Kamada Ekadashi 2025: कामदा एकादशीला चैत्र वारी करावी म्हणतात; पण का? ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 07:05 IST2025-04-08T07:00:00+5:302025-04-08T07:05:01+5:30
Kamada Ekadashi 2025: आषाढी-कार्तिकी आपल्याला माहीत आहेच, ८ एप्रिल रोजी कामदा एकादशीच्या मुहूर्तावर केल्या जाणार्या चैत्र वारीबद्दलही जाणून घ्या.

Kamada Ekadashi 2025: कामदा एकादशीला चैत्र वारी करावी म्हणतात; पण का? ते जाणून घ्या!
८ एप्रिल रोजी हिंदू नवीन वर्षातील पहिली एकादशी आहे. या चैत्र शुक्ल एकादशीला 'कामदा एकादशी' (Kamada Ekadashi 2025) असे नाव आहे. या व्रतामध्ये एकादशीला पूर्ण दिवसाचा उपवास करून द्वादशीला पारणा म्हणजे उपवास सोडवायचा. तसेच एकादशीला विष्णुपूजा करायवयाची असते. सर्व पापे दूर करणारी, पापांचा परिहार करणारी अशी ही कामदा एकादशी असल्याचे मानले जाते. एकादशीला रात्री भगवान श्रीविष्णूंची मूर्ती झोपाळ्यावर ठेवून तिच्या समोर जागर करावा असे पुराणात सांगितले आहे.
या एकादशीला पंढरपूराची वारी करण्याची प्रथा आहे. या वारीला चैत्रवारी असेही म्हणतात. सद्यस्थितीत चैत्रवारी करणे सर्वांनाच शक्य होईल असे नाही. परंतु दोन चार वर्षातून एकदा चैत्रवारी जरूर करावी. तीदेखील शक्य नसेल, तर आषाढी-कार्तिकीच्या वारीचा योग चुकवू नये.
वारी हे देखील व्रत आहे. व्रत करण्यामागे भावना असते संकल्पाची आणि सातत्याची. ज्या गोष्टीत सातत्य ठेवतो, त्याचे फळ मिळाल्यावाचून राहत नाही. आध्यात्मिक क्षेत्रात अशा गोष्टी सुचवण्यामागेदेखील हेच कारण आहे. व्रत वैकल्यांमुळे मन:शांती लाभते आणि त्यानिमित्ताने प्रभू नाम घेतले जाते.
कामदा एकादशीचे महत्त्व सांगणारी कथा -
नागपूरमध्ये पुंडरिक नावाचा राजा राज्य करीत होता. ललित-ललिता या नावाचे एक गंधर्व दांपत्य त्याच्या पदरी होते. एके दिवशी ललिताच्या गैरहजेरत ललित दरबारातील मैफलीत गात होता. परंतु ललिता सोबत नसल्यामुळे त्याचे गाण्यात मन लागेना. परिणामी त्याच्या गायनात वरचेवर चुका होत होत्या. त्या मैफलीचा पार बेरंग झाला. त्यामुळे राजा रागावला. त्याने रागाच्या भरता ललितला शाप दिला, 'तू राक्षस होशील!'
त्या शापाप्रमाणे ललित गंधर्व राक्षस झाला. तो त्याच अवस्थेत रानावनात हिंडू लागला. त्याच्यामागे ललितादेखील रानात गेली होती. तिने पतीची ही सारी दुरावस्था पाहिली. वाटेत एा वनात तिला एक ऋषी भेटले. त्यांच्याकडे तिने ही सारी कर्मकहाणी सांगून यावरील उपाय विचारला. त्यावेळी त्या ऋषींनी तिला मोठ्या श्रद्धेने कामदा एकादशीचे व्रत करायला सांगितले. या व्रताच्या पुण्यप्रभावाने राजाच्या शापामुळे राक्षस झालेला ललित पुन्हा गंधर्व झाला.
एकादशीचे व्रताचे आचरण
या दिवशी विष्णुसहस्रनामाचे श्रवण करावे, पठण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय नम: हा मंत्रजप करावा. यथाशक्ती दानधर्म करावा. अधिक मासातील शुक्ल एकादशीला कामदा एकादशीचे व्रत अधिक पुण्यप्रद मानले जाते.