Kamada Ekadashi 2025: पांडवांनी इच्छापूर्तीसाठी केले होते कामदा एकादशीचे व्रत;वाचा व्रतविधी आणि व्रतलाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 12:20 IST2025-04-07T12:18:51+5:302025-04-07T12:20:45+5:30
Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी नवीन वर्षातील पहिली एकादशी आहे आणि ती सुद्धा सर्व इच्छापूर्ण करणारी कामदा एकादशी; त्यानिमित्त दिलेले उपाय जरूर करा!

Kamada Ekadashi 2025: पांडवांनी इच्छापूर्तीसाठी केले होते कामदा एकादशीचे व्रत;वाचा व्रतविधी आणि व्रतलाभ!
पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशीचे व्रत केले जाते. या व्रतामध्ये भगवान विष्णूची पूजा करतात. असे मानले जाते की या दिवशी मनोभावे पूजा केल्याने भगवान विष्णुकृपा प्राप्त होते आणि प्रत्येक इच्छापूर्ती देखील होते. पांडवांच्या पाठीशी श्रीकृष्ण होतेच, तरीही कर्तव्याबरोबर उपासना हवी म्हणून कृष्णानी हे व्रत करा असे सुचवले होते, त्याचा लाभ काय झाला ते ही पाहू.
८ एप्रिल २०२५ रोजी कामदा एकादशी (Kamada Ekadashi 2025) आहे. काम म्हणजे इच्छा आणि दा म्हणजे देणे. इच्छापूर्ती करणारी एकादशी असा तिचा लौकिक आहे. विष्णू भक्तीचा दिवस म्हणून एकादशीचे व्रत केले जाते. प्रत्येक एकादशीचे फळ वेगेवेगळे आहे. चैत्रापासून हिंदू नवीन वर्षांची सुरुवात होते. त्यात पहिली येते ती म्हणजे कामदा एकादशी. वर्षाच्या सुरुवातीलाच भक्तांच्या इच्छा पूर्ण करून पूर्ण वर्ष आनंदाचे जावो याची तजवीज पूर्वजांनी करून ठेवत या एकादशीचे आयोजन केले असावे.
पांडवांकडे संपत्ती, वैभव, पद, प्रतिष्ठा असूनही त्यांच्यावर आलेला वनवासाचा प्रसंग आणि गमावलेले राज्य यातून बाहेर येण्यासाठी श्रीकृष्णने त्यांना कामदा एकादशीचे व्रत करायला सांगितले, ज्याचा त्यांना लाभ झाला आणि गेलेले वैभव परत मिळाले. हे व्रत भक्तिभावाने केले असता आपल्यालाही त्याचा लाभ मिळू शकतो. अविवाहितांसाठीदेखील हे व्रत महत्त्वपूर्ण मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी पुढील उपास केल्यास कर्जमुक्तीसही हातभार लागतो असे म्हणतात. त्यामुळे इप्सित मनोकामनापूर्तीसाठी विष्णूंची पूजा, उपासना करावी आणि कर्जमुक्तीसाठी पुढील उपाय करावेत.
कामदा एकादशीला हे उपाय करा
>> जर तुम्ही सतत कर्जाच्या ओझ्याने दबले जात असाल तर पिंपळाच्या झाडाला एक कलशभर पाणी अर्पण करा. तसेच पिंपळाच्या झाडाला ११ वेळा प्रदक्षिणा घालून धागा बांधावा आणि 'ओम नमो भगवते वासुदेवाय नमः' हा मंत्र म्हणावा. याचा फायदा होईल.
>> व्यवसाय वाढवण्यासाठी आणि करिअरला नवी दिशा मिळण्यासाठी पिंपळाचे पान घ्या आणि त्यावर कुंकवाऐवजी हळदीचे स्वस्तिक बनवा. ते पान एखाद्या मंदिरात झाडाच्या बुंध्याशी ठेवून द्या. केळ्याचा नैवेद्य दाखवून गरजू व्यक्तीला केळीचे दान करा.
>> कष्ट करूनही व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारत नसेल, तर एकादशीचा उपास करून भगवान विष्णूंची पूजा करावी. उपास शक्य नसेल तर विष्णू सहस्त्र नामाचे पठण करावे किंवा श्रवण करावे.
>> घरातील सदस्यांमध्ये एखाद्या मुद्द्यावरून मतभेद होत असतील तर या दिवशी देवघरातील शंखामध्ये थोडे गंगाजल किंवा कलशातले साधे पाणी भरून भगवान विष्णूला अर्पण करावे. त्यानंतर भगवान विष्णूची पूजा करावी. त्यानंतर हे पाणी घराच्या कानाकोपऱ्यात शिंपडावे त्यामुळे गृहकलह मिटतात.