Jyeshtha Purnima 2023: ज्येष्ठ पौर्णिमा: ‘असे’ करा श्रीविष्णू, चंद्रपूजन; लक्ष्मी शुभ करेल! पाहा, मुहूर्त, महत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 01:13 PM2023-06-02T13:13:41+5:302023-06-02T13:14:30+5:30
Jyeshtha Purnima 2023: ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला लक्ष्मी देवीसह श्रीविष्णूंचे पूजन करणे शुभ-फलदायी मानले गेले आहे.
Jyeshtha Purnima 2023: मराठी वर्षातील तिसरा ज्येष्ठ महिना सुरू आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी वटसावित्रीचे व्रत केले जाते. सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. याशिवाय पौर्णिमेला भगवान श्रीविष्णू आणि चंद्रदेवाचे पूजन करणे शुभ मानले गेले आहे. तसेच लक्ष्मी देवीची विशेष पूजा या दिवशी केली जाते. याशिवाय पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दान केल्याने शुभ फल प्राप्त होते, अशी मान्यता आहे. ज्येष्ठ पौर्णिमेच्या व्रताचरणाचा शुभ मुहूर्त, मान्यता, पूजाविधी जाणून घेऊया...
यंदा ज्येष्ठ पौर्णिमा दोन दिवस असेल. ०३ जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमा व्रत आणि ४ जून रोजी स्नान व दान करावे, असे सांगितले जात आहे. पंचांगानुसार पौर्णिमा तिथी ०३ जून रोजी सकाळी ११.१७ वाजता सुरू होईल आणि ०४ जून रोजी सकाळी ०९.११ वाजता समाप्त होईल. पौर्णिमा तिथी ही चंद्रदेवतेला समर्पित असल्याने चंद्रोदयानुसार पूजन केले जाते. त्यासाठी ०३ जून रोजी पौर्णिमेचे व्रत करावे, असे म्हटले जात आहे.
ज्येष्ठ पौर्णिमेचे महत्त्व
ज्येष्ठ पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासोबतच या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा श्रवण करण्याचेही विशेष महत्त्व आहे. या दिवशी चंद्रदेवांसोबत लक्ष्मीचीही पूजा केली जाते, असे मानले जाते. रात्री चंद्राला दूध अर्पण केल्याने घरातील धन-धान्य वाढते आणि सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे.
ज्येष्ठ पौर्णिमेचा पूजाविधी
ज्येष्ठ पौर्णिमेला भगवान विष्णूची पूजा करणे शुभ मानले जाते. तसेच, रात्री लक्ष्मी देवी चंद्रदेवाची पूजा केली जाते. पिवळी फुले, फळे अर्पण करून भगवान विष्णूची षोडषोपचार पूजा करावी. त्यानंतर रात्री लक्ष्मीची पूजा करून केशराची खीर अर्पण करावी. रात्री या चंद्रदेवाला दूधासह अर्घ्य द्यावे. दिवा लावावा. या दिवशी अन्न आणि वस्त्र दान करावे, असे सांगितले जाते.