Kamada Ekadashi 2025:नवीन वर्षातली पहिली एकादशी; घेऊया वर्षभरातील एकादशींचा आढावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 13:46 IST2025-04-07T13:46:20+5:302025-04-07T13:46:33+5:30

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी चैत्र महिन्यातील पहिली 'कामदा एकादशी' आहे; त्यानिमित्ताने वर्षभरातील एकदाशींचे नाव आणि लाभ जाणून घेऊया.

Kamada Ekadashi 2025: The first Ekadashi of the new year; Let's take a look at the Ekadashis of the year! | Kamada Ekadashi 2025:नवीन वर्षातली पहिली एकादशी; घेऊया वर्षभरातील एकादशींचा आढावा!

Kamada Ekadashi 2025:नवीन वर्षातली पहिली एकादशी; घेऊया वर्षभरातील एकादशींचा आढावा!

एकादशी या तिथीला हिंदू धर्मशास्त्रात अतिशय महत्त्व आहे. हे व्रत केल्याने आत्मविश्वास वाढतो, पारमार्थिक ओढ लागते, संसार सुखाचा होतो. निरोगी काया, सुदृढ आरोग्य आणि धन संपत्तीचा लाभ होतो. ईश्वरासमीप नेणारे हे व्रत अतिशय फलदायी आहे. म्हणून दर महिन्यात दोनदा एकादशी येतात. त्याचे पालन करणाऱ्यांना भगवान विष्णुंचा आशीर्वाद प्राप्त होतो. वर्षभरातील प्रत्येक एकादशीला महत्त्व आहे. ८ एप्रिल २०२५ रोजी हिंदू नववर्षातील पहिली कामदा एकादशी (Kamada Ekadashi 2025) आहे, त्यानिमित्त वर्षभरात कोणकोणत्या एकादशी येतात आणि त्यांचे महत्त्व काय आहे, हे जाणून घेऊया.

>> चैत्रात कामदा आणि वरुथिनी एकादशी येते. कामदा एकादशीमुळे राक्षस योनीतून सुटका मिळते आणि वरुथिनी एकादशीमुळे सर्वकार्यसिद्धी प्राप्त होते. 

>> वैषाखात मोहिनी आणि अपरा एकादशी येते. ही एकादशी विवाह, सुख, शांती, समाधान प्रदान करते. त्याचबरोबर मोह मायेतून मुक्त करते. अपरा एकादशी सर्व पापांमधून मुक्त करते.

Kamada Ekadashi 2025: पांडवांनी इच्छापूर्तीसाठी केले होते कामदा एकादशीचे व्रत;वाचा व्रतविधी आणि व्रतलाभ!

>> ज्येष्ठ मासात निर्जला एकादशी आणि योगिनी एकादशी येते. निर्जला एकादशीला अन्नग्रहणच काय तर पाणीही न पिता हे व्रत करायचे असते. ते केले असता सर्व प्रकारच्या सुखांची प्राप्ती होते. तसेच योगिनी एकादशीमुळे कौटुंबिक सुख मिळते.

>> आषाढ महिन्यात देवशयनी आणि कामिका एकादशी येते. देवशयनी एकादशी अर्थात आषाढी एकादशीला वारीचे व्रत अंगिकारले जाते. वारी हा आयुष्याला समृद्ध करणारा अनुभव असतो. तो आयुष्यात प्रत्येकाने एकदातरी घ्यायलाच हवा. कामिका एकादशीचे व्रत केल्याने पुढील जन्म कुयोनित अर्थात वाईट कुळात होत नाही.

>> श्रावणात पुत्रदा आणि अजा एकादशी येते. संतानप्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते. तर अजा एकादशीच्या व्रत हे मुलांवर कोणतेही संकट ओढावले जाऊ नये, त्यांना कसलीही कमतरता जाणवू नये यासाठी केले जाते. 

>> भाद्रपदात परिवर्तिनी आणि इंदिरा एकादशी येते. परिवर्तिनी एकादशीमुळे प्रापंचिक दु:ख दूर होते. इंदिरा एकादशीमुळे पितरांना  मोक्ष मिळून स्वर्गप्राप्ती होते.

>> अश्विन मासात पापांकुशा आणि रमा एकादशी येते. पापांकुशा एकादशीमुळे सर्व प्रकारच्या पापातून मुक्ती मिळून घरात भरभराट होते. तर रमा एकादशीमुळे सुख आणि ऐश्वर्य यांची प्राप्ती होते.

>> कार्तिक महिन्यात प्रबोधीनी अर्थात देवउठनी एकादशी तसेच उत्पन्ना एकादशी येते. कार्तिकी एकादशी केली असते भाग्य जागृत होते. त्यादिवशी तुळशीचा विवाह लावून दिला जातो.

>> मार्गशीर्ष मासात मोक्षदा आणि सफला एकादशी येते. मोक्षदा एकादशी मोक्ष देणारी तर सफला एकादशी यश देणारी असते.

>> पौष महिन्यात पुत्रदा आणि षटतिला एकादशी असते. पुत्रप्राप्तीसाठी पुत्रदा आणि दारिद्रय, दुर्भाग्यातून सुटका व्हावी यासाठी षटतिला एकादशी केली जाते. 

>> माघ मासात जया आणि विजया एकादशी येते. जया एकादशी सद्भाग्यप्राप्ती मिळवून देते तर विजया एकादशी शत्रूवर मात करण्याचे बळ देते.

>> फाल्गुन मासात आमलकी आणि पापमोचनी एकादशी येते. आमलकी एकादशीला आवळ्याच्या वृक्षाची पूजा केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होते. तर पापमोचनी एकादशी आपल्याला पापातून मुक्ती देते.

>> ज्या वर्षी अधिक मास येतो, त्या मासात पद्मिनी एकादशीची भर पडते. ही एकादशी सर्व प्रकारचे सुख, आयुरारोग्य, धन धान्याची प्राप्ती देते.

वर्षभरातील सर्व एकादशी काही ना काही लाभ मिळवून देणाऱ्या आहेत. परंतु यापलीकडे जाऊन विचार केल्यास लक्षात येते, की एकादशी ही तिथी भगवान महाविष्णूंना प्रिय असल्याने आपला भक्तीमार्गाचा प्रवास सुकर होतो आणि त्यांची कृपादृष्टी लाभते. 

Web Title: Kamada Ekadashi 2025: The first Ekadashi of the new year; Let's take a look at the Ekadashis of the year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.