रामरक्षेतील केवळ ‘हा’ श्लोक म्हणा; संपूर्ण विष्णुसहस्रनामाचे पुण्य मिळवा; पाहा, रामनामाचा महिमा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 08:17 AM2022-01-25T08:17:20+5:302022-01-25T08:19:16+5:30
रामनाम ज्याचे मुखी, तो नर धन्य तिन्ही लोकी, असे म्हटलेच गेले आहे. पाहा, रामनामाचे महत्त्व...
भारतीय संस्कृतीत देवतांचे पूजन, भजन, नामस्मरण यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. देशभरातील हजारो मंदिरांमध्ये दररोज अगदी न चुकता अभिषेक, पूजा परंपरांप्रमाणे पार पडत असतात. याशिवाय कोट्यवधी घरात आपापले कुळाचार, कुळधर्म यांप्रमाणे सकाळी पूजा आणि सांजवात केली जाते. यावेळी अनेकविध प्रकारची स्तोत्र, मंत्र म्हटली जातात. आताच्या घडीला शेकडो प्रकारची, अनेक देवतांची लाखो श्लोक, स्तोत्र, मंत्र आहेत आणि याचे पठण नित्यनेमाने केले जाते.
प्रत्येक स्तोत्राचे स्वत:चे अस्तित्व, वैशिष्ट्य, प्रभाव, लाभ, उपयुक्तता वेगळी आहे. यामध्ये विष्णुसहस्रनामाचे महत्त्व वेगळे आहे. मात्र, प्रत्येकाला विष्णुसहस्रनाम किंवा त्याचा पाठ करता येतोच असे नाही. इच्छा असूनही अनेकांना त्याचे पठण करता येत नाही. मात्र, यामुळे निराश व्हायचे काहीच कारण नाही. कारण कालातीत महत्त्व असलेल्या रामरक्षेतील केवळ एक श्लोक पुरेसा असून, संपूर्ण विष्णुसहस्रनामाचे पुण्य मिळू शकते, असे सांगितले जाते. रामरक्षा हजारो वर्षांपासून उपलब्ध असून, त्याचे महत्त्व, प्रभाव, पुण्य वेगळे आहे. रामरक्षेतील तो श्लोक कोणता, यासंदर्भात एक पौराणिक कथा सांगितली जाते. जाणून घेऊया...
एकदा पार्वतीने विष्णुसहस्रनाम स्तोत्र पठण करण्याचा संकल्प केला होता. पार्वती या स्तोत्राचे १००० पाठ करत असे. एखाद्या वेळेस जर काही विघ्ने आल्यास, पार्वती देवी ते पुन्हा पहिल्यापासून म्हणण्यास सुरुवात करायची. एकदा विष्णुसहस्रनाम स्तोत्र पठण असताना अचानक देवाधिदेव महादेव शिवशंकर तेथे आले. महादेवांमूळे पार्वतीच्या स्तोत्र पठनात खंड पडला. निराश झालेल्या पार्वतीला पाहून महादेवांनी तिला राम नामाचा जप करण्यास सांगितला. विष्णुसहस्रनाम आणि श्रीराम नामात काय फरक आहे? असे पार्वतीने महादेवाला विचारले, असता महादेव म्हणाले,
राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे|
साहस्रनाम तत्तुल्यं, रामनाम वरानने||
म्हणजेच, एकदा श्रीराम नाम घेणे म्हणजेच एक हजारवेळा नामपठण करणे होय. विष्णूसहस्रनामात भगवान श्रीविष्णूंची १००० नावे आहेत. मात्र, श्रीविष्णूंचा सातवा अवतार असलेल्या श्रीरामांचे केवळ नामस्मरण करणे हे नाव १००० नामाबरोबरीचे आहे. त्यामुळे १००० विष्णुसहस्रनामाचे जेवढे फल मिळते तेवढेच राम नामाने मिळते. महादेव पार्वतीला सांगतात की, श्रीराम हे माझे आदर्श आहेत. मी सदैव ध्यान करताना श्रीराम नामाचा नेहमी जप करत असतो, असे महादेव पार्वती देवीला सांगतात.
महाभारतात विष्णुसहस्रनाम स्तोत्राचा उल्लेख
भगवान महाविष्णुंच्या १००० नामांमधून त्यांचे वैविध्यपूर्ण कार्य डोळ्यासमोर येते. विष्णुंच्या नावाबरोबर त्यांच्या कार्याचीही उजळणी व्हावी, या हेतूने महाभारत कालापासून हे स्तोत्र मोठ्या भक्तीभावाने म्हटले जात आहे. महाभारताच्या 'अनुशासनपार्वान्तर्गत', 'दानधर्म' पर्वामध्ये १४९ व्या अध्यायात विष्णुसहस्रनाम स्तोत्राचा उल्लेख आढळतो. महाभारत रचैते महर्षी व्यास यांनीदेखील सांगितले आहे, की 'जो विष्णुसहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करतो, त्याचे काहीच अशुभ होत नाही. त्याला आत्मसुख, लक्ष्मी, धैर्य प्राप्त होऊन त्याचा सर्वत्र विजय होतो.
विष्णुसहस्रनामाचा प्रभाव आणि लाभ
विष्णुसहस्रनाम पठणाने आर्थिक, वैवाहिक, सामाजिक, राजकीय प्रश्नांतून मार्ग मिळतो. गर्भधारणेसंबंधी समस्या दूर होतात. गर्भसंस्काराच्या वेळी स्तोत्र ऐकले असता, बालकावर चांगले संस्कार होतात. ग्रहदशा कुठलीही असो, विष्णुसहस्रनामाचे पठण केल्यामुळे मन:शांती लाभते, भय कमी होते आणि संकटावर मात करण्याचे बळ मिळते. मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल, घरात वादविवाद होत असतील, तर विष्णुसहस्रनामाचे सामुहिक पठण करावे. निश्चित लाभ होतो, असे सांगितले जाते.