तुमचा जन्म ‘या’ नक्षत्रात झालाय? असतात श्रीरामांसारखे गुण; राजयोग अन् संपत्ती मिळते अपार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 04:27 PM2024-01-19T16:27:58+5:302024-01-19T16:29:44+5:30

Lord Shri Ram Nakshatra: प्रभू श्रीरामांचा जन्म कोणत्या नक्षत्रात झालाय? जाणून घ्या...

know about in which nakshatra lord shri ram birth and significance of punarvasu nakshatra | तुमचा जन्म ‘या’ नक्षत्रात झालाय? असतात श्रीरामांसारखे गुण; राजयोग अन् संपत्ती मिळते अपार

तुमचा जन्म ‘या’ नक्षत्रात झालाय? असतात श्रीरामांसारखे गुण; राजयोग अन् संपत्ती मिळते अपार

Lord Shri Ram Nakshatra: ज्योतिषशास्त्रात ग्रह, तारे, राशी यांप्रमाणे नक्षत्रांनाही अत्याधिक महत्त्व आहे. विशेष म्हणजे नक्षत्र समूहाची मिळूनच एक रास तयार होत असते. ही नक्षत्रे आपण उघड्या डोळ्यांनी आकाशात पाहू शकतो. आपल्याकडे ज्योतिषशास्त्रात २७ नक्षत्र सांगितली गेली आहेत. तर अभिजित हे २८ वे नक्षत्र आहे. या २७ नक्षत्रांच्या विभागणीतून १२ राशी तयार करण्यात आल्या आहेत. एखाद्या व्यक्तीचा जन्म कोणत्या नक्षत्रात झाला आहे, त्यावरूनही त्या व्यक्तीबाबत काही तर्क, अंदाज बांधले जाऊ शकतात. 

राम मंदिर सोहळा अवघ्या काही तासांवर आला आहे. संपूर्ण देश राममय झाला आहे. राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे. त्यासाठी विधी सुरू झाले आहेत. वाल्मिकी रामायणातून प्रभू श्रीरामांची जन्म वेळ, शुभ काळ, नक्षत्र आणि राशीची माहिती मिळते. श्रीराम हे श्रद्धेचे सर्वात मोठे प्रतिक आहे. कोट्यवधी घरांत श्रीरामांचे पूजन केले जाते. श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते. या गुणांमुळे आजही प्रत्येकाला रामासारखा मुलगा, पती आणि भाऊ असावा, असे वाटते. श्रीरामांचा जन्म कोणत्या नक्षत्रात झाला आणि या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांमध्ये कोणते गुण असतात? याबाबत जाणून घेऊया...

श्रीरामांचे जन्म नक्षत्र कोणते?

वाल्मिकी रामायणातील एका श्लोकानुसार, श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुद्ध पक्षाच्या नवव्या दिवशी म्हणजेच नवमी तिथीला कर्क राशीत आणि पुनर्वसु नक्षत्रात झाला. पुनर्वसु हे २७ नक्षत्रांपैकी सातवे नक्षत्र असून, या नक्षत्राचा स्वामी गुरु ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रात पुनर्वसु नक्षत्र हे सर्वात शुभ मानले जाते. या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींची देवावर अपार श्रद्धा असते. असे मानले जाते की, या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांचे मन मोठे असते. या व्यक्ती जिज्ञासू आणि सकारात्मक स्वभावाच्या असतात. दयाळू, हुशार आणि कुशल संवादक असतात. अशा लोकांना अधर्म, चुकीच्या मार्गावर चालणे आवडत नाही. यामुळेच त्यांच्यामध्ये भगवान श्रीरामांसारखे गुण दिसतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

कोणत्या क्षेत्रात होते भरभराट?

शिक्षण, लेखन, अभिनेता, डॉक्टर, ज्योतिषशास्त्र, साहित्य, योग प्रशिक्षक, पर्यटन विभाग, हॉटेल किंवा रेस्टॉरंटशी संबंधित काम, मानसोपचारतज्ज्ञ, धार्मिक गुरू, परदेशी व्यापार, ऐतिहासिक वस्तूंची विक्री, प्राण्यांसाठी निवारा, रेडियो, दूरचित्रवाणी, दूरसंवादाशी संबंधित कामे, पोस्ट किंवा कुरिअर सेवा, समाजसेवा अशा काही क्षेत्रांमध्ये यश मिळू शकते. या व्यक्ती नैतिक, आहे त्यात संतुष्ट राहणारे आणि समाधानी असतात, असे म्हटले जाते. तसेच देवावर, परंपरांवर आणि रुढींवर खूप विश्वास असतो. आयुष्यात खूप आदर आणि सन्मान मिळतो. दुसऱ्यांना मदत करण्यात पुढाकार घेतात. या व्यक्ती शांत, प्रामाणिक, गंभीर, श्रद्धाळू, सच्चे, न्यायप्रेमी आणि शिस्तबद्ध असतात. कुटुंबावर प्रेम असते. या व्यक्ती कितीही वेळा अपयश आले तरी प्रयत्न करणे सोडत नाही, असे सांगितले जाते.

दरम्यान, नक्षत्र चक्रातील पुनर्वसु हे सातवे नक्षत्र आहे. मृग, आर्द्रा आणि पुनर्वसु या नक्षत्रांची मिळून मिथुन रास तयार होते. मिथुन राशीतील दोन ठळक तारे म्हणजे कॅस्टर (कक्ष) आणि पोलक्स (प्लक्ष). यांनाच पुनर्वसु म्हणतात. कॅस्टर हा तारा हिरवट पांढऱ्या रंगाचा असून, पोलक्स तारा नारिंगी रंगाचा आहे. पुनर्वसुचा योगतारा पोलक्स (प्लक्ष) आहे. पोलॅक्स हा राक्षसी तारा मानला गेला असून, पृथ्वीपासून तो ३४ प्रकाशवर्षे दूर आहे. पुनर्वसु शब्दाचा अर्थ ‘जे पुन्हा संपत्ती देतात ते’ असा होतो.

- सदर कोणत्याही दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

Web Title: know about in which nakshatra lord shri ram birth and significance of punarvasu nakshatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.