नोव्हेंबरची दुसरी संकष्ट चतुर्थी: उपवास करा, पण ‘ही’ उपासनाही करा; संकटे, अडचणी दूर होतील!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 12:46 PM2023-11-28T12:46:49+5:302023-11-28T12:47:39+5:30
Kartik Sankashti Chaturthi November 2023: नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या संकष्ट चतुर्थीनिमित्त ही उपासना नियमितपणे केल्यास विघ्नहर्ता कृपेने शुभफल प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जाते.
Kartik Sankashti Chaturthi November 2023: गणपती ही वैश्विक देवता आहे. केवळ भारतात नव्हे तर जगभरात गणपतीची मंदिरे, उपासक आढळून येतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोत्तम आणि अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला कोट्यवधी भाविक उपवास, व्रताचरण करतात. असे असले तरी यासह एक उपासनाही सांगितली जाते. ही उपासना केल्यास समस्या, अडचणी, संकटे दूर होऊ शकतात. गणपती बाप्पाचे शुभाशिर्वाद मिळू शकतात, अशी मान्यता आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी अश्विन महिन्यातील संकष्ट चतुर्थी होती. तर, आता गुरुवार, ३० नोव्हेंबर रोजी कार्तिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे. संकष्ट चतुर्थीला अनेक जण उपवास करतात. काही जण सकाळी फक्त चहा घेऊन किंवा निर्जळी उपास करतात. अशा वेळी उपासाचे वातुळ पदार्थ खाऊन उपास करण्यापेक्षा उपास न करणे प्रकृतीच्या दृष्टीने योग्य ठरते. याउलट फलाहार करून उपास केला आणि रात्री पूर्णान्न भोजन ग्रहण केले, तर दिवसभर केलेल्या तपश्चर्येचा तना-मनाला निर्मळ आनंद मिळतो, असे सांगितले जाते. या दिवशी उपासाइतकेच उपासनेलाही महत्त्व असते. देवाची करुणा भाकावी, त्याच्या सान्निध्यात राहावे, पूजा करावी, अभिषेक करावा, असे म्हटले जाते.
कोणती उपासना करावी?
माणसाच्या जीवनात अनेक अडचणी, समस्या, विघ्न येत असतात. काही किरकोळ, तर काही तीव्र स्वरुपाची असतात. विघ्नहर्ता अशी गणपती बाप्पाची ओळख आहे. संकष्टीपासून सलग महिनाभर पुढील उपासना करावी. त्यानंतरही उपासना सुरू ठेवली तरी काहीच हरकत नाही. मात्र, निदान महिनाभर हे व्रत आचरावे असे गणेश पुराणात सांगितले आहे. बाप्पाची उपासना दिलेल्या पद्धतीनुसार केली असता त्याचाही आशीर्वाद मिळतो.
ही उपासना कशी करावी?
जीवनातील संकटे, समस्यांची प्रतिकूलता कमी व्हावी, दिलासा किंवा मुक्तता मिळावी, यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले जातात. या प्रयत्नाला अध्यात्मिक शक्तीचे पाठबळ मिळावे, म्हणून संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर 'ॐ गं गौ गणपतये विघ्नविनाशने स्वाः' या गणेश मंत्राचा जप सुरू करावा. रोज सायंकाळी दिवेलागण झाल्यावर शांतचित्ताने बाप्पासमोर बसून मन एकाग्र करा. सांयकाळची वेळ शक्य नसेल तर जी वेळ तुमच्या सोयीची आहे ती एक वेळ ठरवून सलग महिनाभर हा संकल्प पाळा.
किमान १०८ वेळा मंत्र पठण ठरेल उपयुक्त
बाप्पाला गंध लावून आणि फुल वाहून जपाला सुरुवात करा. हा मंत्र रोज १००८ वेळा म्हणणे अपेक्षित आहे. परंतु वेळे अभावी ते शक्य नसेल तर किमान १०८ वेळा हा मंत्र जरूर म्हणावा. मंत्र पठण झाल्यावर देवाला आपला मनोदय सांगून आपली मनोकामना पूर्ण व्हावी, अशी प्रार्थना करावी. मंत्र पठण किंवा नित्यनेमाने जप केल्यामुळे प्रापंचिक त्रासातून काही क्षण मन स्थिर होते, विसावते. शांत मन चांगल्या कामासाठी प्रेरित करता येते. म्हणून मंत्रजप करावा असे सांगितले जाते.