Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 12:16 PM2024-11-15T12:16:32+5:302024-11-15T12:17:12+5:30
Kamakhya Temple: कामाख्या अर्थात इच्छापूर्ती करणारी देवी, असा लौकिक असणाऱ्या कामाख्या देवीबद्दल आणि उत्सवाबद्दल जाणून घेऊ.
'काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल' हा डायलॉग गेल्या वेळच्या निवडणुकीत जेवढा फेमस झाला, तेवढेच एक नाव चर्चेत आले, ते म्हणजे आसाम मधल्या कामाख्या देवीच्या मंदिराचे! अर्थात, हे मंदिर भाविकांसाठी नवीन नाही. मात्र 'नॉट रिचेबल' झालेल्या अनेक मंत्र्यांना गुवाहाटीची कामाख्या देवी पावली असे म्हटले जात होते.
कामाख्या मंदिर हे जागृत देवस्थान आहे. देवी सतीच्या ५१ शक्तिपीठांपैकी आसामच्या गुवाहाटी मध्ये देवीच्या शरीराचा योनी भाग पडला होता, त्यामुळे ते स्थान शक्तीपीठ म्हणून नावारूपास आले. या मंदिरात देवीची मूर्ती नाही, तर देवीचे गर्भस्थान आहे. योनी हे निर्मितीचे प्रतीक, ज्या मार्गे प्रत्येक जीव जन्म घेतो. देवी कामाख्याचे गर्भस्थान तिथे पुजले जाते. तिथून पाण्याचा प्रवाह नैसर्गिकरित्या अविरतपणे वाहत राहतो.
कामाख्या मंदिर हे तंत्रविद्येसाठीही प्रसिद्ध आहे. तिथे अनेक तांत्रिक तंत्रविद्येचा वापर करतात. त्यामुळेच तिथे आजही मंदिर उघडण्याआधी देवीला एक बळी दिला जातो. ज्याअर्थी बळी दिला गेला त्याअर्थी कोणा एका भक्ताची इच्छा पूर्ती झाली असे समजले जाते. कारण तिथे तसा नवस केला जातो. मात्र ज्यांना पशु बळी द्यायचा नाही, ते लोक इच्छापूर्ती झाल्यावर तिथे बंदिस्त असलेल्या एका जनावराला मुक्त करू असाही नवस बोलतात आणि तो पूर्ण करून जीवदान देतात.
आसाम हे मुळातच सुंदर नैसर्गिक ठिकाण आणि त्यात कामाख्या देवीच्या मंदिरातील अध्यात्मिक ऊर्जा यामुळे तिथे जाणारा भाविक पूर्णतः भारावून जातो. मंदिराच्या दोन मजले खाली देवीचे गर्भस्थान आहे, तिथून नैसर्गिक झरा पाझरत राहतो. तिथून येणारे पाणी पुढे छोट्याशा तलावात सोडले जाते. त्या तलावात अंघोळ केल्याने आपली पापं धुतली जातात अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मात्र याच तलावातले पाणी जून महिन्यातले चार दिवस लाल रंगाचे होते. तो काळ देवीचा वार्षिक रजोदर्शनाचा काळ मानला जातो. अर्थात त्या चार दिवसात देवी रजस्वाला होते. देवीला आपण आई म्हणतो. म्हणून या काळात आईला विश्रांती म्हणून मंदिर बंद ठेवले जाते. २२-२६ जून हा तो काळ असतो. या दिवसांत मंदिर बंद असले तरी लोक मोठ्या संख्येने उत्सवाला येतात. मंदिराच्या पायरीचे, कळसाचे दर्शन घेतात. मंदिराचे व्यवस्थापक उत्सवापूर्वी देवीला लाल वस्त्र घालतात, त्यालाच रक्त वस्त्र म्हणतात. उत्सव समाप्ती नंतर ते वस्त्र भाविकांना प्रसाद म्हणून दिले जाते.
कामाख्या हा संस्कृत शब्द आहे, त्याचा मराठीत अर्थ इच्छा पूर्ण करणारी! जी व्यक्ती मनोभावे आणि निष्कपट भावनेने देवीकडे मागणे मागते, तिची इच्छा हमखास पूर्ण होते असा भाविकांचा आजवरचा अनुभव आहे.
आजही रजस्वला स्त्रिला, अर्थात मासिक पाळी आलेल्या स्त्रिला बाजूला बसवले जाते. त्या चार दिवसांत तिला विश्रांतीची गरज असते. ही विश्रांती केवळ शारीरिक नाही तर मानसिक दृष्ट्याही महत्त्वाची असते. मात्र हे लक्षात न घेता विटाळ म्हणत तिला दिलेली वागणूक एकीकडे आणि कामाख्या मंदिरात त्याच चार दिवसांचा उत्सव करत स्त्रीशक्तीचा गौरव करणे दुसरीकडे; हे निश्चित चिंतन करण्यासारखे आहे.