गणपती बाप्पाला बुधवारी ‘ही’ एकच वस्तू अर्पण करा; प्रसन्नता, शुभ-लाभ मिळवा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 12:32 PM2022-02-08T12:32:46+5:302022-02-08T12:34:22+5:30
बुधवारी केलेले गणपती बाप्पाचे पूजन, नामस्मरण यालाही अनन्य साधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते.
वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समभ्रम निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा... गणपती बाप्पाच्या केवळ नामस्मरणाने सकारात्मकता येते. एका चैतन्यमय उर्जेचा संचार होतो. महादेव आणि पार्वती देवींचा पुत्र गणेश प्रथमेश मानला गेला आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम गणपती स्मरण केले जाते, हे सर्वश्रुत आहे. साधारणपणे मंगळवारी गणपतीचे विशेष पूजन, नामस्मरण करण्याला प्राधान्य दिले जाते. मात्र, बुधवारी केलेल्या विशेष गणपती पूजन, भजन, नामस्मरण यालाही अनन्य साधारण महत्त्व आहे.
ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला वाणी, वाणिज्य, लेखन, कायदा आणि गणित यांचे कारक मानले गेले आहे. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमकुवत असेल, तर बुधवारी गणपती बाप्पाची पूजा, नामस्मरण करणे लाभदायक ठरते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. गणपतीला प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होतो, असे सांगितले जाते.
दुर्वा अर्पण कराव्यात
बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख-समृद्धी आणि बुद्धीप्रदान करतात, असे सांगितले जाते. धार्मिक पुराणांमध्ये गणपतीला बुद्धीचा देवता मानले गेले आहे. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
जास्वंदाचे फूल, लाडू
याशिवाय पूजा झाल्यानंतर गणपतीला आवडणारे जास्वदाचे एखादे फूल वाहावे आणि लाडू किंवा मोदक यांचा नैवेद्य दाखवावा. लाडू किंवा मोदक नसतील, तर गोडाचा नैवेद्य दाखवावा, असे सांगितले जाते. गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू, गोष्टी अर्पण केल्यास ते भाविकांसाठी शुभलाभदायक ठरू शकते, असे सांगितले जाते. तसेच गणपतीचा ॐ गं गणपतये नमः हा मंत्र १०८ वेळा किंवा जितका शक्य असेल, तितक्या वेळा म्हणावा, असे म्हटले जाते.