कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव अन् चातुर्मासाची सांगता; वाचा, महत्त्व, मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 07:00 AM2023-11-17T07:00:07+5:302023-11-17T07:00:07+5:30
Kartiki Ekadashi 2023 Date: कार्तिकी एकादशी अनेकार्थाने महत्त्वाची मानली जाते. का साजरा केला जातो विष्णुप्रबोधोत्सव? जाणून घ्या, डिटेल्स...
Kartiki Ekadashi 2023: नोव्हेंबर महिना अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जात आहे. नोव्हेंबर महिन्यात वर्षातील मोठा आणि महत्त्वाचा मानला गेलेला दिवाळीचा सण, दीपोत्सव मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात देशभरात साजरा करण्यात आला. दिवाळी झाल्यानंतर आता कार्तिकी एकादशीचे वेध लागले आहेत. याला प्रबोधिनी एकादशी किंवा विष्णुप्रबोधोत्सव असेही म्हटले जाते. आषाढी एकादशीपासून सुरू झालेल्या चातुर्मासाची कार्तिकी एकादशीला सांगता होत आहे. कार्तिकी एकदशी कधी आहे? तारीख, महत्त्व आणि काही मान्यता जाणून घेऊया... (Kartiki Ekadashi 2023 Date)
आषाढी एकादशीप्रमाणे कार्तिकी एकादशीलाही हजारो वारकरी वारी करतात. विठ्ठल दर्शनाची ओढ भाविकांना लागलेली असते. आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. कार्तिकी एकादशी अनेकार्थाने महत्त्वाची मानली जाते. यंदा श्रावण महिना अधिक असल्याने चातुर्मासाचा कालावधी पाच महिन्यांचा झाला होता. कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होत आहे. आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींच्या दरम्यान चातुर्मास पाळला जातो. यंदा सन २०२३ मध्ये गुरुवार, २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. (Kartiki Ekadashi 2023 Significance)
विष्णुशयन ते विष्णुप्रबोधोत्सव
कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी प्रबोधिनी एकादशी म्हणून साजरी केली जाते. दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस. कर्क संक्रांत आषाढ मासात येते; म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस 'देवशयनी एकादशी' म्हटले आहे; त्या दिवशी देव झोपी जातात, अशी समजूत रूढ आहे. कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन जागृत होतात; म्हणून तिला 'प्रबोधिनी (बोधिनी, देवोत्थानी) एकादशी' असे म्हटले जाते. नवसृष्टीनिर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य सुरू असताना पालनकर्ता श्रीविष्णु निष्क्रिय असतो; म्हणून चातुर्मासास विष्णुशयन म्हटले जाते. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णुशयन, तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो. (Prabodhini Ekadashi 2023 Vishnu Prabodh Utsav)
कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौणिमेपर्यंत तुलसी विवाह
कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौणिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्री कृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे. तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते व मोक्ष प्राप्ती होते, अशी मान्यता आहे. भारतीय संस्कृतीत तुळशीला फार महत्व आहे. श्रीविष्णूला तुळस प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिया असेही संबोधले जाते. तुळशीवाचून केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते असे पद्मपुराणात म्हटले आहे. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले, तेंव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले, त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला, असे मानले जाते. तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील त्या सर्वांचे उद्यापन केले जाते.