Jyestha Amavasya 2024: ज्येष्ठ अमावस्येला करतात वृषभव्रत; होते शिवलोकाची प्राप्ती; सविस्तर वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 07:00 AM2024-07-05T07:00:00+5:302024-07-05T07:00:01+5:30
Jyeshtha Amavasya 2024: पोळा सदृश भासणारा हा सण ज्येष्ठ अमावस्येला साजरा केला जातो, या व्रताचरणाचे पुण्य मोठे आहे, त्याबद्दल जाणून घ्या.
आज ज्येष्ठ अमावस्या. आजच्या दिवशी पितरांच्या पूजे बरोबरच आणखी एक व्रत केले जाते, त्याला वृषभ व्रत असे नाव आहे. हे व्रत केले असता, मनुष्याची या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका तर होतेच, शिवाय शिवधामाची प्राप्ती देखील होते असे शास्त्रात म्हटले आहे. त्याबद्दल जाणून घेऊ.
जिवाशिवाची बैल जोड आपल्याला आठवते ती बैलपोळ्याला. परंतु ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी 'वृषभव्रत' नावाने आणखी एक सोहळा पार पाडला जातो, तो म्हणजे बैलपूजेचा. विधी सारखाच असला, तरी उद्दीष्ट वेगळे आहे. ते कोणते, हे जाणून घेऊ.
या तिथीला बैलांची पूजा केली जाते. त्याला बेंदूर म्हणतात. त्यासाठी आदल्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशीला लाकडाच्या बैलांची घरातच पूजा केली जाते. धर्माचे प्रतीक म्हणून ही पूजा केली जाते. धर्माला वृष संबोधले गेले आहे. ही पूजा शिवलोकप्राप्तीसाठी केली जाते.
हे व्रत आणखी एका प्रकारे केले जाते. त्यामध्ये आपल्या सोयीने कुठल्याही महिन्यात शुक्ल सप्तमीला उपवास करून अष्टमीला एका बैलाला दोन शुभ्रवस्त्रांनी वा झुलींनी तसेच गोंडे, मण्यांच्या माळा, फुलमाळा यांनी सजवून त्याची पूजा करून तो दान दिला जातो. भगवान शिवशंकरांना नंदी प्रिय आहे. त्यांचे वाहन बैल आहे. त्यामुळे या पूजेने त्यांना प्रसन्न केले जाते.
आपला देश कृषिप्रधान असल्यामुळे बैलांना अतिशय महत्त्व आहे. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आपण बैलपोळ्याला त्यांची पूजा करून व्यक्त करतोच. परंतु येथे 'धर्म' मानून बैलांची पूजा करण्याच्या विधीमुळे ही पूजा वेगळी ठरली आहे.
आताच्या काळात शहरात बैल दिसणे दुरापास्त आहे. त्यामुळे हा पुजाविधी करणे अवघड ठरते. यावर पर्याय म्हणून लाकडाच्या बैलांची पूजा सांगितली आहे. ही पूजा सामुहिकरित्यादेखील करता येते. त्यानिमित्ताने बैलांचे पालन पोषण करणाऱ्या एखाद्या शेतकऱ्याला दान किंवा आर्थिक मदतही करता येते. कालांतराने विधी-परंपरांचे स्वरूप बदलत असले, तरी धर्म टिकवण्याच्या आणि रुजवण्याच्या दृष्टीकोनातून या तिथींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.