कार्तिक संकष्ट चतुर्थी: चंद्रदर्शनाला एवढे महत्त्व का आहे? पाहा, मान्यता अन् प्रचलित कथा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 12:39 PM2023-11-29T12:39:17+5:302023-11-29T12:39:36+5:30
Kartik Sankashti Chaturthi November 2023: या प्रथेचे आपण पालन का करतो? चंद्रोदय झाल्यावरच उपास का सोडतो? जाणून घ्या...
Kartik Sankashti Chaturthi November 2023: नोव्हेंबर महिन्यातील दुसरी संकष्ट चतुर्थी गुरुवार, ३० नोव्हेंबर २०२३ रोजी आहे. कार्तिक महिन्यातील ही संकष्ट चतुर्थी आहे. संकष्ट चतुर्थीचे व्रत कुणीही करू शकते. हे एक काम्यव्रत आहे. संकष्ट चतुर्थीचे व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते. मनोभावे हे व्रत केले असता, गणरायाची कृपादृष्टी लाभून ईच्छापूर्ती होते, असा भाविकांचा अनुभव आहे. अन्य व्रतांमध्ये सूर्योदयाची तिथी महत्त्वाची मानली जाते. मात्र, संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले जाते. संकष्ट चतुर्थीला केला जाणारा उपवास हा चंद्रोदय झाल्यानंतर सोडला जातो. जाणून घेऊया...
संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय, चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले गेले आहे. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी, असे सांगितले जाते. संकष्ट चतुर्थीबाबत अनेकांना प्रश्न पडतो. अनेकदा सायंकाळपर्यंत, सूर्यास्तानंतरही तृतीया असते. तर या दिवशी संकष्ट चतुर्थी व्रत कसे करावे? अशी शंकाही अनेक जण उपस्थित करतात. हे व्रत चतुर्थी प्रधान आहे. याबाबत पुराणात एक कथा आढळून येते.
गणपती आणि चंद्राची कथा
गणेशाचे जे स्वरूप आहे ते चंद्राला नीट कळले नाही. चंद्राने गणेशाची थट्टा केली. त्यावर गणपतीने त्याला शाप दिला. तुझे तोंड कोणी पाहणार नाही. हा शाप देण्यामागचे कारण एवढेच होते, की कोणीही कोणाच्या व्यंगावर हसू नये आणि कोणाला कमी लेखू नये. चंद्राला त्याच्या चुकीची जाणीव झाली. गणपतीने त्याला क्षमा करत उ:शाप दिला. गणेश चतुर्थीला तुझे दर्शन कोणी घेणार नाही पण संकष्टीला तुझे दर्शन घेतल्याखेरीज कोणी उपवास सोडणार नाही. गणेशाने दिलेल्या शब्दाचे पालन सर्व भक्त करतात. चतुर्थीला चंद्रदर्शन घेऊन उपवास सोडतात. काही जण एकादशीप्रमाणे दोन्ही वेळ उपास करतात. परंतु संकष्टीच्या व्रतात दोन्ही वेळचा उपास अपेक्षित नाही. म्हणून चंद्रदर्शन झाल्यावर उपवास सोडावा, असे सांगितले जाते.
चंद्रोदयाची वेळ पाहून चंद्रदर्शन घ्यावे
चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. शक्य असेल तर मोदक किंवा लाडवाचा नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. संकष्ट चतुर्थीचे दिवसभराचे व्रत पूर्ण करून सहभोजनाचा आनंद घ्यावा.