संकटांवर संकटे, भाविकाला स्वप्नात स्वामी समर्थांचे दर्शन झाले! तुम्हालाही आलाय असा अनुभव?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 01:36 PM2024-02-07T13:36:16+5:302024-02-07T13:39:43+5:30
एक आशेचा किरण आणि स्वामींवरील विश्वास संकटातून बाहेर पडण्यासाठी सहाय्यभूत होते, असा काहींचा अनुभव असल्याचे सांगितले जाते.
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे लक्षावधी आर्त, जिज्ञासू आणि मुमुक्षूंचे आश्रयस्थान आहे. श्री स्वामी समर्थांचा अवतार ही भगवंताची सर्वात मोठी लीला आहे, अशी मान्यता आहे. स्वामी समर्थांना समाधिस्थ होऊन शेकडो अधिक वर्षे उलटून गेली असली तरी त्यांचा महिमा दिवसेंदिवस वाढतचआहे. या सगुण ब्रह्माची उपासना अतीव श्रद्धेने, प्रेमाने अन् भक्तीने महाराष्ट्रातील घराघरांतून नित्य सुरू आहे. स्वामी समर्थांच्या कृपेचे अनंत चमत्कार हजारो भक्त नित्यशः अनुभवीत आहेत. स्वामींना मानणारा वर्ग मोठा आहे. स्वामींच्या अनेक कथा सांगितल्या जातात. अनेक कथा या भाविकांनी घेतलेल्या अनुभवांतून समोर आलेल्या आहेत. अशीच एक कथा घडल्याचे सांगितले जाते.
एक भक्त नित्यनेमाने स्वामींची सेवा करत असतो. एकदा त्यावर मोठे संकट येते. या संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वामींचा धावा करतो. मात्र, संकट अधिक गहिरे होते. त्रास वाढतो. बाहेर कसे पडावे हेच कळत नाही. अशातच काही दिवसांनी हळूहळू तो भाविक संकटमुक्त होतो. परंतु, स्वामींनी मदत केली नाही, अशी धारणा तो करून घेतो. त्यामुळे स्वामी सेवेकडे त्याचे दुर्लक्ष होते. मात्र, काही दिवसांनी त्याला एक स्वप्न पडते.
संकटकाळात तुझ्या सोबतच होतो, याची ती साक्ष आहे
भाविकाला स्वप्नात दिसते की, स्वामी आणि तो एका भल्या मोठ्या वाळवंटातून जात आहेत. कितीतरी वेळ झाला दोघेही चालत आहेत. नेमका बाहेर पडण्याचा मार्ग अद्यापही दृष्टिपथात येत नाही. उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. हळूहळू चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण शरीर घामाघूम झाले आहे. मात्र, अशाही परिस्थितीत स्वामी शांतपणे आणि हसतमुखाने सोबत चालत आहेत. मात्र, काहीवेळाने भाविकाला वाळवंटात पायांचे दोघांच्या ठसे उमटलेले दिसतात. याबाबत तो स्वामींना विचारतो. स्वामी समोर दिसतात ते पावलांचे ठसे कोणाचे आहेत आणि एवढ्या रखरखत्या ऊन्हात या वाळवंटातून कोण गेले असावे?, या प्रश्नावर स्वामी ऊत्तर देतात की, हे पावलांचे ठसे तुझ्या आणि माझ्याच आहेत. तुझ्यावर आलेल्या संकटकाळात मी तुझ्यासोबतच होतो. याची ती साक्ष आहे. आणखी थोडे पूढे गेल्यावर त्याला फक्त एकाच्याच पावलांचे ठसे दिसतात. यावर, स्वामी जेव्हा मी खूपच अडचणीत होतो, तेव्हा आपण सोडून गेलात. त्यामुळे माझे एकट्याच्याच पायाचे ठसे आहेत ना?, या भाविकाच्या प्रश्नावर स्वामी म्हणतात की, नाही रे वेड्या...! येथून पुढे मी तुला माझ्या खांद्यावर घेतले होते. स्वामींच्या उत्तराने भाविक स्तब्ध होतो. त्याला खूप पश्चाताप होतो. संकटकाळात आशेचा एक किरण नवी उमेद देत असतो.
आशेचा किरण, नवी उमेद आणि स्वामींवरील विश्वास
संकटकाळात दिसलेला एक आशेचा किरण नवीन उमेद देत असतो. स्वामींवरील विश्वास संकटातून मार्ग काढण्यासाठी तसेच त्याच्याशी लढण्यासाठी बळ देत असतो. पाच दिवे प्रज्ज्वलित करण्यात आले होते. एके दिवशी एक दिवा म्हणाला, मी इतके जळून माझ्या प्रकाशाची कोणाला कदर नाही, त्यामुळे संपणेच चांगले, असा विचार करून तो विझतो. तो दिवा म्हणजे उत्साहाचे प्रतिक. जो दुसरा दिवा शांततेचे, संयमाचे प्रतिक, तोही असाच विचार करून विझून जातो. यानंतर तिसरा दिवा जो हिमतीचे, धैर्याचे प्रतिक असतो, तोही या दोघांसारखा विचार करून विझून जातो. उत्साह, शांतता, संयम आणि धीर सुटल्यामुळे समृद्धीचे प्रतिक असलेला चौथा दिवाही विझतो. पाचवा दिवा एकटाच जळत राहतो. पाचवा दिवा सगळ्यात छोटा असतो, परंतु निरंतर तेवत राहतो. कालांतराने त्या घरात एक व्यक्ती प्रवेश करते आणि एक दिवा तेवत असल्याचे पाहून आनंदाने प्रसन्न होते. कारण शेजारचे चार दिवे विझले तरी कमीत कमी एक दिवा तरी तेवत आहे. त्या व्यक्तीने एका दिव्याने इतर चारही दिवे पुन्हा प्रज्ज्वलित केले. तो पाचवा दिवा म्हणजेच आशेचा किरण आणि नवी उमेद.
|| श्री स्वामी समर्थ ||