BLOG: जन्मताच ॐकार, भक्तांचा उद्धार, दत्त संप्रदायाचा विस्तार; युगपुरुषी अवतार नृसिंह सरस्वती!

By देवेश फडके | Updated: December 11, 2024 11:37 IST2024-12-11T11:33:56+5:302024-12-11T11:37:17+5:30

Datta Jayanti: दत्त जयंतीनिमित्त दत्तगुरुंचा दुसरा अवतार आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांचा उत्तरावतार असलेल्या श्रीनृसिंह सरस्वती महाराजांच्या अवतारकार्याविषयी जाणून घेऊया...

know about dattaguru second avtar yugpurush nrusimha saraswati who salvation of devotees and expansion of datta sampradaya | BLOG: जन्मताच ॐकार, भक्तांचा उद्धार, दत्त संप्रदायाचा विस्तार; युगपुरुषी अवतार नृसिंह सरस्वती!

BLOG: जन्मताच ॐकार, भक्तांचा उद्धार, दत्त संप्रदायाचा विस्तार; युगपुरुषी अवतार नृसिंह सरस्वती!

Datta Jayanti: दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्तात्रेयांचे स्वरुप, दत्तावतार, अवतारकार्य यांची अगदी थोडक्यात माहिती आपण घेत आहोत. दत्तगुरुंचा आद्य अवतार हे श्रीपाद श्रीवल्लभ यांनी अवघ्या ३० वर्षांच्या अवतारकार्यात श्रीकृष्णाप्रमाणे बाललीला करत अफाट कार्य केले. श्रीनृसिंह सरस्वती हे श्रीदत्तप्रभूंचे दुसरे आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे उत्तरावतार असल्याचे मानले जाते. श्रीनृसिंह सरस्वती हेच पुढे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ प्रकट झाले. नृसिंह सरस्वती यांनीही आपल्या अवतारकार्यात अनेक लीला केल्या. भक्तांचा उद्धार केला. दत्त संप्रदाय विस्तारण्याचे मोठे कार्य केले. तसेच पाचवा वेद म्हणून ज्याची ख्याती आहे, ते अद्भूत गुरुचरित्र समाजाला दिले. श्रीनृसिंह सरस्वती या युगपुरुषाच्या अवतारकार्याचा अगदी थोडक्यात आढावा घेऊया...

श्रीनृसिंह सरस्वती दत्तोपासनेचे संजीवक होते. तेराव्या शतकाच्या अखेरीस दत्तोपासनेच्या पुराणप्रवाहात संजीवन ओतण्याचे कार्य श्रीनृसिंह सरस्वतींनी केले. समग्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात ते दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरले, असे म्हटले जाते. श्रीनृसिंह सरस्वतीचा अवतार काळ शके १३०० ते १३८० (इ.स. १३७८ ते १४५८) असा आहे. श्रीगुरुचरित्र हा अपूर्व ग्रंथ दत्तसंप्रदायाचा वेदतुल्य, प्राणप्रिय ग्रंथ आहे. प्रापंचिकांचा आणि पारमार्थिकांचा तो मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणीच आहे. या वेदतुल्य गुरुचरित्राचे चरित्रनायक आहेत. श्री नृसिंह सरस्वती संन्यासधर्माचे सर्वोत्तम आदर्श होते, असे सांगितले जाते. 

