प्रबोधिनी एकादशी: ‘असे’ करा व्रत, श्रीविष्णू होतील प्रसन्न; पाहा, शुभ मुहूर्त अन् अद्भूत योग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 10:44 AM2023-11-21T10:44:33+5:302023-11-21T10:51:11+5:30

Kartiki Ekadashi Vrat 2023: कार्तिकी प्रबोधिनी एकादशी व्रतपूजनाची सोपी पद्धत कोणती? या दिवशीचा शुभ मुहूर्त आणि काही मान्यता, महत्त्व जाणून घ्या...

kartiki ekadashi 2023 know about shubh muhurat vrat puja vidhi in marathi and significance of prabodhni ekadashi 2023 | प्रबोधिनी एकादशी: ‘असे’ करा व्रत, श्रीविष्णू होतील प्रसन्न; पाहा, शुभ मुहूर्त अन् अद्भूत योग

प्रबोधिनी एकादशी: ‘असे’ करा व्रत, श्रीविष्णू होतील प्रसन्न; पाहा, शुभ मुहूर्त अन् अद्भूत योग

Kartiki Ekadashi Vrat 2023: आषाढी एकादशीनंतर चातुर्मास काळ सुरू होतो. मराठी वर्षातील याला सर्वाधिक महत्त्व असते. या काळात अनेक व्रत-वैकल्ये, सण-उत्सव साजरे केले जातात. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जातो. कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होता. याला देवउठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असेही म्हटले जाते. कार्तिकी एकादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो. यंदा कार्तिकी एकदाशी कधी आहे? कार्तिकी एकादशीचे व्रतपूजन कसे करावे? जाणून घेऊया...

प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते. कार्तिक महिन्यात येणाऱ्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हटले जाते. यंदाच्या वर्षी श्रावण मास अधिक आल्यामुळे चातुर्मास काळ पाच महिन्यांचा होता. 

कार्तिकी एकादशीचे महत्त्व अन् काही मान्यता

काही मान्यतांनुसार, दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस. कर्क संक्रांत आषाढ मासात येते; म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस 'देवशयनी एकादशी' म्हटले आहे; त्या दिवशी देव झोपी जातात, अशी समजूत रूढ आहे. कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन जागृत होतात; म्हणून तिला 'प्रबोधिनी (बोधिनी, देवोत्थानी) एकादशी' असे म्हटले जाते. नवसृष्टीनिर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य सुरू असताना पालनकर्ता श्रीविष्णु निष्क्रिय असतो; म्हणून चातुर्मासास विष्णुशयन म्हटले जाते. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णुशयन, तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो.

कार्तिकी प्रबोधिनी एकादशी: गुरुवार, २३ नोव्हेंबर २०२३

कार्तिकी प्रबोधिनी एकदाशी प्रारंभ: बुधवार, २२ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्रौ ११ वाजून ०४ मिनिटे.

कार्तिकी प्रबोधिनी एकादशी सांगता: गुरुवार, २३ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे.

कार्तिकी प्रबोधिनी एकादशीचा व्रतपूजन विधी

मराठी वर्षात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. पद्मपुराणानुसार, कार्तिकी एकादशीचे व्रताचरण करणाऱ्यांना पापमुक्ती मिळते, असे सांगितले जाते. कार्तिकी एकदशीचे व्रताचरण करणाऱ्यांनी कार्तिकी एकादशी व्रत आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे.

कार्तिकी प्रबोधिनी एकादशी दिनीचे अद्भूत योग

नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी स्वराशीत म्हणजे मूळ त्रिकोणी कुंभ राशीत विराजमान आहे. त्यामुळे शश नावाचा राजयोग जुळून आला आहे. तर नवग्रहांचा राजा सूर्य आणि सेनापती मानला गेलेला मंगळ वृश्चिक राशीत असून, या दोन्ही ग्रहांच्या युतीने आदित्य मंगल योग जुळून आला आहे. तसेच बुध ग्रहही वृश्चिक राशीत आहे, यामुळे सूर्य आणि बुधाचा बुधादित्य नामक राजयोग जुळून आला आहे. तसेच सूर्य, मंगळ आणि बुध या ग्रहांचा त्रिग्रही योगही जुळून आला आहे. कार्तिकी प्रबोधिनी एकादशी दिनी उत्तरा भाद्रपदा नक्षत्र असून, वज्र नामक योग आहे. 


 

Web Title: kartiki ekadashi 2023 know about shubh muhurat vrat puja vidhi in marathi and significance of prabodhni ekadashi 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.