‘गुरुचरित्र’सारखा प्रभाव, दत्तात्रेयांच्या आद्य अवताराचे सार; मनोभावे स्मरण, लाभेल पुण्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 01:19 PM2024-11-06T13:19:52+5:302024-11-06T13:29:48+5:30
Lord Dattatreya Shreepad Shree Vallabh: दत्तगुरुंच्या पहिल्या अवताराबाबत माहिती आणि लीला यांचे अद्भूत वर्णन या ग्रंथात करण्यात आले आहे.
Lord Dattatreya Shreepad Shree Vallabh: कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दन:। द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद वल्लभ:॥ दत्तगुरुंचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ. दत्तगुरुंचा कलियुगातील हा अवतार विशेष महत्त्वाचा मानला जातो. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थीला झाला. श्रीदत्तांचा पहिला अवतार असलेल्या श्रीपाद वल्लभांबद्दल मात्र खूपच कमी माहिती ठाऊक आहे. भगवान श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी आश्विन कृष्ण द्वादशीस अवतार समाप्त केला.
दत्त संप्रदाय किंवा दत्त परंपरेत गुरुचरित्र ग्रंथाला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. गुरुचरित्र पठणाचे नियम जेवढे कठोर आहे, तेवढेच त्याची फलश्रुति प्रभावी आहे. गुरुचरित्राप्रमाणे आणि तसेच फळ देणारा ग्रंथ म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाकडे पाहिले जाते. श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राची रचना शंकर भट्ट यांनी केली आहे. पीठापूर ही श्रीपाद श्रीवल्लभ यांची जन्मभूमी तर, कुरवपूर ही श्रीपाद श्रीवल्लभ यांची कर्मभूमी मानली जाते. आपल्या अवतारकार्यात श्रीपाद श्रीवल्लभांनी अनेक लीला केल्याचे सांगितले जाते. याच सर्व लीलांचे अद्भूत वर्णन श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात आढळते.
मनोभावे स्मरण, लाभेल पुण्य
श्रीशंकर भट्ट यांनी लिहिलेला “श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत” हा ग्रंथ काही दिवस श्रीपाद प्रभूंच्या मामांचे घरी होता. त्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगु भाषेत अनुवाद करण्यात आला. तेलुगु भाषेत अनुवाद झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला. गंधर्वांनी तो श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला, अशी मान्यता आहे. शंकर भट्टाने रचलेले चरित्रामृत श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुकांजवळ ठेवून तो त्यांनी प्रभुना वाचून दाखविला.ऐकण्यास आलेले पाच भक्त ते श्रवण करुन धन्य झाले. त्यानंतर हा ग्रंथ अन्य अनेक भाषांमध्ये उपलब्ध झाला. प.पू. हरिभाऊ जोशी निटुरकर हे महान दत्तसंप्रदायिक सत्पुरूष आहेत. त्यांना श्रीगुरूंची एका दिव्य अनुभवातून अनुज्ञा मिळाली व त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत मराठी भाषेत भाषांतरीत केले.
श्रीपाद श्रीवल्लभांची भक्तांना आश्वासने
माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो. कायावाचामनेन मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून संभाळ करतो. सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म, ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते. तुमचे अंत:करण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो.
श्रीपाद श्रीवल्लभ चारितामृत ग्रंथाच्या पारायणाचे फळ
जन्म पत्रिकेप्रमाणे २७ नक्षत्रात भ्रमण करणाऱ्या नवग्रहापासून मिळणारे अनिष्ट फळ निघून जाण्यासाठी श्रीपादांचे भक्त 'मंडल' दीक्षा घेतात. एका 'मंडला'मध्ये श्रद्धा भक्तीने श्रीपादांचे अर्चन केल्यास किंवा त्यांच्या दिव्य चरित्राचे पारायण केल्यास सर्व कामनांची सिद्धी होते. मन बुद्धी, चित्त आणि अहंकार हे एका दिशेने आपली स्पंदने आणि प्रकंपने सोडत असतात. त्याचे प्रकंपन वेगळ्या चाळीस दिशांमध्ये प्रसरण पावतात. या चाळीस दिशामधून होणारे प्रकंपन थांबून श्रीपाद प्रभुकडे वळवले तर ते श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होतात. तेथे ते अवश्यक बद्ल घडून स्पंदनात रूपांतरित होऊन साधकाकडे पुन्हा येतात. त्या नंतर साधकाच्या धर्मानुकूल सर्व ईच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
|| दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नृसिंह सरस्वती दिगंबरा ||
|| श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये ||
|| श्री गुरुदेव दत्त ||
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.