जन्मताच ॐकाराचा उच्चार, आठव्या वर्षी सर्व वेद म्हणून दाखवले

अकोला जिल्ह्यातील लाड कारंजे या गावी अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी नृसिंह सरस्वती यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव शालग्राम असे होते. परंतु त्यांना नरहरी नावानेच ओळखले जाई. जन्मताच ते ॐचा जप करू लागले. सर्वसामान्य मुलाप्रमाणे रडले नाहीत. त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले. तत्कालीन महान ज्योतिषांनी हा मुलगा साक्षात ईश्वरावतार असल्याचे सांगितले. हा मुलगा श्रीहरीप्रमाणे सर्व नरांचे पाप, ताप, दैन्य हरण करणारा होईल म्हणून याचे नाव ‘नरहरी’ असे ठेवावे असे त्यांनी सुचवले. वय वाढत चालले तरी ॐकाराखेरीज कोणताच शब्द त्याला बोलता येत नसे. हा मुलगा मुका निघणार की काय ? अशी शंका आली. सात वर्षांपर्यंत बाळाने दुसरा शब्दच कधी उच्चारला नाही. त्याच्या मुंजीचा बेत ठरला. पण हा कुमार मंत्रोच्चार कसा करणार, म्हणून सर्वांना काळजी होती. बाळाने नाना चमत्कार करून दाखविले. लोखंडाला हात लावताच त्याने बावन्नकशी सोने करून दाखविले. गायत्री मंत्राची दीक्षा घेऊन कुमार मातेजवळ भिक्षेसाठी आला. या वेळी बाळाने ऋग्वेदातील मंत्रांचा स्पष्ट उच्चार केला. मंत्रांचा उच्चार ऐकताच सर्वांना नवल वाटले. यजुर्वेद, सामवेद म्हणून बाळाने सगळ्या लोकांना चकित केले. हा कुमार अवतारी पुरुष असल्याची खात्री सर्वांना पटली.

स्मरण करशील त्यावेळी मी तुला दर्शन देईन

मुंजीनंतर ते लवकरच तीर्थयात्रेला निघाले. पण वत्सल मातेच्या आग्रहास्तव ते एक वर्ष करंज ग्रामातच राहिले. निघण्यापूर्वी त्यांनी आईला त्रिमूर्ती दत्तस्वरूपात दर्शन दिले. तसेच पूर्वावतारातील श्रीपाद श्रीवल्लभ आपणच असल्याचे दाखवून दिले. स्मरण करशील त्यावेळी मी तुला दर्शन देईन असे आश्वासन देऊन ते श्री क्षेत्र काशीला निघाले. श्री क्षेत्र काशीला त्यांनी उग्र अनुष्ठान आरंभले. या बाल ब्रह्मचारी साधूची ती भक्तियुक्त पण कठोर साधना, तपश्चर्या पाहून श्री क्षेत्र काशीतील लहानथोर, विद्वान पंडित, आबालवृद्ध आश्चर्यचकित झाले. सर्वजण त्यांना विनम्रभावाने नमस्कार करू लागले; पण इच्छा असूनही संन्यासी लोकांना नमस्कार करता येईना. म्हणून काशीतील तत्कालीन ख्यातकीर्त, सर्वश्रेष्ठ, वयोवृद्ध संन्यासी श्रीकृष्णसरस्वती स्वामींनी त्यांना चतुर्थाश्रम स्वीकारण्याची विनंती केली. पितृतुल्य ऋषितुल्य श्री स्वामींच्या विनंतीला मान देऊन त्यांनी संन्यासदीक्षा स्वीकारली. वृद्ध श्री कृष्णसरस्वती स्वामींनीच त्यांना चतुर्थाश्रमाची दीक्षा दिली. त्यांच्या हाती दंड दिला. त्यांचे ‘श्री नृसिंहसरस्वती’ असे नूतन नामकरण केले. पायी खडावा, गळ्यात रुद्राक्ष माळा, हातात दंड कमंडलू, कपाळी भस्म, मुखावर सात्त्विक स्मितहास्य, संपूर्ण देहावर तपश्चर्येचे तेज, हृदयात ब्रह्मानंद असलेले दत्तावतारी श्री नृसिंहसरस्वती सर्वांना साक्षात श्री काशीविश्वेश्वरच वाटत. 

