अंगारक संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा व्रताचरण, बाप्पा करेल शुभ; जाणून घ्या, चंद्रोदयाची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 03:35 PM2024-06-24T15:35:23+5:302024-06-24T15:51:20+5:30
Jyeshtha Angarki Sankashti Chaturthi June 2024: अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष मानली जाते. या दिवशी केलेल्या व्रताचे शुभ पुण्यफल मिळते, असे म्हटले जाते. जाणून घ्या, चंद्रोदय वेळ...
Jyeshtha Angarki Sankashti Chaturthi June 2024: गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली की तिला ‘अंगारकी’ म्हणण्याची प्रथा आहे. विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला ‘अंगारक योग’ असलेली चतुर्थी मानतात. जून महिन्यातील ज्येष्ठ वद्य चतुर्थी मंगळवारी आल्याने ही संकष्ट चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी होत आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थीचा व्रतपूजा विधी, चंद्रोदय वेळ पाहुया...
अंगारक म्हणजे मंगळ. या दिवशी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी ही विशेष पुण्यप्रद मानली जाते. अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले, तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते, शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. अंगारकीचा उपवास केल्यानंतर बारा संकष्टया केल्याचे पुण्य मिळते, अशी काही भाविकांची समजूत आहे, तर अंगारक चतुर्थी ही वीस संकष्ट चतुर्थ्या केल्याचे पुण्य देते, असेही काहींचे मानणे आहे. म्हणूनच हा उपवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. हजारो भाविक या दिवशी आवर्जून मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतात. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे.
ज्येष्ठ अंगारक संकष्ट चतुर्थी: २५ जून २०२४
ज्येष्ठ अंगारक संकष्ट चतुर्थी प्रारंभ: २४ जून २०२४ रोजी मध्यरात्री ०१ वाजून २३ मिनिटे.
ज्येष्ठ अंगारक संकष्ट चतुर्थी सांगता: २५ जून २०२४ रोजी रात्रौ ११ वाजून ११ मिनिटे.
सामान्यतः सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. मात्र, संकष्ट चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्रदर्शनाला महत्त्व असून, हे प्रदोष काळी करायचे व्रत आहे. संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय, चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले गेले आहे. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी, असे सांगितले जाते.
संकष्ट चतुर्थी व्रतपूजनाची सोपी पद्धत
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे. गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा.
विविध शहरांतील चंद्रोदय वेळ
शहरांची नावे | चंद्रोदयाची वेळ |
मुंबई | रात्रौ १० वाजून २८ मिनिटे |
ठाणे | रात्रौ १० वाजून २८ मिनिटे |
पुणे | रात्रौ १० वाजून २३ मिनिटे |
रत्नागिरी | रात्रौ १० वाजून २३ मिनिटे |
कोल्हापूर | रात्रौ १० वाजून १९ मिनिटे |
सातारा | रात्रौ १० वाजून २२ मिनिटे |
नाशिक | रात्रौ १० वाजून २६ मिनिटे |
अहमदनगर | रात्रौ १० वाजून २० मिनिटे |
धुळे | रात्रौ १० वाजून २३ मिनिटे |
जळगाव | रात्रौ १० वाजून २० मिनिटे |
वर्धा | रात्रौ १० वाजून ०७ मिनिटे |
यवतमाळ | रात्रौ १० वाजून ०८ मिनिटे |
बीड | रात्रौ १० वाजून १६ मिनिटे |
सांगली | रात्रौ १० वाजून १८ मिनिटे |
सावंतवाडी | रात्रौ १० वाजून २० मिनिटे |
सोलापूर | रात्रौ १० वाजून १४ मिनिटे |
नागपूर | रात्रौ १० वाजून ०५ मिनिटे |
अमरावती | रात्रौ १० वाजून ११ मिनिटे |
अकोला | रात्रौ १० वाजून १४ मिनिटे |
छत्रपती संभाजीनगर | रात्रौ १० वाजून १९ मिनिटे |
भुसावळ | रात्रौ १० वाजून १९ मिनिटे |
परभणी | रात्रौ १० वाजून १२ मिनिटे |
नांदेड | रात्रौ १० वाजून ०९ मिनिटे |
धाराशीव | रात्रौ १० वाजून १४ मिनिटे |
भंडारा | रात्रौ १० वाजून ०३ मिनिटे |
चंद्रपूर | रात्रौ १० वाजून ०३ मिनिटे |
बुलढाणा | रात्रौ १० वाजून १७ मिनिटे |
मालवण | रात्रौ १० वाजून २१ मिनिटे |
पणजी | रात्रौ १० वाजून १९ मिनिटे |
बेळगाव | रात्रौ १० वाजून १७ मिनिटे |
इंदौर | रात्रौ १० वाजून २१ मिनिटे |
ग्वाल्हेर | रात्रौ १० वाजून १८ मिनिटे |