकते, घात करु शकते वा अपघात करु शकते. पण ज्याच्या देहाचे ममत्व गेले त्याला देह जावो अथवा राहो देह ! आत्मरंगी दृढ ठावो ॥ देह आपल्या इच्छेने असाच चालावा ही त्याची आपली इच्छाच राहिली नाही. देह कसा दिसावा असे आज प्रकर्षाने लोकांचे मनी आहे. प्रकृति विरुध्द बाॅडी बिल्डींग सारखे खूप श्रम करुन नसा फुटे पर्यंत व्यायाम करुन शरीरसौष्ठव दाखविण्याची फॅशन वाढती आहे. परंतु देहममत्व गेले तेव्हा देह असा झाला जसे सुकलेले पान जेव्हा फांदी पासून तुटले की, ते जमिनीवर आकाशात, धुळीत वारा नेईल तिकडे उडत राहते. तसे दैवयोगे देह चालत राहतो.
गुरुने सांगताची कानी । ज्याची वृत्ती जाय विरोनी । जेवी मिळता लवण पाणी । अभिन्नपणी समरसे ॥
गुरु उपदेश कानी पडताच ज्याचे मनाच्या वृत्ती
विसर्जीत होतात. वृत्ती अशा विरुन जातात जसे मीठ पाण्यात मिसळताच पाण्यात एकरुप होते. देहअंहंता गेली व देह अदृष्ट अशा दैववशात सहज जगविणे झाले व गुरुंची बोध वाक्ये कानी पडताच सर्व बाह्य सांसारिक वृत्ती संपल्या. जेव्हा गुरु कृपेने चैतन्यघन रुप ठसावते
तेव्हा वृत्ती स्व रुपासी लिन होतात. मग देहादिचे मिथ्याभानही संपते. तेव्हा ताे शिष्य आपले काही म्हणेल असे काही राहिले नाही. परब्रह्मस्वरुप सदगुरुचे स्वरुपी शिष्याचे समर्पण पूर्ण झाले. आता पूर्णात पूर्ण मिसळणे झाले. गुरु शिष्य एकरुप झाले.
सदगुरुनाथ महाराज की जय !
अनंतकोटी ब्रह्मांडनायक योगीराज संत सदगुरु श्री गजानन महाराज की जय !
संत सदगुरु श्री एकनाथ महाराजांचे चरणी श्रध्दा नमन.
शं.ना.बेंडे