श्री क्षेत्र गाणगापूर गुरुभक्तांची काशी ठरली, दत्तभक्तांची पंढरी झाली

उत्तरेकडील वास्तव्य संपवून ते सप्त शिष्यांसह दक्षिणेकडे वळले. निरनिराळ्या तीर्थांना त्यांनी भेटी दिल्या. तब्बल तीस वर्षांनी ते मार्गदर्शनार्थ स्वगृही करंजनगरला परतले. करंजग्रामातील लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. संन्यासी बनलेल्या अलौकिक बाळाच्या मंगल दर्शनाने माता-पिता कमालीचे आनंदित झाले. काही दिवस करंजपुरीत राहून ते लोकोद्धारासाठी पुनश्च बाहेर पडले. अभूतपूर्व चमत्कारांनी त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. अनेक पतितांचा उद्धार केला. अनेकांना त्यांनी सन्मार्गाला लावले. वाढत जाणाऱ्या जनसंपर्कापासून थोडे दिवस दूर राहण्यासाठी ते वैजनाथ येथे एक वर्ष गुप्त राहिले. एका वर्षाच्या गुप्त अनुष्ठानानंतर श्री गुरूंचा पुनश्च अखंड संचार सुरू झाला. कृष्णातिरी भिलवडी येथील भुवनेश्वरी देवीसन्निध असलेल्या श्री क्षेत्र औदुंबरी त्यांनी एक चातुर्मास वास्तव्य केले. तिथून ते कृष्णा-पंचगंगा संगमावर राहिले. तिथे त्यांचे बारा वर्षे म्हणजे एक तप वास्तव्य होते. ‘मनोहर पादुका’ स्थापून त्यांनी त्या स्थानाचा निरोप घेतला. तिथून ते भीमा-अमरजा संगमावर श्री क्षेत्र गाणगापूरला आले. तिथे त्यांचे तेवीस वर्षे वास्तव्य होते. या कालखंडात त्यांनी अनेकांचा उद्धार केला. श्री क्षेत्र गाणगापूर गुरुभक्तांची काशी ठरली. दत्तभक्तांची पंढरी झाली. श्री गुरूंची कीर्ती भारतभर पसरली. चहू दिशांतून लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. उत्तरोत्तर त्यांचा भक्तपरिवार वाढतच गेला. 

प्रतिकूल परिस्थितीत लोकरक्षणाचे व धर्मसंस्थापनेचे फार मोठे कार्य

तेराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत दत्तोपासनेचा जो पुराणप्रवाह वाहत आला होता, त्यात जीवन ओतण्याचे कार्य श्रीनृसिंह सरस्वतींनी केले. त्यांचे जीवनकार्य केवळ दत्तोपासनेच्या क्षेत्रातच नव्हे, तर समग्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरले आहे. त्यांच्या जीवनकाळात जी संघर्षमय परिस्थिती निर्माण झाली होती त्या परिस्थितीच्या गर्भातूनच महापुरुषांच्या उदयाचा हुंकार ऐकू येत होता. त्या काळात एका आक्रमणशील संस्कृतीने हिंदू परंपरेचा ग्रास घेण्यासाठी महाराष्ट्रात सर्वत्र संचार चालविला होता. त्या संकटातून महाराष्ट्राला मुक्त करण्याचे महानकार्य श्रीनृसिंह सरस्वतींनी केले. श्रीनृसिंह सरस्वतींनी आपल्या दीर्घ आयुष्यात प्रतिकूल परिस्थितीत लोकरक्षणाचे व धर्मसंस्थापनेचे फार मोठे कार्य केले आहे. नृसिंहवाडी व गाणगापूर या जुन्या तीर्थांना नवा उजाळा देऊन त्यांनी त्यांचे माहात्म्य वाढविले. लोकांना सन्मार्ग दाखविला. सिद्धसरस्वती या शिष्यास श्रीगुरूंचा सहवास पुष्कळच असून तोच त्यांच्या निजानंदगमनापर्यंत सान्निध्यात होता. यानेच श्रीगुरूंचे संस्कृत चरित्र तयार केले असावे व या संस्कृत चरित्राच्या आधाराने सिद्धनामधारकसंवादाच्या रूपाने पुढे सरस्वती गंगाधराने विख्यात असा ‘श्रीगुरुचरित्र’ नावाचा मराठी ग्रंथ लिहिला, असे म्हटले जाते. 

