Kamika Ekadashi 2022: कामिका एकादशीला जुळून येत आहेत तीन दुर्मिळ योग; धनवृद्धीसाठी करून घ्या लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 01:25 PM2022-07-21T13:25:16+5:302022-07-21T13:25:28+5:30
Kamika Ekadashi 2022: येत्या रविवारी २४ जुलै रोजी कामिका एकादशी आहे. इच्छित मनोकामना पूर्ण करणारी ही एकादशी तीन दुर्मिळ योग घेऊन आली आहे. या संधीचा लाभ कसा करून घेता येईल ते पाहू!
सर्व पापकर्मांचा नाश व इच्छित मनोकामना पूर्ण करणारी एकादशी असे या कामिका एकादशीचे महत्त्व आहे. २४ जुलै रोजी या एकादशीच्या मुहूर्तावर आणखी तीन दुर्मिळ योग जुळून आल्याने या एकादशीचे महत्त्व अधिक वाढले आहे. त्या योगाचे महत्त्व काय आहे आणि त्याचा आपण वापर कसा करून घेऊ शकतो त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
एकादशी ही भगवान महाविष्णूंची आवडती तिथी! या तिथीला लोक पूर्वसंध्येपासून अर्थात दशमीच्या सायकांळपासून उपास सुरू करतात आणि एकादशीला पूर्ण दिवस उपास करतात. या दिवशी फलाहार करतात. विष्णुसहस्त्रनाम हे स्तोत्र किंवा 'ओम नमो भगवते वासुदेवाय'' हा मंत्र म्हणत उपासना करतात. असा उपास व उपासना केल्यामुळे भगवान विष्णूंची कृपा लाभते अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे कालानुकाळ एकादशीचे व्रत भाविक एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करत आहेत.
अशा या एकादशीच्या सुमुहूर्तावर द्विपुष्कर योग, वृद्धी योग आणि ध्रुव योग हे दुर्मिळ योग जुळून येत आहेत. असे मानले जाते की या योगांमध्ये पूजा केल्याने व्यक्तीला उपासनेचे दुप्पट फळ मिळते. त्याचे महत्त्व पुढीलप्रमाणे-
द्विपुष्कर योग- ज्योतिष शास्त्रानुसार द्विपुष्कर योगात केलेल्या कार्याचे दुप्पट फळ मिळते. या योगात मौल्यवान वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते.
वृद्धी योग- शास्त्रानुसार या योगात केलेल्या पूजेने पुण्य वाढते. तसेच या योगात केलेले सत्कार्यही दीर्घकाळ फळ देते.
ध्रुव योग- या योगात भविष्याच्या दृष्टीने ठोस निर्णय घेतल्यास यश मिळते. म्हणून त्या योगाला ध्रुव योग म्हटले जाते.
योगाचा सुमुहूर्त जाणून घेऊ:
द्विपुष्कर योग : २३ जुलै रोजी रात्री १० वाजता सुरू होईल आणि २४ जुलै रोजी सकाळी ५. ३८ वाजता संपेल.
वृद्धी योग: २४ जुलै रोजी दुपारी २ ते ४ पर्यंत आहे
ध्रुव योग : २४ जुलै रोजी दुपारी २ ते सायंकाळी ८ पर्यंत आहे.
तुम्हीदेखील एखादे महत्त्वाचे काम करण्याच्या विचारात असाल तर वर दिलेली मुहूर्त वेळ गाठून यशाच्या दिशेने कूच करू शकता!