पुण्यातील गुरुजींनी दिली रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची वेळ; पौषात शुद्ध मुहूर्त कसा काढला?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 10:25 AM2024-01-08T10:25:39+5:302024-01-08T10:30:20+5:30

Ayodhya Ram Mandir: पौष महिना असला तरी रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सर्वोत्तम मुहूर्त काढण्यात आला आहे. कोणत्या गोष्टी आवर्जून विचारात घेतल्या? सविस्तर जाणून घ्या...

know about how much auspicious ram lalla pran pratishtha muhurat for ayodhya ram mandir | पुण्यातील गुरुजींनी दिली रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची वेळ; पौषात शुद्ध मुहूर्त कसा काढला?

पुण्यातील गुरुजींनी दिली रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची वेळ; पौषात शुद्ध मुहूर्त कसा काढला?

भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये अनेकविध गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्याकडे शुभ कार्याची सुरुवात करताना पंचांग, मुहूर्त आवर्जून पाहिले जाते. विविध गोष्टी यामध्ये पाहिल्या जातात. तिथी, वार, नक्षत्र, योग, करण, ग्रहांची स्थिती अशा अनेक गोष्टींची सांगड घालून उत्तम वेळ निवडली जाते. त्यालाच मुहूर्त म्हटले जाते. लग्न असो, उपनयन असो, साखरपुडा असो, वास्तुशांत असो, भूमिपूजन असो, गृहप्रवेश असो किंवा अगदी देवाची प्राणप्रतिष्ठा करायची असो, शुभ मुहूर्त आहे का, हे नक्कीच पाहिले जाते. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा आहे. या भव्य सोहळ्याचा शुभ मुहूर्त पुण्यातील एका पंचांगकर्त्या गुरुजींनी काढून दिला आहे. पौष महिन्यात शुभ कार्ये करत नाहीत, अशी मान्यता आहे. असे असताना याच महिन्यात रामललाची प्राणप्रतिष्ठा का केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. मराठमोळ्या गुरुजींनी शुद्ध मुहूर्त कसा काढला, त्याचे शुभत्व कसे आहे? जाणून घेऊया...

श्रीविष्णूंचा सातवा अवतार, आदर्श पुत्र, एकपत्नीव्रती, महापराक्रमी, सर्वश्रेष्ठ योद्धा आणि आदर्श राजा म्हणून प्रभू श्रीराम सर्वश्रुत आहेत. वनवासाची चौदा वर्षे पूर्ण केल्यानंतर प्रजाजनांना, मातांना, अयोध्येतील प्रत्येक जीवाला श्रीराम दर्शनाची आस लागली होती. कधी एकदा रामदर्शन होते, अशी चातकावस्था सर्वांची झाली होती. अगदी तसेच काहीचे चित्र आता देशभरात पाहायला मिळत आहे. अयोध्येत श्रीरामांचे मंदिर जसे साकारू लागले, तसे ही ओढ वाढत गेली आणि अखेर २२ जानेवारी २०२४ रोजी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. आज प्रत्येक देशवासी श्रीरामांबाबत बोलताना दिसत आहे. आस्तिक असो वा नास्तिक, रामांना मानणारा असो किंवा राम काल्पनिक आहेत, असे सांगणारे असो, ज्याच्या त्याच्या मुखी ‘रामनाम’ असल्याचे दिसत आहे. यासह प्राणप्रतिष्ठा मुहुर्ताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुण्यातील पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी हा मुहूर्त काढून दिला आहे. गौरव देशपांडे आयटी इंजिनिअर असून, या शुद्ध मुहुर्ताबाबत अगदी सविस्तर माहिती दिली. 

२५ जानेवारी पूर्वीचाच शुद्धातला शुद्ध मुहूर्त पाहिजे 

अयोध्येला राममूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्याविषयी मुहूर्त काढायचा आहे, अशी आज्ञा आम्हाला श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांनी एप्रिल २०२३ मध्ये केली. हा मुहूर्त शुद्धातला शुद्ध मुहूर्त असावा, असे गोविंद देवगिरी महाराजांनी सांगितले. २५ जानेवारी २०२४ च्या पूर्वीचाच हा मुहूर्त असावा, अशी त्यांची अट होती. शास्त्रांनुसार, देवतेची प्राणप्रतिष्ठा उत्तरायणात करणे सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होते. १५ जानेवारी २०२४ रोजी मकर संक्रांती आहे. त्यामुळे १५ जानेवारी ते २५ जानेवारी या १० दिवसांतील मुहूर्त घेण्यात यावा, अशी विचारसरणी सुरू झाली, अशी माहिती गौरव देशपांडे यांनी दिली. 