श्रीनृसिंह सरस्वतींनी स्थापन केलेल्या पादुकांचे महात्म्य

अमरापूर हे गांव कृष्णा-पंचगंगा संगमावर आहे. तेथे नरसिंह सरस्वती बारा वर्षे राहिले. त्यांच्या या गावच्या प्रदीर्घ निवासामुळेच या गावाला नरसोबाची वाडी हे नाव प्राप्त झाले. त्यानंतर गाणगापुरी ते चौवीस वर्षे राहिले, असे सांगितले जाते. श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे आपल्या 'निर्गुण पादुका' स्थापन केल्या. श्रीनृसिंह सरस्वती महाराजांनी कृष्णातीरावरील श्रीक्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य केले. आपल्या 'विमल पादुका ' स्थापन करून वाडीला गमन केले होते. अश्विन कृष्ण द्वादशी, श्रीगुरुद्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या 'मनोहर पादुका' स्थापन करून गाणगापुरकडे प्रयाण केले. या तीनही पादुकांना विशेष नावे आहेत. विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून, निर्गुण पादुका कशापासून बनलेल्या आहेत, याची माहिती कोणालाच नाही. विमल पादुका सोडून बाकी अन्य दोन पादुकांच्या नावांचे संदर्भ श्रीगुरुचरित्रात पाहायला मिळतात. औदुंबर येथे श्रीनृसिंह सरस्वती महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता. त्यांच्या त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत. पण या नावाचा उल्लेख श्रीगुरुचरित्रात नाही. विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, कोणताही मल, दोष नसणाऱ्या पादुका. श्रीनृसिंह सरस्वतींनी शिव, विष्णू, देवी, गणेश यांच्या उपासनेचा उपदेश केला. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात दत्तोपासना लोकप्रिय झाली, अशी मान्यता आहे. त्यांच्या वास्तव्यामुळे औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर ही गावे दत्तसांप्रदायिकांची तीर्थक्षेत्रे बनली. ज्या काळात महाराष्ट्राची वाटचाल घनांधकारातून सुरू होती, त्या काळात श्रीनृसिंह सरस्वतींचे जीवनकार्य पथप्रदर्शक प्रखर ज्योतीसारखे कल्याणकारक ठरले. महाराष्ट्रभूमीला भक्तीचा, मुक्तीचा मार्ग दाखविणारा हा महापुरुष मराठी संस्कृतीच्या इतिहासात ‘युगपुरुष’ म्हणून चिरंतन राहील, असे सांगितले जाते. 

सुखधामी गेल्यानंतर चार पुष्पे प्रसाद म्हणून पाठवून देतो

प्रदीर्घ काळ भक्तकार्य करून श्री नृसिंहसरस्वती अवतार समाप्तीची भाषा बोलू लागले. भीमा-अमरजा संगम हा गंगा यमुना संगम आहे. इथे नित्य स्नान करा. सत्त्वस्थ भक्ताला कल्पवृक्षाप्रमाणे फळ देणाऱ्या इथल्या अश्वत्थाची नित्य पूजा करा. या कल्पतरूच्या छायेत जो उपासना करील तो कृतार्थ होईल, अशी अभय वाणी उच्चारून ते महाप्रस्थानास सिद्ध झाले. श्रीसद्‍गुरू नृसिंह सरस्वतींच्या आज्ञेप्रमाणे तयारी करण्यात आली. केळीच्या पानांवर फुलांचे आसन रचण्यात आले. गुरुनामाच्या घोषात ते आसन नदीच्या पाण्यात ठेवण्यात आले. श्रीगुरूदेवांनी त्यावर आरोहण केले. सर्व शिष्यांचे, भक्तांचे अभिवादन स्वीकारून ते प्रवाहाच्या दिशेने मार्गस्थ झाले. मार्गस्थ होताना त्यांनी ‘सुखधामी गेल्यानंतर चार पुष्पे प्रसाद म्हणून पाठवून देतो’, असे सांगितले. त्याप्रमाणे पुष्पे प्रसाद म्हणून परत आली. यानंतर सुमारे ३०० वर्षांनी कर्दळीवनातून श्री स्वामी समर्थांचा अवतार घेऊन प्रकटले. पुढील भागात श्री स्वामी समर्थांच्या अवतारकार्याबाबत जाणून घेऊ...

हम गया नहीं जिंदा है, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे; अशक्यही शक्य करणारे स्वामी

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त || 

- देवेश फडके.

 

Web Title: know about dattaguru second avtar yugpurush nrusimha saraswati who salvation of devotees and expansion of datta sampradaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.