भागवत सप्ताहारंभ: ‘अशी’ सुरू झाली परंपरा; राजाला दिलेला शाप अन् व्यासपुत्रांचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 03:27 PM2024-09-12T15:27:05+5:302024-09-12T15:30:54+5:30
Bhagwat Saptah Tradition In Marathi: भागवत सप्ताहारंभ कसा सुरू झाला? याबाबत पुराणात एक कथा प्रचलित असल्याचे सांगितले जाते. जाणून घ्या...
Bhagwat Saptah Tradition In Marathi: भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये श्रीमद् भागवत कथा आणि भागवत सप्ताह याला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. देशभरात भागवत कथा सप्ताहाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक कथाकार निरुपणाच्या माध्यमातून भागवत कथा पोहोचवत असतात. भाद्रपद महिन्यात गुरुवार, १२ सप्टेंबर २०२४ पासून भागवत सप्ताह आरंभ झालेला आहे. बुधवार, १८ सप्टेंबर २०२४ रोजी भागवत सप्ताह समाप्ती आहे. परंतु, भागवत सप्ताह साजरा करण्याची परंपरा कधी सुरू झाली? याबाबत पुराणातील एक कथा प्रचलित असल्याचे सांगितले जाते.
पौराणिक कथेनुसार, शमीक ऋषी यांच्या आश्रमात पुत्र श्रृंगी यांच्यासह अन्य ऋषिपुत्र अभ्यास करत होते. एक दिवस सर्व विद्यार्थी जंगलात फेरफटका मारण्यासाठी गेले. तेव्हा आश्रमात शमीक ऋषी एकटेच समाधी लावून बसले होते. तहानेने अत्यंत व्याकूळ राजा परिक्षित शमीक ऋषींच्या आश्रमात पोहोचले. आश्रमात पाण्याचा शोध घेऊ लागले. ध्यानस्थ असलेल्या शमीक ऋषींना विनम्रपणे नमस्कार करून पाणी देण्याची विनंती केली. दोन-तीन वेळा विनवणी करूनही ऋषींनी डोळे न उघडल्याने समाधीचे ऋषी ढोंग करताहेत, असा समज राजाचा झाला.
वडिलांच्या गळ्यात सर्प आणि श्रृंगीचा शाप
राजा अत्यंत क्रोधीत झाला. जवळच पडलेल्या एका मृत सापाला ऋषींच्या गळ्यात टाकले आणि तेथून निघून गेले. राजा परिक्षित आश्रमातून जात असल्याचे एका ऋषिकुमाराने पाहिले. ही बाब श्रृंगीला सांगितली. राजाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण आश्रमात पोहोचले. शमीक ऋषींच्या गळ्यात साप पाहून श्रृंगी अत्यंत क्रोधीत झाला. वडिलांच्या गळ्यात मृत साप टाकणाऱ्या राजा परिक्षितांचा पुढील सातव्या दिवशी नागराज तक्षकच्या दंशाने मृत्यू होईल, असा शाप श्रृंगीने दिला. ऋषिकुमारांनी शमीक यांच्या गळ्यातील साप काढून टाकला. तेवढ्यात शमीक ध्यानातून बाहेर आले. काय घडले आहे, असे विचारल्यावर श्रृंगीने सर्व हकीकत वडिलांना कथन केली.
श्रृंगींचा शाप असत्य ठरणारा नाही
राजा परिक्षित यांनी मोठी चूक केलेली नाही. त्यांना सर्पदंशाचा शाप देणे योग्य नाही. असे वागणे आपल्याला शोभत नाही. अजून सर्व ज्ञान तुम्हाला प्राप्त झालेले नाही. भगवंताला शरण जाऊन झालेल्या चुकीबद्दल क्षमायाचना करावी, अशी समज वडिलांनी श्रृंगीला दिली. दुसरीकडे, राजभवनात पोहोचल्यावर राजाला आपली चूक समजली. थोड्याच वेळात शमीक ऋषींचे शिष्य राजा परिक्षितांकडे पोहोचले. राजन, शमीक ऋषी ब्रह्मसमाधीमध्ये लीन असल्याने आपले आदारतिथ्य करता आले नाही. याबाबत त्यांना खेद वाटतो आहे. मात्र, कोणताही विचार न करता आपण त्यांच्या गळ्यात मृत साप टाकल्याने श्रृंगी क्रोधीत झाले आणि पुढील सात दिवसात सर्पदंशाने आपला मृत्यू होईल, असा शाप दिला आहे. श्रृंगींचा शाप असत्य ठरणार नाही, असे सांगितले.
व्यासपुत्र शुकदेव यांचा पुढाकार अन् भागवत सप्ताहारंभ
आपल्या चुकीची योग्य प्रकारे शिक्षा मिळत आहे, याबद्दल राजा परिक्षित यांना समाधान वाटले. सात दिवस ईश्वर-चिंतन आणि मोक्षमार्ग साधनेत घालवावेत, असा सल्ला राजाला देण्यात आला. राजा परिक्षित व्यासपुत्र शुकदेव यांच्याकडे गेले. शुकदेव यांनी राजा परिक्षित यांना सात दिवस सलग भागवत कथा ऐकवली. तेव्हापासून भागवत सप्ताहाची सुरुवात झाली, असे सांगितले जाते. भागवत सप्ताहाची परंपरा गेल्या अनेक दशकांपासून सुरू असल्याचे आजही आपल्याला दिसते.