पौष महिन्यात शुभ कार्ये करावीत की नाहीत?

मकर संक्रांती ते २५ जानेवारी या दरम्यान मराठी महिना पौष येतो. पौष महिन्याबाबत काही समज, गैरसमज आणि संभ्रम समाजात असल्याचे पाहायला मिळते. पौष महिन्यात शुभ कार्ये करावीत की नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जातो. असे असले तरी पौष महिना प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी अतिशय उत्तम असल्याचे सांगितले गेले आहे. ज्योतिषशास्त्रात विशिष्ट ग्रंथ आहेत, जसे की, बृहद् दैवज्ञ रंजन विद्या मानवीय यामध्ये ‘पौषे राज्यविवृद्धिस्यात्’, असे फल सांगितले गेले आहे. पौषात देवतेची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, तर राज्यवृद्धी होते, प्रजा सुखकर होते, प्रजेला समाधान लाभते, असे फल दिले आहे. यामुळे पौष महिना निश्चित करण्यात आला. यानंतर तिथी कोणती असावी, यावर विचार सुरू झाले, असे गौरव देशपांडे म्हणाले.

असा काढला शुद्ध शुभ मुहूर्त 

ज्या देवतेची जी तिथी आहे, ती मिळाली तर सर्वांत उत्तम असते. त्यानुसार, द्वादशी तिथी भगवान विष्णूंची सांगितली आहे. प्रभू रामचंद्र हे विष्णूंचे स्वरुप असल्यामुळे द्वादशी तिथी निश्चित करण्यात आली. त्यानंतर वार शुभ असणे गरजेचे आहे. या तिथीला सोमवार आहे. सोमवारी प्राणप्रतिष्ठा झाली तर, ती सर्व जनतेला लाभप्रद होते. प्रजा सुखी होते, असे फळ ज्योतिषात दिलेले आहे. तिथी वार ठरल्यानंतर नक्षत्रावर विचार सुरू झाला. द्वादशी, सोमवार या वेळेला मृग हे नक्षत्र आहे. मृग नक्षत्र शुभ मानले गेले आहे. त्यामुळे सोमवार, द्वादशी, मृग नक्षत्र या संयुक्त दिवस काढण्यात आला, तो म्हणजे २२ जानेवारी २०२४. हा दिवस शुभ असला तरी वेळ महत्त्वाची असते. त्यामुळे अयोध्येच्या अक्षांश-रेखांशानुसार, मेष लग्न सुमारे दोन ते सव्वा दोन तास असते. २२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ११ वाजून १७ मिनिटांनंतर ते पुढे असणार आहे. त्यातील स्थिर नवमांश जो १४ ते १५ मिनिटांचा कालावधी असतो, तो गणिती पद्धतीने काढण्यात आला. अशा प्रकारे २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची स्थापना वेळ देशपांडे पंचांगातर्फे काढून देण्यात आली. हे आमचे महत् भाग्य आहे. रामचंद्र प्रतिष्ठापनेत आमचा खारीचा वाटा आहे, ही सेवा प्रभू रामचंद्रांचरणी रुजू झाली, अशी भावना गौरव देशपांडे यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी १२ वाजून २९ मिनिट व ८ सेकंद ते १२ वाजून ३० मिनिट व ३२ सेंकद हा ८४ सेकंदाचा शुभ मुहूर्त असल्याचे म्हटले आहे. ८४ सेकंदाच्या शुभ मुहूर्तामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रामलल्लांचा अभिषेक करणार आहेत. मेष लग्न व अभिजित मुहुर्तामध्ये हा अभिषेक केला जाणार आहे. या दिवशी दुपारी अभिजित मुहूर्त लागणार असून याचवेळी सूर्य मध्यान्हावर येणार आहे. त्यावेळी सूर्य पूर्णतः तेजस्वी स्वरुपात राहणार आहे.
 

Web Title: know about how much auspicious ram lalla pran pratishtha muhurat for ayodhya ram mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.