Maharashtra Bendur 2024 महाराष्ट्रीय बेंदूर: बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस; नेमका कसा साजरा होतो सण?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 10:42 AM2024-07-19T10:42:24+5:302024-07-19T10:48:32+5:30
Maharashtra Bendur 2024: महाराष्ट्रात वेगळे महत्त्व प्राप्त असणारा सण म्हणजे बेंदूर.
Maharashtra Bendur 2024: चातुर्मास सुरू झाला आहे. देवशयनी आषाढी एकादशी झाल्यानंतर विविध प्रकारचे सण-उत्सव, व्रते यांची रेलचेल सुरू होते. धार्मिक, सांस्कृतिक आणि निसर्गानुरुप असलेल्या सण-उत्सव, व्रतांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. भारतीय संस्कृतीत निसर्ग, त्यातील गोष्टींची कृतज्ञता अनेक प्रकारे, सण-उत्सवातून व्यक्त केली जाते. आषाढी एकादशीनंतर बैल पोळा याप्रमाणे महाराष्ट्रीय बेंदूर हा सण साजरा केला जातो. या सणाचे महत्त्व जाणून घेऊया...
१९ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी महाराष्ट्रीय बेंदूर साजरा केला जात आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषीसंस्कृती हा देशाचा प्राण आहे. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. कृषीसंस्कृती म्हटले की, शेती, शेतकरी, बैल, शेतीची अवजारे आणि शेतीशी संबंधित अन्य गोष्टी आपसूकच येतात. यापैकीच एक आपल्या मातीतील सण म्हणजे बेंदूर. महाराष्ट्र आणि देशभरातील विविध राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो. मात्र, प्रदेशानुसार हा सण साजरा करण्याची पद्धत आणि दिवस बदलत असल्याचे दिसून येते.
महाराष्ट्र बेंदूर किंवा महाराष्ट्रीय बेंदूर
महाराष्ट्रात वेगळे महत्त्व प्राप्त असणार सण म्हणजे बेंदूर. या सणाला महाराष्ट्र बेंदूर किंवा महाराष्ट्रीय बेंदूर असेही म्हटले जाते. पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील काही जिल्ह्यांमध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. बेंदूर आणि पोळा हा सण साजरा करण्याची पद्धत बहुतांशपणे सारखीच आहे. शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या दिवशी सकाळपासून गाय-बैलांना न्हाऊ माखू घातले जाते. त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घातली जाते. याशिवाय घरात मातीचे दोन बैल प्रतीक म्हणून तयार केले जातात. त्यांची हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगांवर ठेवून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि हीच पुरणपोळीनंतर बैलांना खायला दिली जाते.
शेतकरी बांधव या दिवशी बैलांची सेवा करतात
बेंदूर सणाच्या दिवशी बैलांची खांदेमळणी केली जाते. खांदेमळणी ही सुद्धा विशेष असते. यावेळी बैलांचे खांदे गरम पाण्याने धुतले जातात. म्हणजेच बैलांचे खांदे गरम पाण्याने शेकले जातात. त्यानंतर बैलांच्या खांद्यांना हळद लावली जाते. बेंदूर सणाच्या दिवशी बैलांना कोणत्याही कामाला जुंपले जात नाही. दिवसभर त्यांना विश्रांती दिली जाते. शेतकरी बांधव या दिवशी बैलांची सेवा करतात. बैल आणि अन्य जनावरांना छान हिरवा चारा दिला जातो. दुपारनंतर बैलाला सजवले जाते. त्यांच्या शिंगांना छान रंग दिला जातो. अंगावर झूल घालतात. बेगड्या चिटकवल्या जातात. डोक्याला बाशिंग आणि गळ्यात घुंगरांची माळ घातली जाते. यादिवशी नवीन वेसण, म्होरकी, कंडा बैलांना घातला जातो. बैलांच्या अंगावर विविध रंगांचे ठसे उमटवले जातात. त्यानंतर बैलांची पूजा करून त्यांची मिरवणूक निघते. ढोल-ताशांच्या गजरामध्ये बैलांची मिरवणूक काढली जाते.